मी निपाणीची लेक असल्याकारणाने या संमेलनाबद्दल मलाही पहिल्यापासून जिव्हाळा आहे. हा जिव्हाळा आता अजून वृद्धिंगत होणार आहे कारण जे संमेलन इतकी वर्षे दूर उभं राहून पाहत होते त्याच संमेलनात यावर्षी सहभागी होण्याचा मान मिळत आहे. याचा अपार आनंद, अभिमान वाटत आहे. आणि माझी मुलाखत जे घेणार आहेत ते नानासाहेब जामदार आणि रमेश साळुंखे हे माझे देवचंद कॉलेजमधील गुरूजन आहेत. त्यामुळे तो एक वेगळाच आनंद असेल.
सुचिता घोरपडे, कथाकार
संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांची निवड
भाषा ही टिकली पाहिजे , तिचे संवर्धन हे व्हायलाच हवं. कारण मानवाच्या जीवनात या भाषेचे स्थान खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच तर भाषासंवर्धनासाठीचे प्रयत्न आपल्या महाराष्ट्रात तर होत असतातच पण महाराष्ट्राबाहेरही कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात मायमराठीचा गजर होतो. आपली मराठी भाषा टिकावी म्हणून तळमळीने तिथे प्रयत्न केले जातात. १९५६ मध्ये भाषावर प्रांतरचनेत निपाणीसह अनेक मराठी भाषिक गावे कर्नाटकात गेली. सीमावासीयांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक आंदोलने केली, बलिदान दिले. पण सीमाप्रश्न कायमच अधांतरी राहिला. ज्या सीमाभागात आजवर लोकांनी मराठी संस्कृती, मराठी अस्मिता जपली आहे त्या सीमाभागातील मराठी भाषिक आजही आपल्या न्यायासाठी, हक्कासाठी खितपत पडला, उपेक्षित राहिला.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा सीमाभागात निनादात असतात. मायमराठीसाठी केवळ नाराच देऊन न थांबता मराठी भाषेचे जतन व्हावे म्हणून सीमाभागात अनेक साहित्य संमेलने भरवली जातात. बेळगाव, उचगाव, कडोली, सांबरा, येळ्ळूर, माचीगड, कुद्रेमानी, बेळगुंदी, कारदगा अशी अनेक गावे अगदी उत्साहात संमेलन भरवतात.
तर असेच एक संमेलन कारदगा या गावीसुद्धा भरतं. आणि याचं खास कौतुक असे आहे की हे लोकवर्गणीतून भरतं. कष्टकरी वर्गातील सर्वांचाच यात वाटा असतो. एखादा मोठा सण साजरा करावा अशा पद्धतीने हे संमेलन मोठ्या उत्साहात आणि हजारोंच्या उपस्थित साजरे होते. यांची व्यवहाराची भाषा जरी कानडी असली तरी मनाची भाषा मराठीच आहे. म्हणून तर सीमाभागातील प्रत्येकालाच या संमेलनाबद्दल एक आपलेपणा वाटतो.
कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रविवारी (ता. २६) २६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील असून, सकाळी आठ ते रात्री नऊ यावेळेत संमेलन होईल. कै. सत्याप्पा माळी व्यासपीठ डी. एस. नाडगे कॉलेज पटांगणात हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्षा सुनीता कोगले, माजी अध्यक्ष बाळासो नाडगे उपस्थित होते.
काशीद म्हणाले, रविवारी होणाऱ्या या साहित्य संमेलनात सकाळी आठ ते दहा यावेळेत ग्रंथदिंडी, सकाळी साडेदहा ते एक या वेळेत पुणे येथील आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल.
जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे आदी उपस्थित राहतील. कारदगा ग्रामपंचायत अध्यक्षा सुजाता पांडुरंग वडर या स्वागताध्यक्षा असतील. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या ‘खेळ हा जीवनाचा’ या पुस्तकाचा अर्पण सोहळा होणार आहे.
दुपारी एक ते पाच या वेळेत डॉ. रघुनाथ कडाकणे यांचे तंत्रयुगात भाषा व साहित्याचे महत्त्व या विषयावर व्याख्यान होईल. ग्रामीण कथाकार सुचिता घोरपडे यांची प्रा. नानासाहेब जामदार, , डॉ. रमेश साळुंखे हे मुलाखत घेतील. कथाकथनकार हिम्मत पाटील यांचे कथाकथन होईल. सायंकाळी पाच ते सात यावेळेत आबा पाटील, रोहित शिंगे, विश्वास पाटील यांचे कवी संमेलन होईल.
सायंकाळच्या सत्रात प्रा. कपिल पिसे, संदीप काळे, अमृता होगाडे, मयुरी गोंधळी यांच्या आम्ही कलाकार सांस्कृतिक प्रतिष्ठान, इचलकरंजी प्रस्तुत ‘ठेविले अनंत तैशीचे व ‘ये गं ये गं सरी’ या एकांकिका कार्यक्रम होईल. साहित्य विकास मंडळ व पतंजली योग समितीच्यावतीने गुरुवारी (ता. २३) अखेर दररोज पहाटे साडेपाच ते साडेसहा यावेळेत योगशिक्षक बाळासाहेब नाडगे, यशवंत वडगावे यांचे योग प्राणायाम शिबिर होईल. बैठकीस खजिनदार सुभाष ठकाने, भाऊसाहेब शिंदके, महावीर पाटील, कल्पना रायजाधव, सदाशिव पारगावे, कुमार हेगडे, संजय नवनाळे, शिवाजी माने, तुकाराम घुणके, प्रशांत खराडे, रावसाहेब सावंत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. विनोद परीट यांनी आभार केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.