पिकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करीत अस्मानी, सुलतानी संकटांशी चिवटपणे लढत खडकाळ, माळरानावर बागा फुलवित, दर्जेदार पिकं घेत आहेत. निर्यातीची स्वप्नं पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शेती करत असताना हेच चित्रण माझ्या कवितेतून येणं शक्य आहे.
गिरणारे
ज्ञानेश उगले
नाशिकच्या ज्या भागात मी शेती करतो तो गिरणारे गावाचा परिसर महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत बऱ्यापैकी बागायती आहे. इथल्या पिकांना पुरेसं पाणी देणारी गंगापूर, आळंदी, काश्यपी यासारखी धरणंही या भागात आहेत. परंतु पाणी आहे म्हणून बागायती म्हणायची. अन्यथा दुष्काळी भागातील जिरायती शेतकऱ्यांपेक्षा या बागयतदारांच्याही समस्यांमध्ये फारसा काही फरक वाटत नाही. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकाचा हातात पैसा येतो. पण तो येण्याआधीच त्याच्या हजार वाटा ठरलेल्याच असतात. बी-बियाणं, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, अवजारं यांच्या बाजारभावात सालोसाल दुप्पट-तिपटीने वाढ हेोते. पण शेतीमाल, अगदी इथल्या द्राक्षासारख्या पिकाच्याही बाजारभावात गेल्या दहा वर्षांतही फारशी वाढ झालेली दिसत नाही.
दरवर्षी अहोरात्र मेहनत करून पीक कमवायचं आणि मार्च अखेरीस सोसायटी, औषध दुकानदार, खासगी सावकार यांचे देणे करायचे. जमलंच तर काही गहाणवट सोडवायचे. यासाठीही अपुरे पडले तर परत कुणाकडे तरी उसनवारीने कर्जाने उचलायचे, असं सालोसाल चाललंय. याहीपलीकडे तलाठी, पाटबंधारे खात्याचे कर्मचारी वीज बोर्डाचे अभियंता, वायरमन या घटकांशी अटळ असा संबंध येतोच आणि हा घटकही शेतीच्या शोषणात पुढे असल्याचे दिसतं. भाऊबंदकी, गावातलं गटातटाचं दिशाहीन राजकारण याबरोबरच बेरकी पुढारी, कंत्राटदार हे व्यक्तिगत पोळी भाजून घेण्यापलीकडं काहीच करताना दिसत नाही. राजकीय, सामाजिक पातळीवर असं सगळं निराशादायकच चित्र असताना शिक्षण सोडून शेतीत उतरलेली शेतकऱ्याचीं पोरं जिद्दीनं वेगळं काही करताना दिसत आहेत.
पिकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करीत अस्मानी, सुलतानी संकटांशी चिवटपणे लढत खडकाळ, माळरानावर बागा फुलवित, दर्जेदार पिकं घेत आहेत. निर्यातीची स्वप्नं पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शेती करत असताना हेच चित्रण माझ्या कवितेतून येणं शक्य आहे.
इथले बाप, आजे आणि जुन्या माणसांचा आजही शेतीव्यवस्थेवर राग आहे. कारण ढोर मेहनत करूनही हाती काहीच लागत नाही. हा वर्षानुवर्षे चालत आलेला अनुभव आहे. यातूनच आपल्या मुलानं शेतीत राबू नये. शहरात साहेबासारखी नोकरी करावी. उन्हा-पावसात शरीर झिजवण्यापेक्षा फ्लॅटमध्ये सुखात राहावं. असंच इथल्या बापाला वाटतं. त्यामुळे महाविद्यालयीन किंवा तत्सम शिक्षण घेणारा जर कुणी पुढे नोकरी न करता शेती करू लागला. तर त्याला नावे ठेवली जातात. या टीकेचा धनी मीही वेळोवेळी झालो.
