November 22, 2024
Love Marriage or arrange Marriage article by sunetra Joshi
Home » लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ?
मुक्त संवाद

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ?

शेवटी प्रेमविवाह काय किंवा दाखवून झालेला विवाह असू दे. तडजोडीला पर्याय नाही. दोन व्यक्ती दिवसरात्र एकत्र राहिले की नाते कोणतेही असो तुम्हाला एकमेकांना समजून घ्यावे लागतेच आणि थोडेफार स्वतःला बदलावे लागतेच.
सौ. सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

समोर टिव्हीवर होम मिनिस्टर कार्यक्रम सुरु होता. नेहमीचा पहिला प्रश्न आला वहिनी तुमचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ? आणि माझे विचारचक्र सुरू झाले. खरचं लव्ह मॅरेजमधे तरी आपल्याला पूर्ण माणूस कळतो का ? आजकाल सगळ्यांनाच अरेंज मॅरेज नकोच असते. त्यातही मुलींना ते कांदेपोहे प्रकरण नकोच असते. ते प्रश्न ते अवघडलेपण आणि तो होकार नकार प्रकार..

अर्थात पुर्वी त्याला पर्याय नसायचा. मुली फार शिकत नसत. त्यामुळे मुलांमधे मिसळून त्यांच्याशी ओळख दूरच पण बोलणे देखील नसायचे त्यामुळे लव्ह मॅरेजचे प्रमाण खूपच कमी होते. पण आता मुली उंबरठ्याबाहेर पडल्या. शिकण्यासाठी शहरातच नव्हे तर परमुलखात अगदी परदेशात पण एकट्या वसतिगृहात किंवा खोली घेऊन राहून शिकतात तसेच नोकरी करतात. मग अनायसेच समवयस्क जशा मैत्रीणी होतात तसे मित्रपण होतात. विचार जुळतात.

मैत्री होते आणि त्यातून बऱ्याचदा लग्नापर्यंत नाते येते. आईवडील पण विचार करतात. त्यांना एकत्र आयुष्य काढायचे आहे. मग विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि अगदी कुणी तसा प्रयत्न केला तरी ती मुले आपल्या पायावर उभी असतात त्यामुळे लग्न करतात.

पण सगळ्यांनाच हे कसे जमणार ? प्रेम काही ठरवून करण्याची गोष्ट नाही. शिवाय दोघांनाही एकमेकांबद्दल तसे वाटायला हवे. एखादा मुलगा किंवा मुलगी छान असे म्हणून जर प्रेम करायचे ठरवले तर मग तो व्यवहार झाला. आणि अरेंज मॅरेजमधे तरी काय आईवडील पूर्ण माहिती काढतात मगच तुम्हाला सुचवतात ना? आणि हल्ली मुलगा मुलगी आधी एकमेकांना बाहेर भेटून बोलून आपले जमेल की नाही बघतात मगच पुढे जायचे की नाही ठरवतात. शेवटी प्रेम असतांना किंवा असे भेटताना तरी काय दोघेही आपण किती चांगले आहोत हे दिसण्यासाठी धडपड करतात. आपले प्लस पाॅईंट कसे दिसतील याचीच काळजी घेतात. आणि खरा स्वभाव कळतोच असे नाही. मग आधी आपल्याविषयी पझेसिव्ह असणारा तो किंवा ती लग्नानंतर मात्र संशयी वाटतो किंवा वाटते. म्हणजे जी गोष्ट आधी कौतुकाची वाटते तिचाच त्रास होतो.

आपले आपल्या भावंडांशी नातेवाईकांशी किंवा मित्र मैत्रिणींशी तरी शंभर टक्के कुठे पटत असते? काही गोष्टी जाऊ दे तिला नाही आवडत ना मग नको करू या असे आपण म्हणतोच ना? तेव्हा समोरची व्यक्ती नेहमीच कशी आपल्या मनासारखी वागेल. त्या व्यक्तीने पण तशीच अपेक्षा आपल्याकडून ठेवली तर आपल्याला तरी ते जमणार आहे का ? एकदाच हा विचार पण मनात आणून पहा.

शेवटी प्रेमविवाह काय किंवा दाखवून झालेला विवाह असू दे. तडजोडीला पर्याय नाही. दोन व्यक्ती दिवसरात्र एकत्र राहिले की नाते कोणतेही असो तुम्हाला एकमेकांना समजून घ्यावे लागतेच. आणि थोडेफार स्वतःला बदलावे लागतेच. शिवाय प्रेमविवाहात सुध्दा घटस्फोट होत नाहीत असे मुळीच नाही. कारण शेवटी मनुष्य स्वभावाचा थांग लागणे हे कठीणच. तेव्हा ठरवून विवाह झाला स्वभाव आधी माहित नव्हता असे म्हणून पटत नाही आणि घटस्फोट होतात असे काही नाही. प्रेमविवाह करून सुद्धा तसे होऊच शकते. त्यामुळे अरेंज विवाह करण्यास पण काहीच हरकत नाही. कारण आपल्याला कधी क्षणातही ओळख होते तर कधी वर्षानुवर्षे एकत्र राहून सुद्धा अनोळखी असतो. तेव्हा लक्षात ठेवा की प्रेमविवाह असो कि अरेंज केलेला तुम्हाला तडजोडीला पर्याय नाही. त्यामुळे अरेंज विवाहाला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

सुबोध भावेच्या भावाचे प्रसाद देणारे एटीएम

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading