April 26, 2024
Maharashtra Goverment award to Mangaon Parishad Book of Uttam Kamble
Home » “… हा तर माणगाव परिषदेचा सन्मान!!!”
सत्ता संघर्ष

“… हा तर माणगाव परिषदेचा सन्मान!!!”

माणगाव परिषद हा केवळ एक इव्हेंट नव्हता, तर शंभर वर्षांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि एका नव्या परिवर्तन पर्वाची सुरवात होती. हा सारा गाभा समजून घेण्यासाठी ‘अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद’ वाचणे अगत्याचे ठरते.

डॉ. अलोक जत्राटकर

मोबाईल – 8698928080

महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात आमचे पत्रकारितेसह आयुष्याचेही मार्गदर्शक, गुरू साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या ‘अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद’ या ग्रंथाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ जाहीर होणे, हा एक आगळा संकेत आहे.

या पुरस्कारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कांबळे म्हणाले, “मला या आधीही पुरस्कार मिळाले आहेत, त्यामुळे पुरस्काराचे अप्रूप नाही. यंदा ‘माणगाव परिषदे’ला पुरस्कार मिळाला, हा खरा त्या परिषदेचा सन्मान आहे.”

प्रतिक्रिया देताना त्यांच्या बोलण्यातून केलेल्या परिश्रमाचे सार्थक झाल्याची कृतज्ञता पाझरत होती. ‘अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद’ हे लोकवाङ्मय गृहाकडून प्रकाशित केलेले असून त्यात कांबळे यांनी १८२० ते १९२० या शंभर वर्षांतील माणगाव परिषदेच्या पूर्वपिठिकेचा समग्र वेध घेतला आहे. कोणतीही क्रांतीकारी घटना किंवा एखाद्या क्रांतीकारकाचा, महापुरूषाचा जन्म ही काही आकस्मिक गोष्ट नसते, तर ते तत्कालीन समाजाचं, परिस्थितीचं अपत्य असतं. अशा घटनांच्या प्रसववेदना अनेक दिवस सुरू असतात.

माणगाव परिषदेच्या जन्मकळाही शंभर वर्षं अगोदर अस्वस्थ शतकाच्या पोटात सुरू होत्या. बाबासाहेब काय, महाराज काय किंवा त्यांचे महागुरू महात्मा फुले काय, ही सारी त्या अस्वस्थ शतकाची, परिस्थितीची बंडखोर लेकरं आहेत. वैश्विक हालचालींशी त्यांनी नातं जोडलेलं आहे किंवा ते ओघानंच तयार झालेलं आहे. माणगाव परिषदेच्या शंभर वर्षं आधी म्हणजे १८२० म्हणजेच एकोणिसाव्या शतकापासून जग अधिक अस्वस्थ झालेलं. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ही अस्वस्थता झळकणारी. जगभर तिचे पडसाद उमटले. मानवमुक्ती, धर्मसुधारणा, समाज सुधारणा या क्षेत्रात तर या अस्वस्थतेची धग जास्तच पसरलेली. आणि माणगाव परिषद हा त्या जगभरच्या अस्वस्थतेचा एक परिपाक.

पुढं येणाऱ्या भावी चळवळीसाठी, लढायांसाठीची ती एक विषयपत्रिका आहे. आम्ही येतोय, आम्ही जागे होतोय, आम्ही लढतोय, असं निर्धारपूर्वक सांगणं आहे. व्यवस्थेला इशारा आणि हादरा आहे. धगधगते क्रांतीकारी विचार मुठीत घेऊन मुक्तीच्या प्रवासाकडे पाऊल टाकणं आहे. विचारांच्या जोरावर घडवून आणलेलं एक नवं युग आहे. आपण त्यास फुले, शाहू, आंबेडकरांचे युग म्हणतो. या पार्श्वभूमीवर झालेली माणगाव परिषद म्हणजे केवळ बहिष्कृतांचे एकत्रित येणं अगर शक्तीप्रदर्शन नव्हतं, तर तो एका मोठ्या परिवर्तनाचा प्रारंभ होता. या समग्र परिवर्तनाचा कॅनव्हास उत्तम कांबळे यांनी या सुमारे २५० पानांच्या पुस्तकामध्ये चितारला आहे.

मूलतत्त्ववाद हातपाय पसरत असल्याच्या काळात, प्रतिक्रांती उचल खात असल्याच्या काळात लिहीलेल्या या ग्रंथाद्वारे ज्यांच्या डोळ्यांवर जातींचे, गटांचे मोतीबिंदू वाढत आहेत, ते हलावेत, ही अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली आहे. माणगाव परिषद हा केवळ एक इव्हेंट नव्हता, तर शंभर वर्षांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि एका नव्या परिवर्तन पर्वाची सुरवात होती. हा सारा गाभा समजून घेण्यासाठी ‘अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद’ वाचणे अगत्याचे ठरते. आता पुरस्कारामुळे त्या अगत्याची तीव्रता निश्चितपणाने वाढेल, अशी अपेक्षा…

Related posts

निरोगी करडांसाठी अशी घ्या शेळ्यांची काळजी

बोलीचा नाद : डंके की चोट पर

करना है, कुछ करके दिखाना है…

Leave a Comment