दुधाचे दही झाले. ताक झाले. पण त्या ताकाचे पुन्हा दूध होत नाही. उसाची साखर झाली. पण त्या साखरेपासून पुन्हा ऊस होत नाही. एकदा प्रक्रिया करून रूपांतरित केलेला पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. तसेच अध्यात्माचे आहे. अध्यात्म ही एक प्रक्रियाच आहे. येथे जिवाचा शिव होतो. नराचा नारायण होतो. जिवाचा शिव झाल्यावर पुन्हा जिवात रूपांतर होत नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
नातरी साखरेचा माघौता । बुद्धिमंतपणेंही करितां ।
परि ऊस नव्हे पंडुसुता । जियापरी ।। 200 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 8 वा
ओवीचा अर्थ – अथवा उसाची साखर झाल्यावर, त्या साखरेचा मुळचा ऊस करण्याचे जरी बुद्धीमान पुरुषानेही मनात आणले तरी पुनः ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही.
शेतमाल हा नाशवंत आहे. फळे, भाजीपाला ही उत्पादने फार दिवस टिकून राहत नाहीत. फळे पिकल्यानंतर ती योग्य कालावधीपर्यंतच खाण्यास योग्य असतात. त्यानंतर ती टाकून द्यावी लागतात. नुसते उत्पादन घेणे म्हणजे शेती नव्हे. उत्पादित माल टिकवून ठेवणे किंवा त्यावर प्रक्रिया करून उपपदार्थांची निर्मिती करणे हे आवश्यक आहे. अनादिकालापासून हा प्रकार सुरू आहे. उसापासून गूळ, साखर, दुधापासून, दही, ताक, लोणी, तूप असे पदार्थ तयार केले जातात. आंब्यापासून आमरस काढून त्याच्या पोळ्या केल्या जातात. कच्च्या कैऱ्यापासून लोणची, मुरांबे केले जाते. पन्हे केले जाते.
एकच पदार्थ आपण वारंवार खाऊ शकत नाही. पेढ्याची बर्फी, गुलाबजामुन हे गोड पदार्थ आपण किती खाऊ शकतो. काही ठराविक पातळीपर्यंतच ते खाता येऊ शकतात. त्यानंतर आपली ते पदार्थ खाण्याची मानसिकता राहत नाही. फळे, भाजीपाला यांचेही तसेच आहे. नेहमीच तेच तेच खाऊन आपणास कंटाळा येतो. यासाठी त्याचे उपपदार्थ करून खाणे योग्य होते. पूर्वी लोकसंख्या कमी होती. यामुळे उत्पादित शिल्लक माल टाकून द्यावा लागे. मग पुढे प्रक्रिया करून कित्येक महिने टिकून राहू शकतील असे उपपदार्थ तयार केले जाऊ लागले.
आताच्या काळात शेतमालाचे बाजारमूल्य वाढविण्यासाठी प्रक्रिया ही गरजेची झाली आहे. उत्पादित माल नाशवंत आहे. तो ठराविक कालावधीत खपायला हवा. तसेच त्याला योग्य दरही मिळायला हवा. यासाठी आता उपपदार्थ करणे हे आवश्यक आहे. अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. पपईपासून टुटीफुटी, जाम केले जाते. अनेक फळापासून जाम, जेली, कॅचअप केले जाते. पण असे उद्योग आहेत कोठे? ते मोठ्या प्रमाणावर उभे राहण्याची गरज आहे. आजही देशातील 40 टक्के शेतमाल हा फेकून दिला जातो. फेकून देण्यामध्येही तोटा आहे. उंदीर, डासांचा प्रादुर्भाव वाढतो. हे रोखायचे असेल तर काढणीपश्चात तंत्रज्ञानावर अधिक भर द्यायला हवा. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
शेतमालाला योग्य भावही मिळू शकेल तसेच नवा जोडधंदा उभा राहिल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक विकासही होऊ शकेल. पूर्वी वीज नव्हती, इंधनाची प्रगत साधने नव्हती तरीही प्रक्रिया केली जायची. चरख्यात बैलाच्या साहाय्याने ऊस गाळला जायचा. साखरेचे उत्पादन केले जायचे. देशातील हा प्रक्रिया उद्योग पाहता पूर्वी देश हा शेतीमध्ये अग्रेसर असणार हे निश्चित. आता इतर उद्योग वाढल्याने शेतमालाच्या उद्योगांकडे फारसे लक्ष दिले जात नाही असेच चित्र आहे.
साखर कारखाने उभे राहिले पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. अशा परिस्थितीमुळेच ते उद्योग डबघाईला येऊ लागले आहेत. राबणाऱ्या हातांना त्यांच्या कष्टाचे मोल हे मिळायला हवे. ते मिळाले तरच हा उद्योग टिकून राहील. आज देशातील अनेक उद्योग डबघाईला आले आहेत. राबणाऱ्या हातांना योग्य मोबदला त्यांनी दिला नाही. यामुळेच ते डबघाईला आले. मालक आणि कामगार यांच्यातील दरी दुरावली की उद्योगाची पीछेहाट सुरू होते. उद्योग बुडाले म्हणून प्रक्रिया उद्योग उभारणी थांबली का? नव्या पद्धतीने, नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर उद्योग हे उभारले जात आहेत.
पूर्वी साखर कारखान्यांची गाळपक्षमता 2500 टन होती. आता नव्याने उभारलेल्या साखर कारखान्यांची गाळपक्षमता पाच ते सात हजार टन आहे. क्षमता वाढवून उद्योग वाढविला जात आहे. पूर्वी खांडसरी होत्या. मग छोटे छोटे साखर कारखाने उभे राहिले. आता मोठे-मोठे साखर कारखाने उभारले जात आहेत. यातून अनेक कारखाने बंद पडले आहेत. काही आजारी आहेत. पण नव्या कारखान्यांचीही संख्या वाढत आहे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देणारे कारखानेच टिकून राहिले. यापुढेही हाच विचार त्यांनी लक्षात घ्यायला हवा.
दुधाचे दही झाले. ताक झाले. पण त्या ताकाचे पुन्हा दूध होत नाही. उसाची साखर झाली. पण त्या साखरेपासून पुन्हा ऊस होत नाही. एकदा प्रक्रिया करून रूपांतरित केलेला पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. तसेच अध्यात्माचे आहे. अध्यात्म ही एक प्रक्रियाच आहे. येथे जिवाचा शिव होतो. नराचा नारायण होतो. जिवाचा शिव झाल्यावर पुन्हा जिवात रूपांतर होत नाही. एकदा अमर झाल्यावर पुन्हा जन्म-मरणाचा फेरा नाही. यासाठी अध्यात्माची ही प्रक्रिया काय आहे हे जाणून घ्यायला हवे.
जिवाचा शिव कसा होतो. याचा अभ्यास करण्याची गरज आहे. दुधाचे दही ही प्रक्रिया जुनीच आहे. हे रूपांतर होताना दुधात विरजण मिसळावे लागते. विरजण काय असते? ताकाचे किंवा दह्याचे विरजण असते. दुधात मिसळले की काही कालावधीनंतर त्याचे दह्यात रूपांतर होते. आत्मज्ञानी सद्गुरूंचा अनुग्रह हे विरजण आहे. सद्गुरूंनी विरजण मिसळल्यानंतर काही कालावधीनंतर शिष्याचे सद्गुरूमध्ये रूपांतर होते. शिष्य आत्मज्ञानी होतो.
उसाचे साखरेत रूपांतर करताना, रस वेगळा करावा लागतो. यासाठी ऊस चरख्यात घातला जातो. रस गाळून घ्यावा लागतो. त्यातील घाण वेगळी करावी लागते. रस उकळल्यानंतर त्यातून मळी वेगळी केली जाते. विविध प्रक्रिया करून मग साखरेत रूपांतर होते. अध्यात्मातही असेच आहे. अनुग्रहानंतर शिष्याने नित्य साधना करायला हवी. मनातील दुष्ट विचार बाजूला सारायला हवेत. ते वेगळे करायला हवेत. रस गरम केल्यानंतर मळी वेगळी होते. तशी साधनेने अंग गरम व्हायला हवे. कुंडलिनी जागृत करायला हवी. यासाठी मनामध्ये सात्त्विक वृत्ती वाढवायला हवी. मळी दूर करण्यासाठी रसात विविध रसायने मिसळली जातात, तसे सात्त्विक विचारांचा मारा करायला हवा. मन शुद्ध झाले की मग ते आत्मज्ञानात रूपांतरित होण्यास योग्य होते.
अध्यात्मातील या रासायनिक प्रक्रिया समजून घ्यायला हव्यात. कुंडलिनी जागृत करण्यासाठी आवश्यक साधना ही करायला हवी. रस कायलीत ओतल्यानंतर तो तापविण्यासाठी जाळ द्यावा लागतो किंवा साखर करताना रस गरम करावा लागतो. तरच त्यातील मळी दूर होते. तसे शरीरात कुंडलिनी जागृत करून मनाची शुद्धी ही साधायला हवी तरच आत्मज्ञानाची साखर तयार होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.