आजकाल जो तो स्वतःवर प्रेम करण्यात दंग असतो. आणि मग दुसरा कुणी आपल्यावर प्रेम करत नाही म्हणून खंत करतो. पण आधी पेरले तरच उगवते त्याच न्यायाने आधी तुम्ही इतरांवर प्रेम करा मग तुमच्यावर इतर करतील. पण आयुष्य एकदाच मिळते म्हणून फक्त आपलाच विचार करण्याची एक नवीन जणू फॅशन झाली आहे. नवीन वर्षांत स्वतःसोबत थोडे इतरांवर पण . प्रेम करण्याचा प्रयत्न करा.
सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी
2021 संपुर्ण वर्षे कोरोनाच्या भिंतीच्या सावटाखाली घालवले. आता उजाडू लागले म्हणता म्हणता ओमेक्रॉनची भिती मनावर रुंजी घालायला लागली.. थोडक्यात काय तर आता मानवाची मनमानी बघून निसर्ग मनमानी करायला शिकलाय. खरे तर विषाणुने बरेच काही नवीन शिकवले. स्वच्छतेच महत्त्व जे गांधीजी आणि आपले सगळे संत महंत खूप वर्षांपासून सांगत होते पण आपण नेहमीच ते अभंग दोहे आणि प्रवचन किंवा किर्तन याकडे दुर्लक्ष केले ते कोरोनाने तुमच्या कडून करवून घेतले.
उघड्या वरची पाणीपुरी तत्सम पदार्थ खाऊन आजारी पडून भरमसाठ पैसे तब्येतीवर खर्च करत होतोच ना ? आता आपोआप ते बंद नाही पण बरेच प्रमाणात कमी तरी झाले. असो. गतकाळात रमण्यासारखे काही नाही पण शिकण्याजोगे खूप काही आहे. आणि ती शिकवण मनात ठेवून आपण धम्माल केली तरच उजाडणारे नवीन वर्ष आपल्याला हर्ष घेऊन येईल. अन्यथा पुनश्च….
प्रत्येक जण नवीन वर्षाच्या संकल्पाची घोषणा करतो. यंदा मी रोज व्यायाम करेल तर कुणी यंदा मी योगा शिकेन. कुणाचा यंदा खूप पर्यटन करेन तर कुणाचा नवीन काही शिकण्याचा संकल्प असतो. पण नव्याचे नऊ दिवस कधी संपतात आणि संकल्पाचे तीन तेरा कधी वाजतात हे कळतही नाही. पुन्हा डिसेंबर उजाडला की आठवण येते. तेव्हा आता नवीन संकल्प करण्यापेक्षा आधीचे अपूर्ण राहिलेले संकल्प पूर्ण करण्याचाच संकल्प करायला काय हरकत आहे ? खरे तर नियमात राहून सगळे काही करता येते.
आणि अजून एक आता मानवाची बदलती जीवनशैली आणि वाढते प्रदूषण देशातील तसेच परदेशातील बदललेले राजकारण..प्रत्येक क्षेत्रात होणारी स्पर्धा या बाबींमुळे हा विषाणू गेला की आपण सुटलो असे बहुतेक नाहीच. एक गेला तर तिथे दुसरा येऊच शकतो. त्यामुळे आयुष्य जसे अनेक संकटे आणि दुःखे आली तरी आपण त्यावर मात करुन जगतो तसेच हे. ठीक आहे मास्क लावूनच बाहेर जायचेय ना ? बाहेर जाणे तर बंद नाही करायचे सांगितले. असा विचार करून बघा ना ?
आणि खूप हजार पाचशे लोक लग्न किंवा तत्सम कार्याला जमून अन्नाची नासाडी व्हायची. तसेच त्यांनी दिलेल्या भेटवस्तू वर तुम्ही नावे ठेवणार आणि तुम्ही दिलेल्यावर ते चर्चा करणार असेच व्हायचे. तेव्हा कमीच पण जे खरेच आपल्या आनंदात आनंदी होतील अशा मोजक्या लोकांना बोलावून जर कार्यक्रम झाले तर दोघांना आनंद होईल. एकमेकांना वेळ देता येईल. नाहीतरी आपण म्हणतोच ना गर्दी नको दर्दी हवे. मग रडता कशाला. आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नियम पाळून आपल्या खऱ्या मोजक्या मित्रांसह सज्ज व्हा. म्हणा…..
तू कसाही ये आम्ही मात्र तुझे आनंदाने स्वागत करू.
तुझे हात हाती धरून हे वर्ष पण मजेत पार करू
सुखदुःखाचा आम्ही आपल्या परीने घालू सुंदरसा मेळ
कुणाला कमी कुणाला जास्त हा नियतीचा असतो खेळ..
आनंद हा कुठून बाहेरून येत नसतो. तो आपल्या आतच आहे. शोधता मात्र आला पाहिजे. आपले स्वतःवर प्रेम हवेच पण ते करताना इतर जवळचे दुःखी होता कामा नये.
आजकाल जो तो स्वतःवर प्रेम करण्यात दंग असतो. आणि मग दुसरा कुणी आपल्यावर प्रेम करत नाही म्हणून खंत करतो. पण आधी पेरले तरच उगवते त्याच न्यायाने आधी तुम्ही इतरांवर प्रेम करा मग तुमच्यावर इतर करतील. पण आयुष्य एकदाच मिळते म्हणून फक्त आपलाच विचार करण्याची एक नवीन जणू फॅशन झाली आहे. नवीन वर्षांत स्वतःसोबत थोडे इतरांवर पण . प्रेम करण्याचा प्रयत्न करा.
कोरोनामुळे जीवन क्षणभंगुर आहे हे अनुभवले आहेच मग आता तेच आपण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करू या. बघा आयुष्य सुंदर आहे. आपण त्याला अर्थपूर्ण करू हाच या नवीन वर्षाचा संकल्प आणि संदेश. आनंदाने म्हणा तर मग दुखभरे दिन बीते रे भैय्या….
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
खूप छान माहिती या निमित्ताने मिळत आहे सर