डॉ. प्रदीप ढवळ यांची माहिती; मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागर
- मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन, तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण मराठी साहित्य परिषदेकडून ‘आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन
- ०२ व ०३ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित या साहित्य संमेलनात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा होणार जागर
- ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड, तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उद्घाटक आणि मॉरिशस येथील निशी हिरू या स्वागताध्यक्ष
कोकण मराठी साहित्य परिषदेचे १७ वे साहित्य संमेलन यंदा २ आणि ३ डिसेंबरला मॉरिशस येथे होणार आहे. ‘आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन’असे या संमेलनाचे नामकरण करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा जागर मॉरिशसच्या भूमीवर होणार आहे. याबाबतची माहिती ‘कोमसाप’चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.
साहित्य संमेलनाची माहिती देण्यासाठी डॉ.ढवळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, कवयित्री उषा परब, वास्तुविशारद संदीप वालावलकर आदी उपस्थित होते.
डॉ. ढवळ म्हणाले, ब्रिटिशांनी भारत, चीन व इतर देशातून मोठ्या संख्येने मजूर मॉरिशसला नेले. ही मंडळी नंतर तेथेच स्थायिक झाली. यात मराठी बोलणाऱ्या भाषिकांची संख्या मोठी आहे. मूळ सावंतवाडीच्या शीला बापू ह्या तेथील सरकामध्ये मंत्री होत्या. त्यांनीच तेथे मराठी संवर्धनासाठी मोठी चळवळ उभी केली आहे. बत्तीस वर्षापूर्वी मराठी साहित्य संमेलन मॉरिशसला झाले होते. त्यानंतर आता पुन्हा कोमसापचे १७ वे साहित्य संमेलन मॉरिशसला होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक-लेखक विजय कुवळेकर यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.
डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’ ही संस्था मराठी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर विविध साहित्य संमेलने व साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांद्वारे ‘कोमसाप’ मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी अखंडपणे सक्रिय आहे. मॉरिशस येथील मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट आणि मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेला मॉरिशस येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याकरिता निमंत्रित केले आहे. त्यानुसार मॉरिशसमधील या संस्थांसमवेत ‘कोमसाप’ने येत्या २ व ३ डिसेंबर २०२३ रोजी मॉरिशस येथे दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
या दोन दिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याबरोबरच ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रकाशन व प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असून त्यानंतर ‘देशविदेशातील मराठी भाषेचे जतन’ या विषयावरील परिसंवाद आणि निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘वाचन : बदलता दृष्टिकोन आणि स्वरूप’ या विषयावरील परिसंवादाबरोबरच मान्यवरांच्या मुलाखती तसेच कलाविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांची सत्रे संपन्न होणार आहेत. या संमेलनातून मराठी साहित्य, कला, भाषा व आपल्या संस्कृतीचा सर्जनशील आविष्कार सादर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. ढवळ म्हणाले.
संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर यांच्याविषयी :
पत्रकार, संपादक, कवी, पटकथाकार, अभिनेता, गीतकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या विजय कुवळेकर यांचा जन्म २२ जानेवारी १९५२ रोजी झाला. त्यांनी ‘सकाळ’, ‘लोकमत’ यांसारख्या वृत्तपत्रांचे, ‘झी मराठी दिशा’ या साप्ताहिकाचे आणि ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणून काम केले आहे. ते राज्याचे माहिती आयुक्त राहिले असून सर्जनशील व अभ्यासू लेखक-पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विजय कुवळेकर यांनी ‘सातच्या आत घरात’, ‘रावसाहेब’ यांसारख्या काही चित्रपटांचे लेखन केले आहे. तसेच ‘सरकारनामा’ या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील एका मालिकेत त्यांनी सावरकरांची भूमिकाही केली आहे. कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन यासाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. तसेच ‘पैलू’ या पुस्तकासाठी त्यांना राज्य वाङ्मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बडोदा येथे २०१४ मध्ये झालेल्या २६ व्या सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. ‘संवाद (भाग १ आणि २)’, ‘झुंबर’, ‘शिवार’, ‘अर्घ्य’ ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. विजय कुवळेकर हे आता मॉरिशस येथे होणाऱ्या ‘कोमसाप’च्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.