October 8, 2024
Konkan Storywriter Siddharth Devdhekar
Home » Privacy Policy » सिद्धार्थ देवधेकर : कोकणचा समर्थ कथाकार
मुक्त संवाद

सिद्धार्थ देवधेकर : कोकणचा समर्थ कथाकार

लेखक म्हणून समाजातील सगळीच उतरंड समजून घेणारे सिद्धार्थ देवधेकर हे कोकणातील आजच्या काळातील महत्त्वाचे लेखक आहेत. सर्व समाजाची व्याममिश्रता समजून घेणारा देवधेकर सारखा गुणी लेखक कोकणच्या आजच्या साहित्य चळवळीने दुर्लक्षित ठेवला आहे.पण पुढील काळात त्यांच्या कथेची दखल एकूणच मराठी साहित्य चळवळीला घ्यावी लागेल हे निश्चित!

अजय कांडर,

आज कोकणात राहून साहित्यलेखन करणाऱ्या साहित्यिकांमध्ये विपुल प्रमाणात कविता लिहिली जाते आहे. पण कथा, कादंबरी, समीक्षा, वैचारिक लेखनाचा अपवाद वगळता वणवाच आहे! पण या अपवादामध्ये कथेत अग्रक्रमाने नाव घ्यावे लागते, ते म्हणजे कोकणचा समर्थ कथाकार म्हणून ज्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि ज्यांच्या कथेची पुढे दीर्घकाळ दखल घ्यावी लागेल असे सिद्धार्थ देवधेकर होत.

शोषित घटकांचं दुःख सांगणे आणि ते वाटून घेणे हा विचार देवधेकर यांच्या कथा लेखनामागे आहे.बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेने म्हणजे कायद्याने जात संपवली; पण आज ती अधिक तीव्रतेने जाणवते आहे. ज्या स्त्रियांचे शोषण होत आहे, त्याही आपल चारित्र्य जपत आहेत. दुःख झेलून स्वाभिमानाने जगणारी माणसं आणि त्यांचा संघर्ष अस सगळ देवधेकर यांच्या कथेत दिसत. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या पिढीतला महत्त्वाचा कथाकार हा जयंत पवार आहे! जयंत पवार यांच्या काही कथा ह्या जागतिक पातळीवरच्या लेखनाशी तुलना कराव्यात अशा आहेत. तर प्रवीण बांदेकर यांनी महत्वाचे लेखन केलं आहे.हे आपल्याला मान्यच करावं लागत. अशी समज असणारे आणि कुणाच्या गटातटाच्या विचाराखाली न येणारे देवधेकर हे या घडीला तरी कोकणातील एकमेव आजचे महत्वाचे कथाकार आहेत.म्हणूनच त्यांच्या लेखनाचे वेगळे अस्तित्व आहे हे आपल्याला मान्य करावे लागते.

देवधेकर सुमारे चाळीस वर्षे कसदार कथालेखन करत आहेत. त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तिसरा प्रसिद्धीच्या मार्गावर आहे;पण त्यांच्या कथालेखनाची हवी तशी दखल घेतली गेली नाही.याची खंतही त्यांच्या मनात आहे.आपल्या लेखननिर्मितीविषयी बोलताना देवधेरकर म्हणतात, मनात घर करणारा, लेखकाला लिहायला भाग पाडणारा विषय असेल तर लेखक लिहितो.माझी कथा अशाच प्रकारे जन्माला येते.एखाद्या माणसाबद्दल कुतूहल का वाटते? तर त्याचे जगणे विलक्षण असते.आपल्याला असं जगता येत नाही.असं जगता आलं असतं तर? किती आनंद झाला असता.या आनंदाचं आकर्षण जसं आपल्याला वाटते तसं दु;खाच्याबाबत असं जगणं आपल्या वाट्याला आलं नाही हे मोठे निसर्गाचे उपकार आहेत, असं माणसाला वाटू लागणे याचा अर्थ त्या दु;खाची तीव्रता आपल्याला भयभीत करते.माझ्या कथेत दु;खी माणसे आहेत. काही अगतिक झालेली वाटतील; पण काही दु;ख झेलून स्वाभिमानाने उभी असलेली दिसतील.माझ्या कथेतल्या स्त्रिया गरीब असल्यातरी चारित्र्याला जपणाऱ्या आहेत.त्यांच्यावर बुद्धाच्या तत्वांचा प्रभाव दिसतो.आपल्या देशातली जातीयता कधीही संपणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याने जातीयता संपवली असली तरी ती सर्वत्र जाणवते. तिची भीषणता कधी कधी कुठेतरी उघड होत असते. त्या समूहात लेखकाचा जन्म झालेला असेल तर तो त्यावरची आपली भावना कधी तीव्र, कधी सौम्य शब्दात व्यक्त करील.तशी माझ्या कथातून ती व्यक्त झाली आहे.

देवधेकर यांना वाटतं, कोकण हा प्रतिभावंत लोकांचा प्रदेश आहे.साहित्यक्षेत्रात अनेक प्रतिभावंत इथे जन्माला आले.पण समकाळात कोकणात कथा क्षेत्रात दमदार लेखन करणारा कोणी दिसत नाही ही उणीव भासत आहे. माझ्या कथा सर्वसामान्य लोकांच्या आहेत.मला कधी कधी वाटतं माझ्या कथेची प्रामाणिकपणे कुणी दखल घेतलेली नाही. का ते मलाच कळले नाही. श्री.देवधेकर कोकणात सक्रीय राजकारणात आहेत.लेखक कोणत्याही क्षेत्रात काम करणारा असो.त्या क्षेत्रातले अनुभव त्याला येत असतात. ते अनुभव विश्व अधिक व्यापक करण्याचं काम राजकारणातील सक्रीयता करत असते, असं त्यांना वाटतं. लेखकाजवळ निरीक्षण करण्याची क्षमता मोठी असेल, तर तो कोणत्याही क्षेत्रातला विषय समर्थपणे हाताळू शकतो.राजकीय कार्यकर्ता म्हणून अनुभव सिद्धता त्यांची मोठी आहे. ते त्यांनी काही कथांमध्ये मांडले आहेच. ‘आऊट’ ही त्यावरची दीर्घ कथा त्यांनी लिहिली आहे. श्री देवधेकर हे एक लेखक, एक माणूस म्हणून अतिशय स्वागतशील आहेत.याचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यात कायम येत असतो. ते म्हणतात, लेखक माझ्या ओळखीचा आहे. माझा मित्र आहे. असा विचारच करीत नाही. तो काय लिहितोय? किती ताकदीचं लिहितोय? विषयाशी तो किती तादात्म्य पावला आहे?पाण्याच्या गहराईसारखा अंदाज येत नाही असं लिखाण कुणाचं वाचलं,की मला खूप आनंद होतो.मी त्याचं कौतुक करतो.भारावून जातो.अशा अनेक देशीविदेशी कलाकृतीने मी थक्क झालो आहे.असं मला लिहिता येणार नाही;पण हे कुणीतरी लिहिलेलं आहे; हेच मोलाचं आहे,असं मला वाटतं.जयंत पवार यांच्या काही कथा मला जागतिक पातळीवरच्या वाटतात.प्रवीण बांदेकर यांनी कोकणातली साहित्यपरंपरा तोलून धरलेली आहे.ही माझ्यादृष्टीने मोठी गोष्ट आहे.

अनेक मोठे लेखक एकमेकांचा द्वेष करतात.कटकारस्थानं करतात.त्याचा काडीचाही उपयोग नाही.तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल ;पण तो मुळात मोठा आहे.त्याला तुम्ही कसे थांबवणार?माणसं मोठी असतात;पण मनानं छोटी असतात. श्री. देवधेकर हे कोकणातील समकालीन काळातील महत्त्वाचे लेखक आहेत;पण तेवढेच ते लेखक म्हणून समाजातील सगळीच उतरंड समजून घेणारे आहेत. म्हणूनच अनेक लेखक स्वतःच्याच जगण्याच्या वर्तुळापुरते मर्यादित राहतात आणि लिहितात पण सर्व समाजाची व्याममिश्रता समजून घेणारा देवधेकर सारखा गुणी लेखक कोकणच्या आजच्या साहित्य चळवळीने दुर्लक्षित ठेवला आहे.पण पुढील काळात त्यांच्या कथेची दखल एकूणच मराठी साहित्य चळवळीला घ्यावी लागेल हे निश्चित!

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत – 9404395155


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading