एकूण स्त्री मनाची वेदना ,संवेदनशीलतेमुळे ओशट होत जाणाऱ्या नात्यांची लक्षात येणारी फसवी प्रतिमा आणि त्या घालमेलीतून अस्वस्थपणे उभे राहिलेले शब्दांचे शिल्प अशा या कविता आहेत..तळागाळातील स्त्री वेदनांची अचूक जाण ,ग्रामीण भागाशी जुळलेली अस्सल नाळ, कवयित्रीची निरीक्षण क्षमता, या सगळ्यांमुळे नात्यांच्या भाव विश्वावर आणि स्त्री मनावर कवयित्री सहजच भाष्य करते.
कवयित्री माधुरी मरकड
अहमदनगर
कवयित्री मनीषा पाटील -हरोलीकर यांचा ‘नाती वांझ होताना ‘हा कवितासंग्रह वाचनात आला. गुढतेकडे झुकणारे मुखपृष्ठ आणि उत्कंठा वाढवणारे शीर्षक, संस्कृती प्रकाशन ने केलेली सुबक बांधणी या संग्रहाच्या सौंदर्यात भर घालतात.
शीर्षक वाचून नात्यांची पडझड झालेल्या कविता असतील असा प्राथमिक अंदाज होता. कोरोनाकाळानंतर माणूस अजूनच आत्मकेंद्री, मतलबी झाला आहे. महामारीने माणसाचे माणूस पण हिरावून घेतले की काय अशी शंका येण्यासारखी सामाजिक परिस्थिती आहे. रक्ताची नाती जन्मभर माणसाच्या अस्तित्वाला चिकटून राहतात. इच्छा असो वा नसो ती नाती सांभाळावीच लागतात. मानलेल्या नात्यांची, मैत्रीच्या नात्यांची, कधी ना कधी एक्सपायरी डेट असतेच आणि त्यापुढे ते नाते एखाद्या ओझ्यासारखे वागवावे लागते. नातं विटून गेले की त्यातून आनंदाचे, उत्साहाचे नवे कोंब उगवणं अवघड असतं. जग रहाटीचा हाच नियम हा कवितासंग्रह शब्दांच्या रूपात वाचकासमोर मांडतो.
या संग्रहात स्त्रीच्या घुसमटीच्या, नात्यांचे विविध पदर दाखवणाऱ्या, तर काही सामाजिक संवेदनशीलता दाखवणाऱ्या कविता आहेत. एकूण ६० कवितांचा संग्रह यामध्ये आहे.
विशेष म्हणजे वांझ नात्यांचे पोस्टमार्टम करताना कवयित्री अर्पण पत्रिका मात्र दोन नात्यांनाच अर्पण करते. समाजाने दिलेलं, रक्ताचं नसलेलं तरीही सगळ्यात जवळच असणार नाते म्हणजे पती,आणि रक्ताच्या नात्यातील भाऊ यांना हा संग्रह समर्पित आहे. यातूनच समुहप्रिय असणाऱ्या मनुष्य प्राण्यासाठी नाती किती महत्त्वाची आहेत हे अधोरेखित होते.
आई मुलीच्या नात्यावर असणारी संग्रहातील पहिलीच कविता लक्षवेधी आहे ‘या भयग्रस्त वर्तमानात ‘मोठी होऊ पाहणाऱ्या मुलीच्या काळजीने आई लिहीते .
माझ्यातील आई राहते सावध
का होतेय असं?
भयावह लाटा आदळतात
मनाच्या काठावर
ओले मन बुरशीग्रस्त
कोणत्या भीतीने? (पृष्ठ १५)
बदलत जाणारा वर्तमान आणि अस्वस्थ करणारा भविष्यकाळ यांच्या मध्यावर एकविसाव्या शतकातील सुशिक्षित, सुजाण मातेची ही अस्वस्थता चिंताजनक आहे. एवढ्या शिक्षित समाजातही मुली सुरक्षित नाहीत हा सगळ्यांसाठीच काळजीचा विषय आहे.
स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला असतो. सदाहरित वनांमध्ये जसे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झाडांना जास्तीत जास्त उंच वाढावे लागते. जास्त अन्न तयार करण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी हा संघर्ष अटळ असतो. जेवढे जास्त उंच तुम्ही जाल, तेवढा उन्हाचा कवडसा तुम्हाला जास्त मिळेल. हा “स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ‘चा खेळ माणसाला पण लागू होतो कवयित्री लिहिते
असतोच की संघर्ष
सदाहरित वनांचाही
ज्याला त्याला हवाच असतो
आपापल्या वाट्याचा सूर्यप्रकाश
आपल्या संसारात
माझं तरी काय आहे
यापेक्षा वेगळं ? (पृष्ठ १७)
‘शापित आईपण’ ही विहिरीवर लिहिलेली हृद्यदावक कविता. किती लेकी विहिरींनी पोटात घेतल्या. विहिरींची जर मुलाखत घेतली तर त्या शापित आईला काय वेदना झाल्या असतील हे कळेल समाजाला..
