September 19, 2024
Kalsekar Kavya Award announced to Anuradha Patil Virdhawal Parab
Home » अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर

काळसेकर काव्य पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. सतीश काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख २१ हजार रूपये असे आहे. कवी ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व रोख १० हजार रुपये असे आहे. यापूर्वी वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख, नारायण कुळकर्णी-कवठेकर, वर्जेश सोलंकी यांना काळसेकर काव्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२४ सालचा सतीश काळसेकर काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील (संभाजीनगर ) यांना तर ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार वीरधवल परब (वेंगुर्ला) यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांनी दिली.

मराठीतील ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काळसेकर कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे दिलेल्या देणगीतून मराठी कवितेमध्ये भरीव योगदान दिलेल्या मान्यवर कविला अनुक्रम सतीश आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार देण्यात येतो. मराठी कविता समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ कवीस ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ आणि तरुण कवीस ‘ऋत्विज काळसेकर’ यांच्या नावाने पुरस्कार देण्याची योजना विद्यापीठाने तयार केली आहे. त्यानुसार सन २०२४ सालासाठीचे वरील काव्य पुरस्कार अनुक्रमे पाटील आणि परब यांना देण्यात येत आहेत.

कवयित्री अनुराधा पाटील यांचे ‘दिगंत’ ‘तरीही’, ‘दिवसेंदिवस’, ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’,‘कदाचित अजूनही’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. अनुराधा पाटील यांच्या कवितेने मराठी कवितेत एक वेगळी वाट निर्माण केले आहे. विविध रूपांतील स्त्री जीवनाच्या दु:ख, सोशिकता आणि एकाकीपणाचा उद्गार त्यांच्या कवितेत असला तरीही आक्रोशाची, विद्रोहाची किंवा पराभवाची किनार त्यांच्या कवितेला नाही. अनुराधा पाटील यांच्या कवितेला साहित्य अकादमी पुरस्कार-२०१९, महाराष्ट्र फाउंडेशन तसेच अनेक महत्त्वपूर्ण साहित्य पुरस्कारांनी गौरविले आहे.

‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ कवी वीरधवल परब (वेंगुर्ला) यांना जाहीर झाला आहे. वीरधवल परब यांनी आपल्या कवितेतून सुस्त व्यवस्थेवर उपरोध, उपहासात्मक शब्दांनी परखड भाष्य, तगमग व्यक्त केली आहे. वर्तमानातील समाज स्थिती, बदलांवर निरीक्षणे नोंदवणारी कविता ते लिहीत आहेत. ‘मम म्हणा फक्त’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित आहे.

काळसेकर काव्य पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. सतीश काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख २१ हजार रूपये असे आहे. कवी ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व रोख १० हजार रुपये असे आहे. यापूर्वी वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख, नारायण कुळकर्णी-कवठेकर, वर्जेश सोलंकी यांना काळसेकर काव्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.

या पुरस्कार निवड समितीचे सचिव म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी तर निवड समितीमध्ये सदस्य म्हणून डॉ. नीतिन रिंढे (मुंबई), डॉ. मेघा पानसरे, डॉ. रणधीर शिंदे यांनी काम पाहिले. या पुरस्काराचे वितरण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे लवकरच केले जाणार आहे. अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. शिर्के यांनी दिली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गुढीपाडव्यापर्यंत ढगाळ वातावरण

आमच्या वाटा प्रकाशमान करणारी बत्ती !

आंबा आठवणीतला

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading