खेड चिपळूणमध्ये इंडियन पिट्टा (नवरंग)चे मनःपूर्वक स्वागत…
गेली काही वर्षे न चुकता पावसाळ्याच्या तोंडावर हमखास भेटीस येणारा इंडियन पिट्टा (नवरंग) आज सकाळी (ता. ९) परसदारी आमच्या दृष्टीस पडला आणि आत्यंतिक आनंद झाला. याच आनंदात आम्ही त्याचे मनोमन स्वागतही केले.
इंडियन पिट्टा याला मराठीत नवरंग म्हणतात. चिमणीपेक्षा दीड पटीनं मोठा नवरंग नऊ रंगांनी मढलेला असतो. हिमालयाच्या तळटेकड्या, श्रीलंका आणि दक्षिण भारत या परिसरात याची वीण असते. त्यामुळं आपल्याकडे केवळ स्थलांतर करण्याच्या काळात पावसाळ्याच्या सुरुवातीस तो दिसतो. हा फार उंचावर न बसता, जमिनीपासून पाच-सहा फुटांवरच्या फांद्यांवर आणि बऱ्याचदा जमिनीवर वावरतो. आमच्या परसदारी तो कायम आमच्याशी जमिनीवरून संवाद साधत आला आहे.
याच्या रंगांची झाक मोहक असते. कपाळावर चंदेरी झाक, मधोमध काळी रेघ, डोळ्यांवर जाड, गडद काळा पट्टा, पाठीवर मळकट हिरव्या रंगावर खांद्याजवळ चमकता निळा फरकाटा, पोटावरच्या लिंबूकलरचा शेवट ओटीपोटापाशी लाल-गुलाबी होत जाणारं पिट्टाचं मोहक रुपडं आवर्जून पाहायला हवं.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.