“शेवटची लाओग्राफ़िया” ही बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी . अवताल भोवतालचं प्रचंड गुंतागुंतीचं वास्तव आणि ते मांडण्याची अफ़लातून मनोविश्लेषणात्मक अशी कादबरी लेखनाची आधुनिक प्रयोगशीलता मनाला चक्रावून टाकल्याशिवाय राहत नाही .ही भन्नाट कादंबरी आहे हे नक्की.
परीक्षण – बाबाराव मुसळे
9325044210
babaraomusale@gmail.com
‘ पिपिलिका मुक्तिधाम’ ही 2019 मध्ये ग्रंथालीने प्रकाशित केलेली त्यांची पहिली कादंबरी. त्या कादंबरीची पाठराखण माझी आहे. हे यासाठी सुचविले की माझी आणि लेखकाची नाळ पहिल्या कादंबरीच्या वेळेसच जुळली होती. तिच्या निर्मितीप्रक्रियेच्या काळात आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. याही वेळी तितका नाही तरी माध्यम संपर्क होताच. त्यामुळे ह्या कादंबरीचे एकूण स्वरूप हे बरेचसे’ पिपिलिका मुक्तिधामसारखेच नवीन प्रायोगिक असल्याची कल्पना आली होती. सरसकट कथानक, ते घडवून आणणारी छोटी मोठी पात्रे ,कालसंगत मांडणी असे रूढ कादंबरीलेखनाचे सूत्र झुगारून लेखकाच्या दोन्ही कादंबऱ्या अवतरल्या आहेत. यांत वास्तवातली वाटावी अशी पात्रे दुय्यम –तिय्यम स्वरूपात येतात. पण मुख्य पात्रांच्या जागी अमानवी अशा प्रतिकात्मक पात्रांची रचना केलेली दिसते. जसे की “पिपिलिका मुक्तिधाम”मध्ये चार मुंग्या ह्या प्रमुख रूपकात्मक पात्रांच्या रूपात दिसतात. तर “शेवटची लाओग्राफ़िया” ह्या कादंबरीत एका आगंतुक व्यक्तिरेखा नावाच्या पात्राची रचना केलेली आहे. ही रूपकात्मकता वेगळी.दोन्ही कादंबऱ्यातली ही पात्रे माणसांच्या जगात मुक्त संचार करीत आपले अनुभव सांगत जातात त्यांचा परिसर वावर पुर्णत:वेगळा आहे.
“शेवटची लाओग्राफ़िया “ह्या कादंबरीत एक गूढ जग वाचकाच्या भोवती सारखे घुमत राहते. ते बरेचसे भयप्रद आहे. स्मशान, प्रेत, भूत, हडळ असे त्याचे घटक आहेत. ह्या आणि वास्तवातील वाटणाऱ्या बाकी पात्रांच्या माध्यमातून लोककथेच्या अंगाने ही कादंबरी वेगाने पुढे जात राहते. ह्या कादंबरीतील वास्तवातील वाटणारी पात्रे ही सारी लोककथेतील पण माझीच रूपे आहेत हे अवगत करण्यासाठी हे आगंतुक पात्र अधून मधून अवतरत असते. जणू ते काळाच्या रूपाचे सूत्रधार आहे . मानवी भावभावनांचे आरोपन आपण भूत प्रेत यावर करत असतोच.
ग्रीक , भारतीय आणि चिनी लोककथेतील रंगीत घोडा अगदी सुरूवातीलाच या कादंबरीत अवतरतो (पृ.15) . त्याचे मुख माणसाचे असल्याचे लेखकाने म्हटले आहे .त्याला इंद्रधनुष्यी रंग आहेत . या घोड्याचे प्रागतिक रूप आगंतुक व्यक्तिरेखा नावाचे पात्र इथे उभे करते. मुळात भारतीय,चिनी, ग्रीक लोककथेत ह्या घोड्याचे मुख घोड्याचेच असल्याचे म्हटले आहे . त्याच्या डोक्यावर एक शिंगही असते .या घोड्याला इंग्रजीत Unicorn असे म्हटले जाते . इथे या कादंबरीचा निवेदक आणि मुख्य पात्र ‘ मी ‘ तो घोडा बोलका आहे असे म्हणतो म्हणून मग ‘ मी ‘ने त्याचे मुख माणसाचे दर्शविलेले असावे . हा घोडा या कादंबरीतल्या ‘ मी’ शी संवाद साधताना ‘मी देवदूत आहे …या जगात सज्जनांना न्याय देण्यास ,त्यांचं रक्षण करण्यास आलो आहे ’ असे म्हणतो तेव्हा ही गोष्ट वाचकास दिलासा देणारी वाटते . अन्यायग्रस्तता हेच आजचं भयान वास्तव आहे . आणि त्याने मोठ्या संख्येने इथे वास्तव्यास असणारा सामान्य माणूस पिडित आहे . या सामान्य माणसांच्या पिडित –कथा सांगणं हेच या “शेवटची लाओग्राफ़िया” नावाच्या लोककथेचं वास्तव आहे . या भयरूपकालात खरेच आपलं रक्षण करण्यासाठी कोणी वेगळं रूप घेऊन अवतारणार असेल तर ते येथील सामान्य जनास हवेच असते .मला आठवतो एकेकाळी ॲग्री यंगमॅन म्हणून तत्कालिन सिनेमांतून गाजलेला अमिताभ बच्चन . त्या एका गोष्टीमुळेच लोकांनी त्याला डोक्यावर घेतले होते . लोकांनी तसे करणे हेच कल्पनारंजक असते . इथेही लेखकाची या लोककथेतल्या घोड्याची कल्पना सामान्य जनास आवडणारी आहे . हा घोडा तेथे अवतरणार्या दुसर्या एका हर्पी नावाच्या पक्ष्याचे वर्णन करतो . तो हर्पी माणसाच्या चेहर्याचाच आहे . ती मादी आहे . आणि तो आग ओकत येत असल्याचे सांगतो . तो माणसांना घाबरवतो . आणि त्यांचे अपहरण करतो . त्या हर्पीला कसे पळवायचे याचा उपाय तो सांगतो आणि येथेच ‘मी’चे स्वप्नभंग होते .
हा देवदूत असणारा रंगीत घोडा या लोककथेत पुढे अधून मधून प्रगट होत राहतो . पहिल्या दीड पेजमध्ये ह्या कादंबरीचं एकूण स्वरूप काय असेल हे लेखक सुचवितो. या लोककथेतील ‘मी’ चा पुढे या लोककथेतीलच अशा सर्वच पिडित ,दुःखी माणसांशीच संपर्क येत जातो .त्या क्रूर हर्पीपासून हा इंद्रधनुष्यी रंगरूपी घोडा या लोककथेत अवतरणार्या माणसांना वाचवतो का,आणि वाचवत असेल तर कसा , वाचवत नसेल तर का नाही ? त्याचे ‘मी ‘च्या स्वप्नात अवतरणे सार्थक आहे की निरर्थक आहे हे वाचक म्हणून आपण तपासून पाहू शकतो . कथा-कादंबर्यात कुठलाही शब्द ,वाक्य,पात्रं निरर्थक नसते . मग अगदी सुरूवातीलाच ‘मी’ असे लोककथेतील सर्वसामान्यांसाठी आशादायी स्वप्न –चित्र रंगवत असेल तर त्याला निश्चित काही अर्थ असलाच पाहिजे पण याचं निरसन लगेच होते . हा घोडा जातो . आपल्या पाठीशी देवदूत आहे याची एक भ्रामक जाणीव ‘मी’च्या मनात निर्माण होते . पण सभोवतालच्या भीषण वास्तवाची आठवण होऊन ‘मी ‘ म्हणतो, ‘ मी जागा झालो .देवदूत माझ्या पाठीशी असल्याचा आनंद झाला ; पण तो किती काळ टिकणार ? याविषयी मीच साशंक होतो माझ्यापुढे माझ्या जगण्याचे प्रश्न ‘ आ ‘ वासून उभे होते .त्यांना सामोरं जाण्याशिवाय माझ्याकडं दुसरा उपाय नव्हता. …’ असे का व्हावे ? ‘मी’ च्या स्वप्नाची दोन रूपे .एक सुरूवातीचे देवदूत बनून आलेल्या घोड्याचे आशादायी अन लगेच हर्पी नावाच्या क्रूर पक्ष्याचे निराशादायी अशी परस्पर विसंगत दोन चित्रे हेच मानवी जगण्याचे सार आहे .आपल्या आयुष्यात आशावादी किरण निर्माण होत आहे असे वाटते तेव्हाच त्याला निराशावादी काळाकुट्ट असा एक ढग सर्व दिशांनी व्यापून टाकतो . मुळात लाओग्राफ़िया म्हणजे लोककथेचे स्वरूपच हे असते .लोककथा ह्या लोकनिर्मित आणि लोकरक्षित असतात . त्यांना कुठलेही पुरावे नसतात .त्यामुळे या शेवटच्या लाओग्राफ़ियाच्या या स्वप्नातील दोन्ही घोड्यांसाठी पुरावे काय ? असा प्रश्न आपण विचारू शकत नाही .ही एक लोककथा आहे हेच सत्य . या लोककथा एका पिढीकडून नंतरच्या पिढीकडे मौखिक स्वरूपात येत असतात . मूळ लोककथेतील मजकूर पुढे सतत बदलत जातो . लोककथा पुरावे देत बसत नाही. लोककथा सांगते तेच सत्य मानून आपणास या कादंबरीचा आस्वाद घ्यायचा आहे .
कादंबरीतील सर्वव्यापी आणि महत्वाचे पात्र आहे ते आगंतुक व्यक्तिरेखा . कारण ही लोककथा तिचिच आहे . आणि तीच सांगत आहे .ती सुरूवातीलाच म्हणते ,’मी जी लोककथा तुम्हाला सांगणार आहे ,ती माझ्या “मी” ची मीच सांगणार आहे .कारण मी कादंबरीतील आगंतुक पात्र आहे .’ हे पात्र ज्याला रंग नाही ,आकार नाही .म्हणजे कल्पनातीत आहे .म्हणून कादंबरी लेखनाच्या हे पात्र कुठल्याच साच्यात बसत नाही .सांस्कृतिक आशय असलेले आणि मौखिक परंपरेने जतन केलेले असे हे पात्र एक लोककथा बनून राहिले आहे .ते या कादंबरीत सर्वांच्या मुखानं बोलणार आहे .हे आपलं स्वरूप आगंतुक व्यक्तिरेखा सांगते .ही व्यक्तिरेखा आपली पारंपरिक रूपे सांगताना तिचं सद्याचं रूप म्हणून आजीबाईंचा निर्देश करते. आपण सगळेच आजीबाईकडून लोककथा ऐकत आलेलो आहोत . ती सांगत असलेल्या लोककथेचे वेगवेगळे प्रकार सांगते. जसे –दैवतकथा,भयकथा ,भूतकथा ,बृहत्कथा , मिथ्यकथा ,प्राक्कथा ,दिव्यकथा, वगैरे . ही यादी बरीच मोठी आहे .शेवटी ती म्हणते ,’ …हा तर मी अशीच तुमच्या मनात संक्रमित होणारी मनातून मनांकडं जाणारी लोककथा कथन करत जाणार आहे .’(पृ.19) मग मला वाचक म्हणून असा प्रश्न पडला की कादंबरीच्या सुरूवातीला ज्याने रंगीत घोड्याचे स्वप्न पाहिले तो ‘ मी ‘ जर याच आगंतुक व्यक्तिरेखेचे एक रूप आहे तर मग हे आगंतुक व्यक्तिरेखा पात्र ‘मी ‘ ने ते रंगीत बोलक्या घोड्याचे स्वप्न पाहण्याआधीच का अवतरले नाही ?मात्र ते स्वप्न पाहिल्यावर हे आगंतुक व्यक्तिरेखा नावाचे पात्र या कादंबरीतील ‘ मी ‘ सह यच्चयावत पात्र , गोष्टी या लोककथेच्या घटक आहेत असे म्हणते . मग ती त्या घोड्याला कसे येऊ देते ?असो तर ती आगंतुक व्यक्तिरेखा तिची ही लोककथा सांगायला सुरूवात करते .
आधी या लोककथेत येणाऱ्या आणि वास्तवातील वाटणाऱ्या पात्रांची ,त्या अनुषंगाने घडणाऱ्या घटनांची ओळख करून घेऊ या . यातला ‘ मी ‘ हा निवेदक असावा .रंगीत , बोलक्या घोड्याचं स्वप्न पाहिल्यावर हा ‘मी ‘ स्वतःच्या आईला माणूस मरतो म्हणजे काय होतं ? असा प्रश्न विचारतो . त्यावर ‘या तुझ्या बापाकडं बघ. ‘ असं आई उत्तर देते . म्हणजे ‘ मी’ ला बापही आहे . ती ‘मी’च्या बापाचा प्रेताशी संबंध जोडते . कारण तो ‘ हाय काय आणि नाय काय (पृ.17) ? तो तर्र पिऊन झोपडीत मेल्यागत पडलेला असायचा . हा ‘मी लहानपणी दिवसभर किती प्रेतं पेटली ते मोजण्यासाठी भिंतीवर रेघोट्या मारतो. प्रेतांना पाहून त्याला अनेक प्रश्नही पडतात.त्याच काळात त्याची ओळख कचर्याशी होते .तेही स्मशानाशी संबधित असणारं पात्रं .स्मशानात प्रेत आलं की कचऱ्या आनंदित होतो . स्मशान हे त्याचे जगण्याचे साधन आहे .त्याच्या सगळ्या क्रिया ह्या अधोरी पद्धतीच्या वाटतात . पुढे अधोरी पंथाचाही उल्लेख आला आहे . अधोरी पंथीय हे मृत माणसाचे मांस खातात असे म्हटले आहे . कचऱ्या ते करत नाही एवढेच . कचऱ्या ‘मी’ला पैसे मिळविण्याचे साधन म्हणून स्मशानातलं काम शिकायला सांगतो .(पृ.18) ‘ मी’ ला हे सारं भूतवत वाटते .तो कचऱ्याला म्हणतो ,’ खरंच आपण भूत असतो तर लई मज्जा आली असती .’ ज्याला स्मशान ,प्रेत ,भूत ही मज्जा वाटते असा हा ‘ मी ‘ या कादंबरीचा निवेदक आणि नायकही आहे .हे सारं कादंबरीच्या सुरूवातीला येते तेव्हा वाचताना सारंच हॉरर वाटते. पण हाच त्याचा अंत नाही. त्याला नोकरी लागून आपला पांग फिटावा असं त्याच्या आईला वाटते . आईच्या इच्छेस सार्थ बनविण्यासाठी तोही घर सोडून शहरात येतो . आणि एक नवं विश्व त्याच्यासमोर खुलं होते . हे शहर आहे पुणे . लेखकाने कादंबरीत शहराच्या नावाचा तसा स्पष्ट उल्लेख केला नाही .’मी’ या शहरातल्या जुन्या बाजारात जाण्यासाठी ज्या रस्त्यांवरून चालतो त्या रस्त्यांवर विद्यापीठ, शिवाजीनगर, रुबी हॉल, कोर्ट , मंगळवार पेठ ही स्थळं लागतात . ही स्थळं पुण्यातलीच आहेत हे सगळेच जाणतात .पुढे सारी लोककथा याच शहरात घडत जाते .
या शहरात त्याला अनेकजण अनेकप्रसंगी भेटतात .त्यातला पहिला दिलप्या . दिलप्याच त्याला स्वयंपाक करण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडी घेण्यास सुचवितो . त्यासाठी तो जुन्या बाजारात येतो . तर तेथे सारेच त्याच्या जातकुळीचे .दरिद्री . बी . ए. पास झाल्यावर ऩोकरीच्या शोघात तो जेजुरीला येतो . जेजुरीसारख्या अनेक ठिकाणी जात त्याने तोपर्यंत तीस मुलाखती दिल्या . यातून सद्य:स्थितीत सुशिक्षितांमध्ये बेकारी किती वाढली हे ‘ मी’ ला सुचवायचे आहे .नोकरी लागणे कठीण हे लक्षात आल्यावर ‘मी’ गावाकडे परत जातो. आई म्हणते ‘ हापकू नको .’ तिच्याकडून प्रेरणा घेऊन गावाकडून बिनाटिकीटाचाच एस.टीऩे पुन्हा शहरात येतो . त्याला आता नोकरीच्या मागे ना लागता पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे असते .एका रुपयाच्या भरोशावर तो कुण्या कांबळे नावाच्या सहृदयी बाईच्या मदतीने विद्यापीठात फ़ॉर्म भरतो . त्याला बी . ए . ला डिस्टिक्शन असते . ते पाहून त्याचे कौतुक करत विभाग प्रमुख त्याला रजिस्ट्रारकडे पाठवून त्याची फ़ी माफ़ करवितात . येथे ‘ मी’ ची जात स्पष्टपणे सांगितली नाही तरी तो मागासवर्गीय आहे हे लक्षात येते .यावेळी आगंतुक व्यक्तिरेखा त्याच्याशी संवाद साधत अवतरते (पृ.29).ही आगंतुक व्यक्तिरेखा आपण एक भूत असून आपले स्मशान आपण राखून ठेवल्याचे म्हणते (पृ.33) तर ‘मी’ ही शहराबद्दल अशीच काही विधानं करतो .त्यातलं पहिलं- ‘शहर हे एक मोठे भूत आहे .’ तर दुसरं- ‘शहरं म्हणजे भूमीला मृत करून उभारलेला सुंदर देखावा .’(पृ-33)याच शहरात ‘मी’ला कमावून शिकायचे म्हणून वसतिगृह हवे आहे . आणि ते त्याला मिळते . इथे ‘मी’ला महाराष्ट्रभरातून आलेले विद्यार्थी भेटतात .यात कुत्रं खाणारा तोमंग्या एक गूढ व्यक्तिमत्व म्हणून अधिक लक्षात राहतो . तो आसामी आहे . या सगळ्या मुलांना ‘ मी’ चा मित्र दिलप्या वेगवेगळी नावे ठेवतो .उदा . सुरेंद्र-आसरा . तो तोमंग्याचा पॅरासाइट म्हणून, हरेद्र –गिऱ्हा .नामदेव कानडे –खवीस ,चकवा,मनघाल्या गोविंद-चिंद .डिग्या –लिंगपिसाट . असे त्या वसतिगृहात जे जे दिलप्याच्या संपर्कात आले त्या त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ठ्यानुसार नेटवर भुतांच्या प्रकारांचा शोध घेऊन पुढील नावे ठेवली आहेत .यात जखीण ,झोटिंग ,तलखांब(मेलेल्या अविवाहित पुरूषाचं भूत ),दाव (कुणब्याचं भूत) ,देवचार (लग्नानंतर अल्पावधित मेलेल्याचं भूत ),ब्रह्मराक्षस ,महापुरूष भूत ,वीर ,शाखिणी, समंध अशी आणखी बरीच नावे आहेत . अशी नावे ठेवणार्या दिलप्याची मानसिकता तपासून पाहायला हरकत नाही . तेही एक लक्षात येते की काही भयसंज्ञा म्हणजे स्मशान ,भुतं वगैरे बाबी ‘ मी’ ची पाठ सोडत नाहीत. गावाकडे गेलं की स्मशाग्रस्त झालेला कचऱ्या . अन नंतर हा दिलप्या . पुढे महिन्याच्या पहिल्या शनिवारी ते होस्टेलवाल्या मुलांचं संमेलन घेतात . त्यात प्रत्येकाने हॉरर स्टोरी सांगायच्या असतात .यातल्या काही गोष्टी भुतखेत ,हडळ अशा खऱ्याच हॉरर आहेत . त्यामुळे ही भुतं-खेतं ‘मी ‘ चा कादंबरीभर पाठलाग करतात . त्यातून कादंबरीचा हॉररनेस कायम राखला जातो .
आगंतुक व्यक्तिरेखा कधीतरी मध्येच अवतरते . आणि ती ‘मी ‘शी संवाद साधू लागते . विषय काय? तर ज्या बाबत भले भले बोलायचं टाळतात लोकशाहीतील या हुकूमशहाच्या (हुकूमशहा हा लेखकाचा शब्द आहे .पृ-57. ) विरोधातले रडगाणे .अगदी ताला-सुरात गाते .हा हुकूमशहा काय काय उत्पात करतो? त्याची यादीच येथे दिली आहे .
