July 27, 2024
Humanity tree for Cultural conservation article by rajendra ghorpade
Home » संस्कृती संवर्धनासाठी हवा माणूसकीचा वृक्ष
विश्वाचे आर्त

संस्कृती संवर्धनासाठी हवा माणूसकीचा वृक्ष

वाड्याचा बंगला झाला, शेणाच्या सारवलेल्या जमिनींची जागा आता स्टाईलच्या फरशांनी घेतली आहे. पण या नव्या घरातील गारवाच नाहीसा झाला आहे. उन्हाच्या दाहकतेने पंख्याचा वाराही गरम वाटू लागला आहे. पांढऱ्या मातीच्या विटांतला वाडा त्याच उन्हात नैसर्गिक गारवा देत होता. मग हा सिमेंटचा बंगला का बांधला?

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

पत्र, पुष्प, छाया । फळें मूळें धनंजया ।
वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ।। 86 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ – अर्जुना, ज्याप्रमाणे वृक्ष वाटेने येणाऱ्यास पानें, फुले, छाया, फळें, मुळें देण्यास चुकत नाही.

घर कसे असावे ? असा प्रश्न केला तर आपल्या मनात उत्तर येते बंगला असावा की झोपडी. सध्या जीवनात पैशाला महत्त्व आहे. जीवन पैशावर चालते. आराम पैशावर मिळतो. पैसा असेल तर जीवनात सुख आहे. पैसा नसेल तर जगणार कसा हा मोठा प्रश्न आहे. भीक मागून भीक मिळेल का? हासुद्धा मोठा प्रश्न आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवनच बदलले आहे. यामुळे घर कसे असावे या प्रश्नाचे उत्तर हे भावनिक न येता आर्थिक घडामोडीवर आधारित उत्तर मिळाले आहे. घर शांत, स्वच्छ आणि इतरांनाही सुख देऊ शकेल असे असावे. मग ती छोटीशी झोपडी जरी असली तरी चालेल. पण ती सुखाची सावली देणारी असावी. टुमदार बंगला आहे पण त्यामध्ये शांत झोप लागत नसेल तर ते घर कसले.

झाडाप्रमाणे घर असावे. झाड काय देते? जाणाऱ्या येणाऱ्यांना सावली देते. उन्हापासून संरक्षणासाठी आसरा देते. श्रमिकांना सावली देते. पत्र, पुष्प, फळ त्यापासून मिळते. मोहोर लागल्यानंतर सुवास देते. वातावरण प्रसन्न करते. पण त्या झाडाला आपण काय देतो. कधी पाणी तरी घालतो का? काही न घेता ते सर्वकाही देते. निरपेक्ष भावनेने ते सर्व देते. उन्हात चालून चालून थकलेल्या व्यक्तीला ते आसरा देते.

शेतात कष्ट करणाऱ्या व्यक्तीला आता बांधावर झाडे नकोशी वाटत आहेत. नांगरटीला अडचण होते. झाडाच्या सावलीमुळे पीक चांगले वाढत नाही. अशा अनेक कारणांमुळे बांधावरील झाडे नष्ट झाली. नांगरट ट्रॅक्टरने होऊ लागल्याने शेतात नांगर चालवून थकण्याचा आता प्रश्नच उरला नाही. यांत्रिकीकरणामुळे कामांत सहजता आली, पण माणसाचे मनही तितक्याच सहजतेने बदलले गेले. बांधावरच्या झाडावर त्याने कुऱ्हाडी चालवल्या. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीत दररोज प्रयोग केले जातात. पण उत्पन्नाचे स्रोतच यांनी तोडले.

झाडाचा पाला पडत होता. जमीन शेकण्यासाठी त्याचा फायदा होत होता. शेताला सेंद्रिय खत मिळत होते. झाडाची फळे चाखायला मिळत होती. तीही बंद झाली. निवांतपणे झाडाखाली बसून आराम करता येत होता. मन प्रसन्न करणारा, थकवा दूर करणारा हा वृक्ष तोडल्याने शेतकऱ्यांचे मन भरकटले आहे. शांतीच्या शोधात तो फिरतो आहे. निवांतपणा शोधतो आहे.

वाड्याचा बंगला झाला, शेणाच्या सारवलेल्या जमिनींची जागा आता स्टाईलच्या फरशांनी घेतली आहे. पण या नव्या घरातील गारवाच नाहीसा झाला आहे. उन्हाच्या दाहकतेने पंख्याचा वाराही गरम वाटू लागला आहे. पांढऱ्या मातीच्या विटांतला वाडा त्याच उन्हात नैसर्गिक गारवा देत होता. मग हा सिमेंटचा बंगला का बांधला? अंगदुखीचा त्रास यानेच तर आला. पैसा आला पण गारवा गेला. निवांतपणा गेला. माणसातले माणूसपणही गेले. माणुसकीचा वृक्ष आता पुन्हा लावला, तरच भावी काळात मनुष्य संस्कृती टिकून राहील.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

नव्या पिढीसाठी आत्मज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग

Navratri Theme : जैवविविधतेची गुलाबी छटा…

भावगर्भ, अर्थगर्भ, चिंतनशील कवितासंग्रह

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading