July 27, 2024
Jijau the mother of the nation who built Swaraj on scientific foundation
Home » वैज्ञानिक पायावर स्वराज्य उभारणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ
विशेष संपादकीय

वैज्ञानिक पायावर स्वराज्य उभारणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ

हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वैज्ञानिक दृष्टीचं योगदान राजमाता जिजाऊ यांचं होतं. स्वराज्याच्या प्रगतीला खीळ घातली जाते, अशा प्रतिगामी आचार-विचार आणि सामाजिक आडमुठेपणा यांचा त्यांनी सतत प्रतिकार केला. मानवी जीवनात न्यायासाठी विज्ञान महत्त्वाचं सातत्याने राहिलं आहे. या समाज विज्ञानाबद्दलची दृष्टी जिजाऊंकडे होती. त्यामुळेच विज्ञानाचा उपयोग न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केला.

प्रकाश पवार,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

समाजाच्या मनोधारणेवर विज्ञानाचा परिणाम होतो. पण, विज्ञानाला राज्यकर्ते प्रगतीशील किंवा आधोगामी पद्धतीनं वळवण्याचा प्रयत्न करतात. जिजाऊंच्या काळात विज्ञान फार प्रगत नव्हतं. पण, समाजाला प्रगतीशील टप्प्यावर घेऊन जाण्याचा उद्देश जिजाऊंचा होता.

जिजाऊंच्या काळातली राजकीय प्रक्रिया व्यवस्थात्मक पातळीवर घडण्यास सुरवात झाली होती. पर्यावरणात्मक, आकलानात्मक आणि संबंधात्मक अशा तीन पातळ्यांवर राजकीय प्रक्रिया घडत होती. या घडामोडींचा कार्यकारणसंबंध वैज्ञानिक क्रांतीच्या परिणामामधे दिसतो.

जिजाऊंमुळे विज्ञानाची स्वीकारार्हता वाढली

जिजाऊंच्या काळाच्या आधी कृषीशी संबंधित विज्ञानाची सुरवात झाली होती. तसंच हिंदुस्थानमधे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सुरवात झाली होती. या वैज्ञानिक घडोमोडीचा परिणाम जिजाऊंच्या काळावर, स्वराज्यावर झाला होता.

हिंदवी स्वराज्य समूह लक्षकेंद्रीत होतं. ही घडामोड आकलनात्मक राजकीय प्रक्रिया होती. तसंच या संकल्पनेला गती दिली गेली होती. केवळ तीन दशकामधे म्हणजे १६४४ ते १६७४ या काळात स्वराज्याची राज्यसंस्था सार्वभौम आणि अधिमान्य झाली होती. जिजाऊंनी सामाजिक सुधारणांच्या संदर्भात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला होता. त्यांनी त्यांच्या काळातल्या विज्ञानाला समाजकारणात आणि राज्यकारभारात पुरेसा अवकाश उपलब्ध करून दिला. यामुळे विज्ञानाची समाजातली स्वीकारार्हता वाढली.

जिजाऊंची वैज्ञानिक तत्व

त्यांनी घडवलेल्या राजकीय प्रक्रियेत विज्ञानाचे काही कंगोरे होते. त्याबरोबर त्यांनी स्वराज्याची संकल्पना त्या काळातल्या विज्ञानाच्या पायावर आधारित विकसित केली होती. विशेषतः जिजाऊंच्या दृष्टीने स्वराज्य म्हणजे काय होतं तसंच स्वराज्य आणि त्या काळातलं विज्ञान यांचा सहसंबंध जिजाऊंनी कसा जोडला ही जिज्ञासा महत्त्वाची ठरते. त्या काळातल्या विज्ञानाचा समाजमनावर कोणता परिणाम झाला त्या परिणामातून जिजाऊंनी कोणती समाज वैज्ञानिक तत्त्व निवडली.

स्वराज्य आणि न्याय यांचे सहसंबंध जिजाऊंच्या संकल्पनेतल्या विज्ञानाच्या चौकटीत कोणते होते तसंच स्वराज्यातल्या वेगवेगळ्या समूहांचे परस्परसंबंध अर्थात ओळख, अस्मिता, सामाजिक, सलोखा-संघर्ष हे समाजविज्ञानाच्या चौकटीत कसे होते हा प्रश्न तर संबंधात्मक राजकीय प्रक्रियेशी संबंधित आहे. यांचा उलघडा केला पाहिजे. विशेषतः न्यायनिवाडा, सार्वभौमत्व, अधिमान्यता, प्रशासनाची कौशल्यं, जमिनीचं मोजमाप, बांधकाम, नीतिशास्त्र, विचारसरणी, या गोष्टीमधे त्यांच्या काळातल्या विज्ञानाचा उपयोग केला गेला होता.

विज्ञानाला साजेशी स्वराज्याची जडणघडण

जिजाऊंच्या आधी वैज्ञानिक पर्यावरण घडण्यास सुरू झाली होती. हिंदुस्थानमधे अकबराच्या काळात विज्ञानाशी जुळवून घेतलं गेलं होतं. मध्ययुगाच्या पोटातून विज्ञानाचा आधार घेऊन नवजागृतीला सुरवात झाली होती. बांधकामशास्त्र, मापनशास्त्र, प्रशासकीय कसब, अंकगणित, तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, न्याय, भाषाशास्त्र या वैज्ञानिक गोष्टींशी जिजाऊंचा खूप जवळचा संबंध आला होता. किंबहुना त्यांची जडणघडण या विज्ञानाच्या घडामोडीशी संबंधित झाली होती.

हा सुरवातीला जावई शोध वाटेल. पण जिजाऊंच्या जीवनातल्या घटना आणि त्यांच्या काळातलं विज्ञान यांचे संबंध जोडले तर त्यांची विज्ञानदृष्टी सुस्पष्ट होत जाते. त्यांनी विज्ञानाच्या नव्या घडामोडीशी स्वतःला जुळवून घेतलं होतं. जिजाऊंच्या जन्माच्या आधी एका शतकापूर्वी वास्को-द-गामा हिंदुस्थानमधे आला होता. त्यानंतर दुआर्त बार्बीझ, दुमिंगगुश, फेर्ना नुनिझ हे प्रवासी हिंदुस्थानमधे आले. त्यांच्यामुळे सागरी प्रवास, भाषाशास्त्र, व्यापार, व्यापारी गोष्टींवर आधारित उत्पादन पद्धती, गलबताचे बांधकाम या घडामोडी विज्ञानाशी सुसंगत घडत होत्या.

या गोष्टी जिजाऊंच्या आधी शंभर वर्ष हिंदुस्थानमधे आल्या. त्यांची सार्वजनिक चर्चा आणि उपयुक्तता त्यांच्या लक्षात आली होती. कारण कृषी संस्कृतीबरोबर लढवय्या संस्कृतीशी त्यांचं जीवन जोडलं गेलं होतं. त्यांच्या काळात या दोन्ही संस्कृतीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला होता. विशेषतः स्वराज्याच्या विचारामुळे त्यांचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जास्त सकारात्मक झाला होता. सनातनी रुढी आणि विचार स्वराज्याच्या विरोधी होता. म्हणून स्वराज्याच्या उन्नतीला पोषक असा विज्ञानाचा मार्ग त्यांनी निवडला होता. विज्ञानाचा मार्ग चोखळणं उचित आहे, अशी त्यांची धारणा झाली होती. स्वराज्याच्या प्रगतीला खीळ घातली जाते, अशा प्रतिगामी आचार-विचार आणि सामाजिक आडमुठेपणा यांचा त्यांनी सतत प्रतिकार केला.

विज्ञान जिजाऊंच्या विचारांशी सुसंगत

विज्ञान जिजाऊंच्या विचारांशी सुसंगत कसं होतं? या संदर्भात काही निवडक मुद्दे पुढील प्रमाणे नोंदवता येतात.

  • १. विशेषतः शहाजी महाराज हे स्वराज्य संकल्पक होते. तर जिजाऊ यांनी स्वराज्याच्या विचारांचं बीज पेरलं. त्यानंतर शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ही तथ्य सर्वसहमत आहेत. स्वराज्य संकल्पक, स्वराज्याच्या विचारांचं बीज आणि हिंदवी स्वराज्य स्थापन या प्रत्येक गोष्टीत समाजविज्ञानाची दृष्टी होती. म्हणजेच पर्यावरणात्मक व्यवस्था आणि आकलनात्मक व्यवस्था यांचा मेळ घातला गेला होता. या अर्थाने, समाजविज्ञान हे तत्त्व व्यक्तिमत्त्वात होतं. वैज्ञानिक विचारांना परस्परपूरक व्यवहार त्यांनी केला. या तीन महामानवांचे विचार समाज वैज्ञानिक होते, म्हणून स्वराज्याच्या संकल्पेने गती धारण केली होती. स्वराज्य आणि गती यांचा एकत्रित विचार केला पाहिजे. आधुनिक काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळ दीडशे वर्ष सुरू होती. या गोष्टीशी तुलना केली तर स्वराज्याची गती लक्षात येते.
  • २. अर्थकारण हे एक समाजविज्ञान आहे. स्वराज्याचं राजकीय अर्थकारण जुळवताना सरळसरळ अंकगणिताचा नियम त्यांनी तंतोतंत पाळला. स्वराज्यातल्या अर्थकारणाचं मोजमाप त्यांनी नीटनेटकं ठेवलं होतं. ही मोजमाप आणि अंकगणिताची गोष्ट जिजाऊंच्या कार्य आणि कर्तृत्त्वाच्या संदर्भात सुरवातीपासून दिसते.
  • ३. लखूजी जाधवराव यांनी तळ्याचं बांधकाम केलं होतं. तेव्हा बांधकामशास्त्र ही वैज्ञानिक गोष्ट त्यांनी उपयोगात आणली होती. बांधकामशास्त्र हे विज्ञान आहे. बांधकामशास्त्र समजून घेणार्‍या घरात त्यांचं बालपण गेलं होतं. गंगा ही दैवी मानली जात होती. गंगा अडवायला परंपरागत समाजाचा विरोध होत होता. जिजाऊंच्या वडलांनी तळ्याच्या बांधकामामुळे दैववादी प्रवृत्ती नाकारली गेली होती. त्यांनी प्रागतिक भूमिका घेतली होती. या गोष्टीचा जिजांऊच्या विचारांवर खूप खोलवर प्रभाव पडलेला दिसतो.
  • ४. नवीन गावं आणि पेठा वसवणं ही दृष्टी शास्त्रीय आणि वैज्ञानिक होती. खुद्द जिजाऊंनी गावं आणि पेठा वसवल्या होत्या. तिथं गंगा अडवण्यात आली. गंगा कृषी समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणली गेली.
  • ५. दुमिंगगुश, फे र्ना नुनिझ हे पोर्तुगीज प्रवासी हिंदुस्थानमधे आले होते. त्या भागाचं नेतृत्व शहाजी महाराजांनी केलं होतं. त्या भागातली खडानखडा माहिती शहाजी महाराजांना होती. त्यामुळे त्यांचं भाषाशास्त्र, गलबतेविषयक ज्ञान शहाजी महाराजांना अवगत झालं होतं. शहाजी महाराजांकडून हे ज्ञान जिजाऊंकडे आलं. शिवरायांनी आरमार उभारलं होतं. तसंच त्यांनी पाण्यावरून प्रवास केला. आधुनिक काळात पाण्यावरून प्रवास केला तर धर्म बुडतो अशी धारणा होती. तसंच प्रायश्चित घ्यावं लागत होतं. मतितार्थ, आधुनिक काळाच्या तुलनेत जिजाऊंची वैज्ञानिक भूमिका जास्त प्रगत होती.
  • ६. प्रशासनाचं कसब हे वैज्ञानिक आहे. पुरंदरच्या तहानंतर जिजाऊंच्या प्रमुखत्वाखाली सल्लागारांचं मंडळ नेमलं होतं. हे मंडळ शास्त्रशुद्धपणे हिंदवी स्वराज्याचा कारभार पाहत होतं. बारा किल्ल्यांचा राज्यकारभार जिजाऊंच्या प्रमुखत्वाखाली कठीण काळात चालवला गेला होता. त्यांचं प्रशासकीय कारभार संभाळण्याचं कौशल्य या काळामधे पूर्ण वैज्ञानिक कार्यक्षमतेनं व्यक्त झालं होतं.
  • ७. प्रशासनात कार्याचं विशेषीकरण केलं जातं. प्रशासकीय विशेषीकरण हे वैज्ञानिक तत्व सल्लागार मंडळाचं कामकाज चालवताना तंतोतंत राबवलं होतं. तसंच त्यांनी सतराव्या शतकातल्या चाळीशीच्या दशकात नियंत्रण आणि समतोलाचं तत्त्व प्रशासकीय व्यवहारात उपयोगात आणलं होतं. कारण, नवीन कारभाराची व्यवस्था शहाजी महाराजांनी केली होती. अशा वैज्ञानिक तत्त्वाची मीमांसा जिजाऊंच्या कार्य आणि कर्तृत्त्वाच्या संदर्भात इतिहासकार आणि विचारवंतांनी केली आहे.

विज्ञानाचा उपयोग न्यायासाठी

हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वैज्ञानिक दृष्टीचं योगदान जिजाऊ यांचं होतं. ही गोष्ट राजारामशास्त्री भागवत, न्यायमूर्ती रानडे, वा. सी. बेंद्रे, सददेसाई , सेतूमाधव पगडी अशा अनेक विचारवंतानी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नोंदवलेलं दिसतं. कारण, त्यांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना नैतिकतेवर आधारलेली होती, असं विवेचन केलं.

जिजाऊंच्या दृष्टीनं हिंदवी स्वराज्य म्हणजे केवळ शासनसंस्था नाही. जिजाऊंच्या हिंदवी स्वराज्यात राष्ट्रीय जीवन या तत्त्वाला सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलं. राष्ट्रीय जीवन म्हणजे राष्ट्र किंवा लोकसमूह अशी त्यांची धारणा होती. कारण, त्यांनी राष्ट्रभावना म्हणजे बहुविविधतेत एकात्मतेची जाणीव असते. ती जाणीव महत्वाची मानली होती. हा मुद्दा म्हणजे हिंदवी स्वराज्यातल्या नागरिकांची स्वत्वभावना जागृत असणं होय.

स्वराज्यात सर्व लोक त्यांचे श्रेय पाहतील, अशी धारणा हिंदवी स्वराज्याची, त्यांची होती. थोडक्यात, मानवी चेतना, व्यक्तीचेतना, कुटुंबचेतना ही समाजात विलीन करावी. तेव्हा समूहजीवन घडतं. समूहजीवन राष्ट्रजीवन घडण्यासाठी हिंदवी स्वराज्याला मानवी चेतना किंवा स्वत्व म्हणून ओळखले गेलं पाहिजे. ही कृती मावळा या संकल्पनेशी संबंधित आहे. त्यामुळे मावळा ही संकल्पना राष्ट्रीय जीवन घडवते.

मानवी जीवनात न्यायासाठी विज्ञान महत्त्वाचं सातत्याने राहिलं आहे. या समाज विज्ञानाबद्दलची दृष्टी जिजाऊंकडे होती. विज्ञानाचा उपयोग न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केला.

जिजाऊंचा विचार सामाजिक सलोख्याचा

सामाजिक सलोखा हे वैज्ञानिक दृष्टीचं एक महत्त्वाचं लक्षण आणि संबंधात्मक यंत्रणा आहे. कारण, सामाजिक सलोखा म्हणजे समाजाचं मानवीकरण आणि ऐहिकीकरण करण्याची राजकीय प्रक्रिया घडणं होय. सामाजिक सलोखा म्हणजे मानव्याचा विकास असा अर्थ घेतला जातो. ही एक संबंधांत्मक राजकीय प्रक्रिया होती. यामुळे हा मुद्दा सलोखपणे समजून घेतला पाहिजे.

जिजाऊंच्या दृष्टीनं स्वराज्यातल्या वेगवेगळ्या समूहांचे परस्परसंबंध कसे असावेत. तसंच त्यांच्या दृष्टीनं धर्माचं राजकीय व्यवहारातलं स्थान काय होतं. यांचं जिजाऊंचे स्पष्ट आणि चिकित्सक आकलन होतं. कारण, भाषा, धर्म, जातिसंस्था या तीन संदर्भात जिजाऊंचा विचार सामाजिक सलोख्याचा होता.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आशा आहे शेतकरी आत्महत्या थांबण्याची…

समाज प्रबोधन कार्यास वाहून घेतलेली मेघना…

संत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading