डाॅ. योगिता राजकर यांचे “बाईपण” हे पुस्तक आज प्रभा प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने….
इंदुमती जोंधळे
डाॅ. योगिता राजकर यांचे “बाईपण” हे दीर्घकाव्य म्हणजे समग्र बाईपणाच्या जगण्याला भिडणं आहे. स्त्रीचं कांडून घेणं, जळत राहणं, वेदनेतही संसार सुखी कसा करायचा ते ती शिकवत आली आपल्याला.
‘वाहे डोळ्यातून पाणी / करी मोकळे मनास/
नदीपाशी बोलुनिया/ बाई राखते जीवास !
‘वेदनेचा हा कल्लोळ या चार ओळीत अतिशय टोकदार पद्धतीने कवयित्री मांडते.
स्त्रीविषयीची अनितीमान संस्कृती या काव्यातून प्रतिबिंबीत होते. सर्जनक्षमतेच्या साम्य स्थळांवर माती लोटून , ती माती कपाळाला लावणाऱ्या ढोंगी संस्कृतीचे वाभाडे काढणारी डाॅ. योगिता यांची ही कविता आहे. ‘बाईपण’ आणि तिच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न केवळ स्री मनाभोवती कोरलेले नसून एकूणच स्री यातनेचा धांडोळा घेणाऱ्या , गुंता सोडविणाऱ्या मनस्विनीचे ते काव्यरुपी मनोगत मराठी काव्यात नक्कीच वेगळे मर्म सांगणारे आहे. कवयित्रीची शब्दकळा अल्प शब्दात मोठ्ठा आशय सांगणारी किमयाच आहे. स्री मुक्त्तीचा मार्ग सांगत सांगत स्रीवादी समीक्षेला एक प्रकारचे हे आव्हानच दिलेले आहे.
स्रीच्या बाबतीत संत नेमके काय सांगतात आणि प्रत्यक्ष वास्तवात नेमके काय आहे ? याचे भानतत्त्व ही कविता देते. ती स्वतःचा गौरव करीत नाही वा मोठेपणाही मिरवत नाही, स्वतःच्या ऋचेत ही कविता स्रीचे अंतरिक्ष कमीत कमी आणि चपखल शब्दात मांडत वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते. कवयित्रीच्या शब्दकळेतून सत्ता, समाज, आणि संस्कृतीचे होणारे सम्यक दर्शन प्रत्येकाने आरशासमोर उभे राहून पहावे असेच आहे, तरच आपली दुखंडी प्रतिमा समजून येईल आणि कळेल बाई किती प्रकारे स्वतःलाच मुडपत राहते, ते पुढील चार ओळीतून कळून येईल.
‘गोष्टी ओठातल्या किती /पोटामधी लपविल्या/
कुंकवाच्या लालीमधी /वेदनाही रक्त्ताळल्या.’
डाॅ. योगिता यांच्या या कविता संग्रहातून त्यांची काव्य प्रगल्भता, संवेदनशीलता, स्रीसुलभ भावुकता त्यांच्या अनुभव विश्वाच्या सामर्थ्यातून यथार्थ अल्प शब्दात मांडते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.