June 19, 2024
the-need-to-know-the-reality-for-the-fulfillment-of-the-dream-of-brahma
Home » ब्रह्मसंपन्नतेच्या स्वप्नपूर्तीसाठी…
विश्वाचे आर्त

ब्रह्मसंपन्नतेच्या स्वप्नपूर्तीसाठी…

बाबा महाराज आर्वीकर म्हणतात, ध्यान ही करावयाची गोष्ट नव्हे. सप्रेम ज्ञानच साधकाला, भक्ताला ध्यानारूढ करते शुष्कज्ञान नव्हे ! ध्यान सुरु झाले म्हणजे ज्ञान व ध्यान एकरूप होते.

जैसे स्वप्नामाजि देखिजे । तें स्वप्नीचि साच आपजे ।
मग चेऊनियां पाहिजे । तंव कांही नाही ।। १३२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे जें स्वप्नांत पाहावें, ते स्वप्न आहे तोंपर्यंतच खरे वाटतें, पण मग जागे होऊन पाहावें, तो कांही एक नसते.

स्वप्न पडण्यासाठी झोपी जावे लागते. झोपेत पडणारी स्वप्ने ही बऱ्याचदा दिवसभरात आपण अनुभवलेल्या घटनेशी संबंधीत असतात. जागेपणेही स्वप्ने पाहाण्याची सवय काहींना असते. ते जागेपणेही त्या स्वप्नात वावरत असतात. त्याचा आनंद ते घेत असतात. स्वप्नातून जेंव्हा आपण जागे होतो तेंव्हा काहीच नसते. स्वप्नात आहे तोपर्यंत आपणास ते खरे वाटते, पण जागे झाल्यानंतर सर्व खोटे असल्याचे जाणवते.

स्वप्न चांगलही असू शकते अन् वाईटही असू शकते. चांगले स्वप्न भंगले तर दुःख होते तर वाईट स्वप्नातून जागे झाल्यावर घाबरलेल्या मनाला धीर येतो. परिस्थितीनुसार स्वप्न पडते, अन् परिस्थितीनुसारच त्याचा परिणामही पाहायला मिळतो. अनेकांना स्वप्नात दृष्टांत होतात. सद्गुरु स्वप्नात दृष्टांत देतात. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या या गोष्टी आहेत, पण यातून चांगले घ्यायला हवे. सद्गुरु स्वप्नात येऊन काही बोध शिकवतात. सल्ले देतात. स्वप्नातील दुनियेतून वास्तवात येण्यासाठी हा बोध महत्त्वाचा आहे. आपणाला जागे करण्यासाठीच या घटना घडतात असा सकारात्मक विचार करून योग्य बदल आपल्या जीवनशैलीत आपण करायला हवा.

स्वप्नांच्या दुनियेत राहाण्याची सवय काहींना असते. आपण असे करावे, तसे करावे अशी स्वप्नेच ते पाहात असतात. स्वप्नांची पूर्ती करायची असेल तर वास्तवात येऊन विचार करायला हवा तरच त्याचा खरा आनंद साजरा करता येईल. स्वप्ने जरूर पाहावीत. ही स्वप्ने आपणाला वेगळी प्रेरणा देतात. पण वास्तवात येऊनच त्याची सिद्धी होते, स्वप्नपूर्ती होते. याचे भान ठेवायला हवे.

ब्रह्मसंपन्न होण्याचे स्वप्न प्रत्येक साधक पाहात असतो. हे स्वप्न पूर्ण व्हायचे असेल तर साधकाने वास्तवात राहायला शिकले पाहीजे. वास्तवाची जाणीव करून घ्यायला हवी. अर्थातच साधकाने जागरूक राहून, दक्ष राहून साधना करायला हवी. साधनेत सावधानतेला, दक्षतेला अधिक महत्त्व आहे. ब्रह्मसंपन्नतेच्या स्वप्नपूर्तीसाठी सावधानता साधून येणारे अडथळे दूर करायला हवेत. मनाची स्थिरता तेंव्हाच साधते. मनातील सर्व विचारही तेंव्हाच थांबतात. अर्थात आपण स्वप्नात न राहाता सत्याच्या वाटेवर येतो.

ध्यान करताना अनेकांना झोप लागते. म्हणजे तो ध्यानात नसतो. बाबा महाराज आर्वीकर म्हणतात, ध्यान ही करावयाची गोष्ट नव्हे. सप्रेम ज्ञानच साधकाला, भक्ताला ध्यानारूढ करते शुष्कज्ञान नव्हे ! ध्यान सुरु झाले म्हणजे ज्ञान व ध्यान एकरूप होते. ज्ञान आपला ज्ञानपणा सांडून ध्यानाच्या पांघरूणात आपल्या प्रिय प्रभुंशी क्रीडत असते. हीच ज्ञानाची झोप होय. ही झोप शिणल्याने आलेली नसून चित्ताच्या संतुष्टतेंत हे ज्ञान आपले अस्तित्व ध्यानरुप करते.

आपण सोहमचे ध्यान ज्ञानाने करायला हवे. सोहमशी ज्ञानाने अन् ध्यानाने एकरूप व्हायला हवे. ही एकरुपताच आपणाला आत्मज्ञानाचा बोध देते. हे साध्य साधण्याचे स्वप्न साधक पाहात असतो. पण हे स्वप्नात राहून साध्य होत नाही. यासाठी सोहमशी ध्यानाने अन् ज्ञानाने एकरूपता साधायला हवी. यासाठीच वास्तवात यायला हवे.

राजेंद्र जलादेवी कृष्णराव घोरपडे

Related posts

अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व

श्रावण महिना – आनंदाची उधळण

गर्जे मराठी संस्थेतर्फे स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण उपक्रम

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406