खरंच जड जात असेल ना
या विहिरींना
लेकीबाळींच्या मरण यातना
संपवण्यासाठी
पदरात घेतलेलं हे
शापित आईपण .. (पृष्ठ २८)
शापित आईपण ,बायका , उंबरठ्याआड, नांदी, आजही बाई सती जातेच की, सावली ही नाही स्वतःची, शोधायला हवे, बायका टाळतात बायकांना, बाई पाऊस वंशाची, बंध इ इ..
कवितांमधून स्त्री मनाच्या कंगोऱ्याचा आयाम कवयित्री मांडते.
उसवत चाललेले नात्यांचे बंध ,अखेरच्या घटका मोजत असलेली मरणासन्न होत चाललेली नाती, बळेच निभावली जाणारी ,सोडता येत नाहीत आणि सांभाळता ही येत नाहीत अशी रक्ताची नाती, पती पत्नी मधील प्रेमाचं नातं ,आई मुलीचं नातं, स्त्री-पुरुष मैत्रीचं नातं, अशा अनेक नात्यांवर कवयित्री सहजच भाष्य करते.
सासर आणि माहेर एकाच गावात असणाऱ्या मुलीच्या नशिबी दोन दिवसांचेही निवांत माहेरपण नसते. माहेरी सतत ती गृहीत धरली जाते.
‘चेहरा हरवलेल्या लेकी’ या कवितेत ही घालमेल व्यक्त होते.
अजीर्ण होतात लेकी
ठसठसत राहते तिचे अस्तित्व
माहेरच्या बदललेल्या उंबरठ्याला
वाळवी सारखी कुरतडत
राहते तिला
ही उपरेपणाची सल.(पृष्ठ७३)
आई-वडिलांनंतर गावातच असणारी लेक माहेरच्या माणसांसाठी अधिकच उपरी होते याची नेमकी सल कवयित्री पकडते.
घराच्या वाटण्या होताना आईच्या मनाची होणारी घालमेल ‘प्रारब्धाच्या सावल्या’ या कवितेत येते.
एका अंगणाची वाटणी होताना
सख्खे दरवाजेही उठतात,
एकमेकांच्या अंगावर
कसे उगवतात त्यांच्या मनात
महत्वकांक्षेचे एरंड
हे कळत नाही विधवा आईच्या
हताश डोळ्यांना.. (पृष्ठ ७१)
मैत्रीच्या प्रांगणातील घुसमटलेपण मांडताना त्यातून येणारी विरहवेदना ‘कोसळत राहते’
कवयित्री लिहिते
जीव लावलेला वारा
जेव्हा जातो निघून
तेव्हा अवघड असते
जीवाला सांभाळणे (पृष्ठ ८३)
एकूण स्त्री मनाची वेदना , संवेदनशीलतेमुळे ओशट होत जाणाऱ्या नात्यांची लक्षात येणारी फसवी प्रतिमा आणि त्या घालमेलीतून अस्वस्थपणे उभे राहिलेले शब्दांचे शिल्प अशा या कविता
आहेत.. तळागाळातील स्त्री वेदनांची अचूक जाण ,ग्रामीण भागाशी जुळलेली अस्सल नाळ, कवयित्रीची निरीक्षण क्षमता, या सगळ्यांमुळे नात्यांच्या भाव विश्वावर आणि स्त्री मनावर कवयित्री सहजच भाष्य करते.
अचूक आशय , विषयाला अनुसरून असणारी साधी, सोपी , सरळ शब्दरचना विचारांची पक्की बैठक या सगळ्यांमुळे बऱ्याचशा कविता मुक्तछंदात आणि काही छंदात असणारा हा कवितासंग्रह नक्कीच वाचनीय आहे.
पुस्तकाचे नाव – नाती वांझ होताना'(कविता संग्रह)
कवयित्री – मनिषा पाटील- हरोलीकर.
प्रकाशन – संस्कृती प्रकाशन, पुणे
किंमत –१५० रुपये
पुस्तकासाठी संपर्कः ९७३०४८३०३२
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.