September 24, 2023
Maintenance of Mind Sunetra Joshi article
Home » मेंटेनन्स…
मुक्त संवाद

मेंटेनन्स…

तेलपाणी दिल्यावर जशा वस्तू कुरकूर न करता सुरळीत चालतात. तसे नाते पण छान बहरेल.तेव्हा जे अजून बिघडले नाही ते त्या आधीच तपासून बघा म्हणजे डागडुजी करावी लागणार नाही.

सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी
मोबाईल 9860049826


छे बुवा.. नेमका आताच हा मिक्सर बिघडावा ? खरे तर घेऊन सात वर्षे झाली कधी बिघडला नव्हता.. अग पण मधे कधी सर्व्हिसींग केले का ? छे.. बिघडलाच नाही कधी मग काय गरज ?
बाबा.   गाडी सुरुच होत नाही… अरे सर्व्हिसींगला टाकायला झाली आता.. नुसती दामटवता अशी तशी… शेवटी यंत्र आहे ते. वेळेवर तेलपाणी द्यायला हवे रे….

आई हा गुलाब आता काढून टाक नुसताच वाढतोय फुले काही येत नाहीत.. अरे त्याला छाटून थोडे खत वगैरे घाल. बघ कसा बहरेल…
अनु अग मुंबईला तुझा तो चुलत भाऊ राहतो ना ग… त्याला सांगू या का आपल्या महेशसाठी जागा बघायला… हो राहतो ना.. पण इतक्या वर्षात कधी गाठभेट नाही की आपण फोन सुध्दा केला नाही. ना त्याचा आला. मग एकदम कामाचे सांगायचे म्हणजे बोलायला अवघड वाटते हो…. हं… ते ही खरेच… एरवी या गोष्टी लक्षातच येत नाही…

बाबा… आता घरात थोडे बदल करायला हवेत. किती वर्षे झाली. इकडे एक सिंक हवे. टाॅयलेटच्या टाईल्स बदलायला हव्या…. चिनु बोलत होता.
ताई शिडी आहे का ? किंवा उंच स्टूल… लाईट फिटींगचे काम करायला आलेला इलेक्ट्रिशियन विचारत होता.. मी म्हटले नाही.. तर म्हणाला शेजारी असेल तर बघा ना.. मला प्रश्न पडला एरवी आपले साध्या शब्दाने त्यांच्याशी बोलणे नसते. एकदम काही मागायला कसे जावे…

असे एक ना दोन नाही कित्येक प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात घडतात. आणि मग उत्तर काय मिळते ? तर… अनुचे विचारचक्र गरगर फिरायला लागले. हात निमुटपणे आपले काम करत होतेच पण मनात विचार सुरूच होते. आपल्या जवळ असलेल्या निर्जीव वस्तुंकडेच नव्हे तर आजुबाजुच्या सजीवांकडे पण अधून मधून लक्ष द्यायला हवे. डागडुजी करण्याची वेळ येण्याच्या आधीच थोडे लक्ष द्यायला हवे.

खरेच यंत्रांची जशी डागडुजी महत्वाची तशीच नात्यांची पण हवीच ना ? म्हणुनच बहुतेक पुर्वी लग्न कार्यात सगळे एकत्र यायचे. मानपान व्हायचे. कामात मदतही करायचे. आणि एकमेकांची मदत घेताना त्यात कसनुसं नाही व्हायचं तर हक्काने सांगितले जायचे…

मामी तू हे करुन आण… किंवा काका मला तुझ्याकडून हे हवयं हं… कारण आपण जितक्या हक्काने त्याला सांगायचो. तेवढ्याच हक्काने तिकडे मदत पण करायला जायचो. शिवाय उन्हाळ्यात किंवा दिवाळीत पण नातेवाईकांकडे जाणे येणे आणि देवाण घेवाण असायची. आणि अशाप्रकारे नात्याला अधुनमधून स्नेहाचा आपुलकीचा ओलावा मिळत राहिल्याने ते नाते नुसतच जिवंत नाही तर टवटवीत रहायचे… आणि प्रेम शब्दातून नाही तर वागणुकीतून जाणवायचे.

आज आपल्याला एखादे काम कुणाला कसे सांगू असे वाटते कारण आपण कारणाखेरीज सहज असे संबंध कुणाशी प्रस्थापित करतच नाही.. जाऊ दे त्याच्याशी काय काम पडणार आहे आपले? असे म्हणून चक्क दुर्लक्ष करतो… मग वेळ पडल्यावर काय करावे असा प्रश्न निर्माण होतो. तर कधीतरी आपल्याला वेळ असेल तेव्हा नातेवाईक किंवा मित्रमंडळींशी फोनवर संवाद तर साधाच. पण कार्य प्रसंगी थेट जाऊन भेटा सुध्दा. आणि वेळ असेल तर नुसतेच सुद्धा तुमची आठवण झाली म्हणून आलो असे सांगून भेटून तर बघा. आपण सुद्धा तेवढेच मोकळे होतो. आभासी मित्र खूप असतात पण ते प्रत्यक्षात मदतीला येणे विरळच उदाहरण सापडते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने  एक उर्जा मिळते.

तर वेळोवेळी जसे आपण शरीराचे मेडीकल चेकींग करतो तसेच नात्यांचे सुध्दा करायला हवेच. कुणी आपल्या पासून दूर जात नाही ना हे बघायला हवे..आणि तसे आढळले तर विचारून योग्य वेळी मनातले गैरसमज मिटवण्याचे प्रयत्न पण करायला हवे. म्हणजे तेलपाणी दिल्यावर जशा वस्तू कुरकूर न करता सुरळीत चालतात. तसे नाते पण छान बहरेल.तेव्हा जे अजून बिघडले नाही ते त्या आधीच तपासून बघा म्हणजे डागडुजी करावी लागणार नाही. कारण नंतर कितीही लिंपले तरी तो कोपऱ्यातला पॅच दिसतच राहतो रफ्फुसारखा. मग वाट कसली बघताय? 

Related posts

Photos : भूतकाळातले रमणे…

सत्य -असत्याची ग्वाही : चारोळी संग्रह अंतर-मंतर

मराठीची एक प्रगत बोली – मालवणी

Leave a Comment