April 19, 2024
Luminescent powder useful for obtaining clear images of virtual impressions researchers claim
Home » आभासी ठशांच्या सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी ल्युमिनिसंट पावडर उपयुक्त – संशोधकांचा दावा
संशोधन आणि तंत्रज्ञान

आभासी ठशांच्या सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी ल्युमिनिसंट पावडर उपयुक्त – संशोधकांचा दावा

लेटेन्ट प्रकारातील बोटांचे ठसे मिळवण्यात फॉरेन्सिक लॅबला अडचणी येतात. अर्सेनिक पावडला मर्यादा येतात. यावर संशोधकांनी ल्युमिनिसंट पावडरचा उत्तम पर्याय सुचविला आहे. या पावडरने बोटांचे आभासी ठसे सुस्पष्ट व ठळक दिसतात. गुन्हेगारांना शोधण्यात याची मोठी मदत होऊ शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

डाॅ. कल्याणराव गरडकर

मोबाईल 9011087406

वाढत्या गुन्ह्यांच्या घटना विचारात घेता यावर ठोस उपाययोजनांची गरज भासत आहे. चोर, गुन्हेगार यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे लागत आहे. फॉरेन्सिक लॅब बोटांच्या ठशावरून गुन्हेगार आणि चोरांचा शोध घेतात; पण त्यामध्येही अनेक अडचणी येतात. आभासी असणारे बोटांचे ठसे मिळवण्यासाठी अर्सेनिक पावडरचा वापर केला जातो; पण त्यालाही मर्यादा आहेत. यावर काही संशोधकांनी आभासी असणारे बोटांचे ठसे योग्य प्रकारे मिळवण्यासाठी ल्युमिनिसंट पावडरचा पर्याय सुचवला आहे. या पावडरने बोटांचे ठसे स्पष्टपणे मिळतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. या संदर्भात इंडियन सायन्स कॉंग्रेस संघटनेच्या एवरीमॅन्स सायन्स या जर्नलमध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातील अंजू होडा आणि व्ही. बी. टॅस्काक यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

बोटांच्या ठशांचे प्रकार…

बोटांच्या ठशाचे मुख्यतः तीन प्रकार पाहायला मिळतात.

  1. पेटेंट
  2. प्लास्टिक
  3. लेटेंट

पेटेंट प्रकारचे ठसे हे ग्रीस, रक्त किंवा शाईच्या मदतीने डोळ्यांना दिसू शकतील असे करता येतात, तर वॅक्‍स, पेंट किवा साबणावर बोटांनी दाब देऊन प्लास्टिक ठसे तयार करता येऊ शकतात; पण गुन्ह्यामध्ये आढळणारे बोटांचे ठसे हे लेटेंट प्रकारातील असतात. ते वर वर पाहता डोळ्यांना दिसत नाहीत. ते ओळखण्यासाठी विशेष विकसित तंत्र वापरावे लागते. बोटांच्या ठशातील लेटेंट प्रकाराचेही आणखी एक्रिन आणि सेबेशियस हे दोन प्रकार पाहायला मिळतात.

नॅनोफॉस्फरसच्या मदतीने ठशांची ओळख…

लेटेंट प्रकारातील बोटांचे आभासी ठसे नॅनोफॉस्फरसमुळे स्पष्ट दिसतात. कोणतीही व्यक्ती जेव्हा एखाद्या पृष्ठभागाशी स्पर्श करते तेव्हा बोटांचे ठसे त्या वस्तूवर उमटतात. ते आभासी असतात. गुन्ह्यांचा तपास करताना हेच ठसे शोधले जातात व त्यावरूनच गुन्ह्याचा तपास केला जातो. यासाठी लेटेंट प्रकारातील हे आभासी ठसे योग्य पावडर साहित्याचा वापर करून दृश्‍य केले जातात.

ठसे शोधणाऱ्या पावडरचे मुख्यतः तीन प्रकार आहेत. मेटॅलिक, रेग्युलर आणि ल्युमिनिसंट. मेटॅलिक पावडरमध्ये सोने आणि चांदीचा वापर असतो. त्यामुळे ही पावडर आरोग्यास अपायकारक ठरू शकते, तर रेग्युलर पावडरमध्ये रंगद्रव्ये असतात. त्यामुळे या दोन्हींचा वापर अवघड ठिकाणाचे लेटेंट प्रकाराचे ठसे शोधण्यासाठी अडचणीचा ठरतो. या मर्यादा विचारात घेता ल्युमिनिसंट पावडरचा वापर गरजेचा ठरतो. कारण रंगीत पृष्ठभागावरही या पावडरचा वापर होऊ शकतो.

नॅनो फॉस्फरस पावडर म्हणजे नेमके काय ?

या संदर्भात माहिती देताना शिवाजी विद्यापीठातील प्रा. कल्याणराव गरडकर म्हणाले की, बोटांच्या ठशामध्ये 98 टक्के पाणी आणि 2 टक्के सेंद्रीय घटक असतात. त्यामुळे आभासी ठसे दृश्‍य करण्यासाठी हायड्रोफिलिक पावडरचा वापर करण्यात येतो. हायड्रोफिलिक असणाऱ्या या पावडरचा आकार 10 ते 100 नॅनोमीटर इतका असतो. ही पावडर सूर्यप्रकाश शोषते व अंधारात त्याची प्रतिमा स्पष्ट दिसते. या क्रियेला नॅनो फॉस्फरन्स असे म्हणतात. संशोधकांनी या प्रयोगासाठी इरोपियम डोप्ड लॅन्थॅनम मॉलिबडेनम ऑक्‍साईड याचा वापर आभासी ठसे दृश्‍य करण्यासाठी केला आहे.

लेटेन्ट ठशांची प्रतिमा कशी मिळवायची…

इरोपियम डोप्ड लॅन्थॅनम मॉलिबडेनम ऑक्‍साईड ही नॅनो फॉस्फरस पावडर घेतली जाते. याचा आकार साधारण 10 – 20 नॅनोमीटर इतका आहे. ही पावडर बोटांचे ठसे जिथे उमटले आहेत, त्या ठिकाणी ब्रशने हळूवार लावली जाते. त्यानंतर हे ठसे अल्ट्रा व्हायलेट (युव्ही) लाईटखाली ठेवले जातात. वापलेले मटेरियल फॉस्फरंट असल्यामुळे प्रकाश शोषते व बाहेरही टाकते. घामामुळे व तेलामुळे तयार झालेल्या आभासी रेषा या प्रकाशात दिसायला लागतात. याची छायाचित्रे घेऊन त्याचे पृथक्‍करण केल्यास बोटांचे ठसे अचूकपणे ओळखण्यास मदत होते. कारण ही पावडर घामाबरोबर सहजासहजी चिकटते आणि त्याची ठळक आणि स्पष्ट प्रतिमा दिसते. या मिळालेल्या प्रतिमेला बोटांच्या ठशाची लेटेन्ट प्रतिमा असे म्हणतात.

कोल्हापुरातील संस्कृती, ताज्या घडामोडी आदी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा कोल्हापूर प्रतिबिंब फेसबुक पेजवर
https://www.facebook.com/groups/KolhapurCulture/

Leave a Comment