नोकरी सोडल्यानंतर काही काळ जवळचं भांडवल आणि कर्जाचाही पैसा शेतीमध्ये गुंतवला. टोमॅटोचे पीक घेतलं. बी-बियाणे, औषधे याच्यावर हजारो रुपये खर्च केला. खत-पाण्याची हयगय केली नाही. रोग येऊ नये म्हणून दिवसा-रात्री औषधांच्या फवारण्या केल्या. पीक भरपूर आलं. पण बाजारभावात गेलं. वीस किलो क्रेट अवघ्या पाच रुपयांत विकताना वाहतुकीला महाग झालं. त्यानंतर त्यातल्या त्यात स्थिरता देऊ शकेल. असं द्राक्षपीक करावं असं वाटू लागलं. जवळ तर एक रुपयाही नाही. सोसायटी, बँकेचं प्रकरण करायचं ठरवलं. त्यात भाऊबंदकीनं अडथळे आणले. तलाठी, मजूर, दुकानदार, ठिबक सिंचनवाले अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडता पाडता मागील वर्षाच्या हंगामात व्यापाऱ्याकडून फसवणूक होत असताना थोडक्यात वाचलो. याही वर्षी बहरलेलं पीक शेतात उभं आहे. काढणी आधीच्या या शेवटच्या टप्प्यात मी पिकाला जीवापाड जपतोय. सांभाळतोय…
कॉलेजच्या पोर्चमधून फिरत असताना माझं लक्ष नोटीस बोर्डावर गेलं. तिथं एक पत्र लावलेलं होतं. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी खेडेगावातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या मुलास उद्देशून ते पत्र लिहिलेले होते. ती भाषा आणि ते विचार माझ्या हृदयाला हलवून गेले. ‘ऐतखाऊ सुखात जगतात. मग तुझ्या आईबापांनी असे काय पाप केले की, दिवसरात्र उन्हातान्हात गाळागुळात राबवूनही त्यांना सुखाचा घास मिळत नाही. धड कपडे मिळत नाही?’ या त्या पत्रातील प्रश्नाने मला अस्वस्थ केले. यातून शरद जोशी या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित झालो. दोन वर्षे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत महाराष्ट्रभर हिंडलो. याच प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात असलेली गणपतदादा कातड, मोहन गुंजाळ, स्मिता गुरव, रामनाथ ढिकले, भागीरथीबाई ढिकले अशी असंख्य माणसं भेटली. याच धावपळीत कविवर्य इंद्रजित भालेराव यांची भेट झाली.
शेतीच्या वास्तवतेचं प्रभावी चित्रण इंद्रजित भालेराव यांच्या कवितेत दिसतं असं बऱ्याचदा शरद जोशी यांच्या तोंडून ऐकलेलं. त्यामुळे उत्सुकता होती. ना. धो. महानोर, विठ्ठल वाघ यांची कविता वर्षानुवर्षे मनात रुंजी घालत आलीय. इंद्रजित भालेराव यांच्या मायेच्या ओव्यांशी नातं सांगणाऱ्या कवितेनं एका अर्थाने वेडंच लावलं. त्याच्या कवितेत माझी आई, बाप, घर परिस्थिती मला लख्ख दिसू लागली. महानोरांच्या रानातल्या कविता, पावसाळी कविता शेता-मळ्यात सतत बरोबर असायच्या. भालेरावांच्या पीक-पाणी, कुळंबिणीची कहाणी, आम्ही काबाडाचे धनी या कविता वेळोवेळी आई-वडिलांना वाचून दाखवत राहिलो. आयुष्यभर शेतामळ्यात राबलेल्या पंढरीच्या विठोबाशी अन् शेतातल्या मातीशी निर्मळ निष्ठा असलेला माझ्या आई-बापांनाही या कवितांनी काही काळ भूतकाळात नेलं. माझ्या आजीच्या, आईच्या ओव्यांनी मनाचंही पोषण सतत केलं आहे. जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवलं आहे आणि या वाटचालीमध्ये माझ्या जीवलग दोस्तांबरोबरच अनेक सुहृदयाची लाखमोलाची साथ मला लाभली आहे. हे ऋण शब्दांत व्यक्त होणारे नाही आणि अशा माणसांची छाया माझ्या कवितेवर सातत्याने आहे. असे मला वाटते.
पुस्तकाचे नाव – मातीची मुळाक्षरे ( कवितासंग्रह )
कवि – ज्ञानेश उगले, गिरणारे.
मानवंदना लढत राहिला अखेरपर्यंत दिला काश्मिरात प्राण आख्खं शिवार देतं मानवंदना झाडा झाडात दाटतो अभिमान ठसठसणारं दुःख गिळीत बाप हिंडतोय शेतामळ्यात फोटोमध्ये तुला धुंडाळताना मायेेचा येतो हुंदका गळ्यात संसार असा फुलण्याआधी देवानं न्यायला नको होतं तुच एक आशा अन् तुच जगायचं साधन होतं... दुःखाच्या पुरामध्ये जरी घरटं गेलं वाहून तू येणार नाही हे सांगूनही माय बसते डोळे लावून सायकलवर दोस्तांकडे गेला असेल नाही तर मळ्यात बापासंग गवत काढीत असेल वेडं मायेचं मन म्हणत राहतं... माझा लेक मला दिसेल आता येईल लेक कुठून म्हणल माय जेवायला वाढ वेड्या मायेला कसं सांगावं आधीच जळून गेलंय झाड... महिन्याच्या सुटीवर आला तेव्हा पै पाहुणे गेले आले दोन घरांचे जडले नाते घर आनंदानं न्हाले... पण आयुष्याच्या वळणाला कशी लागली भोवरी काय चूक त्या पोरीची झाली महिन्याची नवरी हळद उतरता उतरता गेलं पुसून कपाळ काडी काडीला जोडता कसं कोसळलं आभाळ... अंगाखांद्यावर खेळवला शिकवलं जुनेर जोडून कसा निकरट काळ नेतो खेळता ओढून पाळण्यातली, शाळा मळ्यातली आठवताना गाणी माय रडते हमसून डोळा अखंड पाणी ज्यानं द्यावं आम्हा पाणी त्याला दिलं आम्ही पाणी पोर पोटचा दिसेना जन्म दुःखाची कहाणी...