गुलाब बिसेन हे व्यवसायाने शिक्षक आहेत. सतत उपक्रमात स्वत: बरोबर विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात ते गर्क असतात. पुस्तकी ज्ञाना बरोबर विद्यार्थ्यांत सामाजिकता निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नरत असतात. त्यांच्या या कथासंग्रहात एकुण सहा कथा आहेत.
बबन शिंदे,
कळमनुरी, जि. हिंगोली मो. नं. 95278 68181
बालकांना कथा खूपच आवडत असतात. ते कथा वाचण्या ऐकण्यासाठी नेहमीच आतूर असतात. ते अनेकदा आजीआजोबांना कथा सांग म्हणून भंडावून सोडत असतात. कथेमुळे बालकांचे मनोरंजन होते, ज्ञानात भर पडते. त्यांची श्रवण क्षमता विकसित होत असते. सामाजिक समज येते. सत्यअसत्याची जाणीव होते.
बालकाव्याच्या तुलनेत कथांची संख्या वा कथा लेखकांची संख्या नगण्य आहे. पण त्यात एक जमेची बाब म्हणजे बालसाहित्यात दमदार कथालेखकांची भर पडत आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे गुलाब बिसेन होय. यापूर्वी त्यांनी “पोवारी” भाषेतून कथा लेखन केले आहे. आपल्या बोली भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी ते नेहमीच धडपडताना दिसतात. ते हाडाचे शिक्षक आहेत. सातत्याने विद्यार्थ्यांना नवीन काय द्यावे ? कसे द्यावे ? याच्या ते शोधात असतात. एक उपक्रमशील शिक्षक म्हणूनही त्यांचा नावलौकीक आहे. नुकताच त्यांचा ‘बाबांची सायकल आणि इतर कथा’ हा बालकुमार कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. यापूर्वीही त्यांनी बालकांसाठी कविता, कथा लिहून बालकांचे मनोरंजन केले आहे.
“बाबांची सायकल आणि इतर कथा’ या संग्रहात रेनकोट नावाची पहिली कथा आहे. छत्री, बॅग, रेनकोट, टिफीन या बाबींवर बालकांचे प्रचंड प्रेम असते. त्याला ते अगदी मनापासून आवडत असतात. कथेचा नायक पण त्याला अपवाद नाही. तो जेव्हा रेनकोट घ्यायला बाजारात जातो तेव्हा त्याला त्याचा वर्गमित्र बिट्टू वडिलांना फणस विकायला मदत करताना दिसतो. तेव्हापासून त्याचे अवसान गळायला सुरुवात होते. आपल्या बाबाच्या मर्जीप्रमाणे न वागता तो त्यांना नवा रेनकोट घ्यायला भाग पाडतो. याचे त्याला वाईट वाटते. तो आपला जुना रेनकोट स्वतः वापरून नवा बिट्टूला देऊ करतो. पण स्वाभिमानी बिट्टू ते घेत नाही. शेवटी रजत स्वतःचा नवा रेनकोट परत करतो आणि जुना वापरायला सुरुवात करतो. बिट्टमुळे त्याला इतरांच्या परिस्थितीची जाणीव होते. कथाकार गुलाब बिसेन यांनी बालकांना सरळ उपदेश न करता बिट्टूच्या माध्यमातून बरेच काही शिकवले आहे.
‘बाबांची सायकल’ ही कथा एका दारुड्या वडिलांची आहे. व्यसनापायी ते सर्वस्व गमावून बसतात. पण सुषमा या गुणी पोरीमुळे त्या परिवाराचे नाव सर्वत्र चर्चेत येते. सुषमाचे बाबा सुषमाच्या आईने हरीला सायकल मला न विचारता का दिली. ती सायकल हरीच्या अनावधानाने चोरीला गेल्याने बाबा क्रोधित होऊन आईशी भांडतात. गुणी असणाऱ्या सुषमाला ने आवडत नाही. सर्वगुणसंपन्न असणारी सुषमा जिद्दीला पेटून उठते. तनमनाने अभ्यास करून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या यादीत येते त्यातून मिळालेल्या बक्षीसाच्या पैशातून बाबांना सायकल घेऊन देते. यातून तिची हुशारी, जिद्द, अभ्यासू वृत्ती, आज्ञाधारकपणा दिसून येतो. इतर विद्यार्थ्यांनी तिच्यासारखे बनावे. आपले व आपल्या आईवडिलांचे नाव लौकिक करावे. असे कथाकाराला वाटते. त्यांनी वाचकांना सरळ सल्ला न देता, उपदेश न देता कथेच्या माध्यमानून समजावण्याचा छानसा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे कसब कौतुकास्पद आहे.
