ज्ञानरुपी सेवा म्हणजे ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन. मराठीत ज्ञान देणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पारायणातून, वाचनातून आपण त्या ओव्या आत्मसात करायच्या आहेत. या ओव्यांचे अर्थ समजून घेऊन त्याची अनुभुती घेऊन आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायचा असतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
चैतन्याचिये पोवळी । माजी आनंदाचां राऊळी ।
गुरुलिंग ढाळी । ध्यानामृत ।। 385 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – अथवा ज्ञानाच्या आवारांत असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये, गुरुरुपी लिंगाला ध्यानरुपी अमृताचा अभिषेक करतो.
सद्गुरुंच्या समाधीला आपण दुग्धाभिषेक करतो. दुधामुळे समाधीचे सौंदर्य अधिक खुलते, उजळते. समाधीला तेज येते. मुर्तीलाही अभिषेक केल्यानंतर मुर्तीचे तेज चकाकते. ही रासायनिक प्रक्रिया आहे. समाधीचे सौंदर्य हा बाह्यरुपाचा भाग आहे. पण समाधीचे सौंदर्य अंतरंगातून खुलवायचे असेल तर त्यासाठी सद्गुरुंना अभिप्रेत असणाऱ्या अभिषेकाचीच गरज आहे. सद्गुरुंना ध्यानरुपी अभिषेक आवडतो. त्यातूनच त्यांना उर्जा मिळते. ध्यानातून प्रगट होणारे अमृत सद्गुरुच्या समाधीला संजिवनी देते. यासाठी ध्यानरुपी अभिषेक नित्य नियमाने करायला हवा.
ध्यानाने, साधनेने अनेक गोष्टी साध्य होतात. दररोजच्या ध्यानाने शरीराची त्वचा तजेलदार होते. ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याप्रकारचे तेज येते. बाह्य आणि अंतरंगातील अभिषेक याचे महत्त्व विचारात घ्यायला हवे. बाह्यक्रियेतून अंतरंगातील क्रियेची अनुभुती कशी मिळते हेही लक्षात घ्यायला हवे. बाह्यरंगातून अंतरंगातील क्रिया समजून घ्यायला हव्यात. अभिषेक हे त्यामागचे एक उत्तम उदाहरण आहे.
स्वामीचिया मनोभावा । न चुकीजे हेचि परमसेवा ।। स्वामींचा मनोभाव ओळखता यायला हवा. त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ समजून घ्यायला हवा. स्वामींच्या मनाप्रमाणे सेवा द्यायला हवी. तरच ती त्याचा स्विकार करतील. अन्यथा आपण सेवा करत राहू पण त्याचे फळ कधी मिळणार नाही. झाडाच्या मुळाशी पाणी घातल्यानंतर झाडीची वाढ झपाट्याने होते. कारण त्याच्या मुळांना पाण्याची गरज असते. मुळे सोडून पाणी दिल्यास झाड वाढणार कसे. मुळे प्रयत्न करतील त्या पाण्यापर्यंत पोहोचण्याचा पण मुळांना पाणीच लागले नाही तर झाड सुकणार. हे विचारात घेऊन कृती करायला हवी. सद्गुरु शिष्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतात पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत याची काळजी शिष्याने घ्यायला हवी. यासाठी योग्य कृतीची गरज आहे.
स्वामींना समाधी अवस्था खूप प्रिय असते. या अवस्थेसाठी ते नित्य सेवेत असतात. या अवस्थेतून मिळणारा आनंद त्यांनी समाधी अवस्था प्राप्त करून देतो. ज्ञानरुपी सेवा, ध्यानरुपी सेवा यातून शिष्य सद्गुरुपदापर्यंत पोहोचावा हा त्यांचा प्रयत्न असतो. यासाठी सेवेचा मुळ उद्देश समजून घ्यायला हवा. सेवा ही सद्गुरुंच्यासाठी नसते तर शिष्याच्या प्रगतीसाठीच असते. शिष्याची अध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी असते.
ज्ञानरुपी सेवा म्हणजे ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन. मराठीत ज्ञान देणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पारायणातून, वाचनातून आपण त्या ओव्या आत्मसात करायच्या आहेत. या ओव्यांचे अर्थ समजून घेऊन त्याची अनुभुती घेऊन आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायचा असतो. आत्मज्ञानी शिष्य व्हावा यामध्येच सद्गुरुंचा आनंद सामावलेला आहे. ध्यानरुपी सेवेतून स्वः ची ओळख करून घ्यायची असते. म्हणजे ही सुद्धा आपल्याचसाठी सेवा आहे. आपण आपली ओळख करून घेऊन अध्यात्मिक प्रगती साधायची असते. आत्मज्ञानासाठीच ध्यानरुपी अभिषेक सद्गुरुंनी अभिप्रेत आहे. ध्यानामृतातूनच आपणास संजिवन समाधीचा आनंद मिळतो. यासाठी ध्यानरुपी अमृताचा अभिषेक सद्गुरुंच्या चरणी अर्पण करावा.