पक्षांचा किलबिलाट काहींना त्रासदायक वाटतो. काहींना त्यांना मारून खाण्याचाही विचार येतो. पण या सर्वांच्या ठिकाणी विवेक जागृत झाल्यास त्या किलबिलाटाने मन कसे आनंदी, प्रसन्न होते याची अनुभुती येऊ शकते. पक्षांच्या आवाजांने आपल्या मनालाही प्रसन्नता लाभते. तो गोड आवाज आपल्या तोंडी आपोआप उत्पन्न होतो. त्यांच्या शब्दांचे स्वर आपण आत्मसात केले तर मनाला आनंद होतो. पण यासाठी मनात तसा विवेकी विचार असायला हवा तरच हे शक्य होते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
सर्वेंद्रियाच्या आंगणी । विवेक करी राबणी ।
साचचि करचरणी । होती डोळी ।। 206 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा
ओवीचा अर्थ – सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो व हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात ( म्हणजेच हातपाय ही कर्मेंद्रिये असूनही त्यांना चांगले व वाईट निवडण्याची शक्ती येते )
रज आणि तम गुणावर इंद्रिये जेव्हा विजय मिळवताता तेव्हा अंगामध्ये सत्वगुणांची वाढ होते. साहजिकच अंगात सात्विक वृत्ती वाढते. अंगातील विवेक जागा होतो. विवेकाचा जागता पहारा रात्रंदिवस सुरू असतो. इंद्रियांच्या अंगणात विवेकाचा जागता पहारा असल्याने दुष्ट विचारांना प्रवेश करणे कठीण जाते. कारण चांगले वाईट निवडण्याची शक्ती या इंद्रियांना सहज प्राप्त होते.
मोह, माया, हाव, वासना यांना इंद्रियांच्या अंगणात प्रवेशच करता येत नाही. विवेकाचा पहारा असल्याने ते यात आलेच तरी ते इंद्रियांच्या घरात प्रवेश करू शकत नाहीत. चांगले वाईट ओळखण्याची शक्ती मिळाल्याने विवेकाने त्यांच्यावर विजय मिळवता येतो. यासाठी मनात सदैव सात्विक विचार उत्पन्न कसे होतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. रज आणि तम गुण कसे कमी करता येतील यावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. मनाने ठरवले तर ते सर्व शक्य आहे. यासाठी मनातच विवेक जागा करण्याची गरज आहे. विवेकी विचाराने आचार विचारांतही फरक पडतो. विवेकाच्या पहाऱ्यामुळे पशुपक्षांची हत्या करायची नाही असा विचार जागृत होतो. कोणी तसे करत असेल तर त्याला रोखण्याचेही सामर्थ्य त्याच्यात उत्पन्न होते.
पिकातील दाणे खातात म्हणून पक्षी हुसकावून लावले जातात त्यांना मारले जात नाही. झाडावर बसलेल्या पक्षाला दगड मारण्याचा विचार जेंव्हा मनात उत्पन्न होतो. तेंव्हा पक्षाला दगड मारताना तो त्यात मृत्यू पावेल याचे भानही मारणाऱ्याला नसतो. पण विवेक जागृत असेल तर ही कृतीच करण्याची इच्छा होत नाही. नुकसान होत असले तरीही त्यांना फक्त त्यापासून हसकावून लावण्याचीच इच्छा उत्पन्न होते. हे केवळ विवेकानेच घडते.
पक्षांचा किलबिलाट काहींना त्रासदायक वाटतो. काहींना त्यांना मारून खाण्याचाही विचार येतो. पण या सर्वांच्या ठिकाणी विवेक जागृत झाल्यास त्या किलबिलाटाने मन कसे आनंदी, प्रसन्न होते याची अनुभुती येऊ शकते. पक्षांच्या आवाजांने आपल्या मनालाही प्रसन्नता लाभते. तो गोड आवाज आपल्या तोंडी आपोआप उत्पन्न होतो. त्यांच्या शब्दांचे स्वर आपण आत्मसात केले तर मनाला आनंद होतो. पण यासाठी मनात तसा विवेकी विचार असायला हवा तरच हे शक्य होते. यासाठी मनातच अहिंसा उत्पन्न व्हायला हवी. मनात अहिंसा असेल तर आचरणात हिंसा उतरणारच नाही. कितीही किलबिलाट पक्षांनी केला तरी आपल्या विचारात सामावलेल्या विवेकाने वाईट विचार उत्पन्नच होत नाहीत. ते किलबिलाटे शब्द आपल्या हृदयात साठवले तर ते शब्द आपल्या शरीरात प्रकट होतात. यासाठी विवेक जागा ठेवून आचरण करत राहील्यास इंद्रियात रज आणि तम कधीच प्रवेश करू शकणार नाहीत.