‘हिरू’ ही कथा एका सामान्य विद्यार्थ्याची आहे. त्याच्या अंगी असणार्या सद्गुणांमुळे तो शाळेचा कसा हिरो बनतो हे वाचकाला यातून अनुभवायला मिळते. सुरुवातीला लाजराबुजरा असणारा हिरु प्रत्येकाच्या ह्रदयात कशी जागा मिळवतो. सर्वांचाच चाहता बनतो, फॅन बनतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्याकडे असणार्या सुप्त गुणांचा विकास करावा. गुणवंत विद्यार्थी सर्वांनाच आवडत असतात. सद्गुणामुळे आपण यशाचे शिखर गाठू शकतो. आपल्या आईवडिलांचे नाव लौकिक करू शकतो हे कथाकाराला यातून सुचवायचे आहे.
“मंग्या’ ही कथा प्रामाणिक मेहनत करून पोटभरणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. तो शाळेत हुशार आहे. आज्ञाधारक आहे. खेकडे कसे पकडतात हे त्याला त्याच्या वडिलांकडून शिकून घ्यायचे म्हणून तो त्यांच्यासोबत जातो. पण, घरी परतताना तो काही टवाळखोर मुलांच्या नजरेला पडतो. त्याला शिक्षा व्हावी या उद्देशाने बब्या आणि सुन्या हे अवकाळी मुले त्याला उचलून सरांच्या समोर हजर करतात. सर त्याच्या पिशवीतील खेकडा बाहेर काढून त्याच्याबद्दल माहिती देतात. परिसर अभ्यास हा विषय शिकवताना खेकड्याचे प्रात्यक्षिक मंग्याला दाखवतात. मंग्याला हायसे वाटते तर टवाळखोर नामोहरन होतात. ‘विद्वान सर्वत्र पूजिते’ हे या कथेतून सिद्ध होते.
‘सूर जुळले’ या कथेच्या माध्यमातून कथाकाराने पाऊस आल्यावर शाळेतील मुलांची व शिक्षकांची कशी फजिती होते हे दाखवून दिले आहे. बाहेर खेळायला बागडायला न मिळाल्यामुळे कसा हिरमोड होतो हे या कथेच्याद्वारे व्यक्त केले आहे.
‘छोटा संशोधक’ ही कथा बालकुमारांना प्रेरणा देणारी आहे. कारण विनयच्या प्रयोगाला जिल्हास्तरीय बक्षीस मिळाले होते. तो ग्रामीण भागातला असला तरी मेहनती, अभ्यासू, जिद्दी असल्याने त्याला हे यशाचे, शिखर गाठता आले. पुराची पूर्वकल्पना देणारे यंत्र त्याने बनवले होते. त्याच्या प्रयोगाने अनेकांना हुरूप आला होता. आपण कुठेही राहात असलो तरी प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात त्याप्रमाणे कठोर प्रयत्न केल्यास यश मिळते. असे कथाकार गुलाब बिसेन यांनी मुलांना सुचवले आहे.
आपल्याकडे गुन्हेगारांना अनेक शिक्षा ठोठावल्या जातात पण गुलाब बिसेन यांची “हिरवी शिक्षा” ही कल्पना जरा हटके आहे. म्हणजे वर्गात चिंचा वा इतर कोणतेही फळ खाल्ले तर सर त्याला उठ बशा, कोंबडा, छड्या खाणे वगैरे शिक्षा करतात. पण हिरवी शिक्षा या कथेतील गुरुजी फळाच्या बिया जमा करून त्याचे झाडात रूपांतर करायला लावतात. येथे पर्यावरण पुरक वातावरण उपलब्ध करून देण्याची न कळत कल्पना दिली आहे.
गुलाब बिसेन हे व्यवसायाने शिक्षक आहेत. सतत उपक्रमात स्वत: बरोबर विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात ते गर्क असतात. पुस्तकी ज्ञाना बरोबर विद्यार्थ्यांत सामाजिकता निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नरत असतात. त्यांच्या या कथासंग्रहात एकुण सहा कथा आहेत. कथा दैनंदिन जीवनानील आहेत. मुलांना प्रेरक ठरतील अशा आहेत. कथा ग्रामीण जीवनाशी निगडीत आहेत. कथेचे नायक ग्रामीण भागातील असून सरळमार्गी जीवन जगणारे आहेत. सत्याशी ते एकनिष्ठ आहेत. कष्टाळू, जिद्दी आणि प्रामाणिक आहेत. सतत धडपडणारे आहेत. कथा कल्पनेच्या भरार्या घेणार्या नसून वास्तवाला कवटाळणाऱ्या आहेत. सर्वच स्तरातील वाचकांना या कथा आवडतील यात दुमत असण्याची शंकाच नाही. पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ, डाॅ. सुरेश सावंत यांची प्रस्तावना आणि मलपृष्ठावर एकनाथ आव्हाडांची पाठराखण यामुळे पुस्तकाला नक्कीच महत्व प्राप्त झाले आहे.
बबन शिंदे,
कळमनुरी, जि. हिंगोली
पुस्तकाचे नाव – बाबांची सायकल आणि इतर कथा
लेखक – गुलाब बिसेन
प्रकाशक – जेके मिडिया, ठाणे
पृष्ठे – ६२
मुल्य – १००/- रू.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.