शेतकी संपविणे , बेरोजगारी ,सीबीआय,आरबीआय ,निवडणूक आयोग ,न्यायपालिकेची स्वायतत्ता ,क्रूडतेल , प्रचंड टॅक्स ,जनतेची लूट , भूलथापा,शेतकरी आत्महत्या ,दुष्काळ ,शेतमाल तोट्यात विक्री ,परदेशी धान्याची आवक ,नोटबंदी राफेल घोटाळा ,पक्षासाठी कंपन्यांकडून करोडोंच्या देणग्या ,देणगीदारांची नावे लपविण्यासाठी कायदा ,लाखोंचे कोट घालून फ़कीर बनून जगभर फ़िरणे ,भांडवलदारांना कर्जमाफ़ी ,धर्म हीच मानसिकता . हे सारं रडगाणं कोण्या हुकूमशहाविरूद्ध हे शेंबडे पोरगेही ओळखेल .’मी ‘ ज्या गोष्टी न्याहाळत ,हाताळत जातो त्यापेक्षा आगंतुक व्यक्तिरेखेचे हे विषय अधिक ज्वलंत आणि दाहक आहेत. एका सशक्त लोकशाही हुकूमशहाविरूद्ध ती बोलते ही फ़ार हिंमतीची गोष्ट आहे .अशी हिंमत या लोककथेत इतर कुठलेही पात्र दाखवत नाही . आगंतुक व्यक्तिरेखेची ही विद्रोही मानसिकता ही बहुचर्चेचा विषय ठरू शकते . आमुस्या ,पौर्णिमा ,संकष्टी चतुर्थी ,चंद्रकला याबरोबरच आत्मा-परमात्मा,भाग्य-अभाग्य ,पाप-पुण्य ,चौर्यांशी लक्ष योनी अशी गूढ चर्चाही ती सुरू करते .
मग आणखी एकदा स्वप्नातल्या त्या घोड्याचे आगमन. त्याचे भयानक राक्षसी सापाबद्दलचे निवेदन, देवी गोरा, पॅनफ़ोन, भयानक राक्षस, टायफ़ोन, अपोलो , आर्तेमिस , लॅटन , अपुपोल्ला , ओफ़ेस्ट , पायफ़्लान असं कय काय अन काय ? सारंच दुर्बोध .पुन्हा संमेलनातील कथा सुरू . या कथेत विद्यापीठातल्या गोष्टींची, शहरातल्या गणपती उत्सवाची उसवणं सुरू होते . साधारणत: एक किंवा अनेक गोष्टी झाल्या की आगंतुक व्यक्तिरेखेचे अवतरून तिचे फ़टकारे सुरू होतात . प्रत्येक कथेतून विविध समाजदर्शन घडते . ह्याचे स्वरूप स्वीकृत ,विकृत . पुन्हा कचऱ्या पुन्हा आमुश्या ,रात्र ,अंधार प्रेतांचे ज्वलन .एकूण भयग्रस्त स्थितीची राहून राहून उजळणी .कापालिक भक्त .महाकाल ,कामाख्या देवी ,अघोरी किन्नर ,वाराणसी- काशी प्रमुख अधोरकेंद्र , ही सगळी भयकालिक मांडणी .मध्येच समतावादी चळवळ ,बाबासाहेब ,मागासवर्गीयांचे ,कचर्याचे कथानकात अधूनमधून येणे ते भूत -प्रेत –स्मशानाची दखल अशा अतेंद्रिय गोष्टी . सार्वजनिक क्षेत्रातल्या कित्येक बाबी ,त्यातील सु-कुव्यवस्थेवर भाष्य. अशापद्धतीने लेखकाने सार्वत्रिक जीवनाच्या बहुतेक सर्वच अंगांची प्रखरतेने चिरफ़ाड करण्यासाठी हॉरर कथांची रचना केलेली आहे हे लक्षात आले की एकूणच या कादंबरीच्या कथानकाच्या प्रवासाचं स्वरूप लक्षात येते .या हॉरर कथांतून चर्चिले गेलेले काही वेगळे आणि ठळक विषय असे –साहित्य ,साहित्य संमेलने ,कामगार विश्व ,अध्यात्म क्षेत्र ,बॅंक कर्जे , संघ कार्य ,इंटरनेट-मोबाइल ,कॉलेज –व्यवस्थापन ,प्रवचने ,जाहिरातबाजी – बाजार प्रकाशन व्यवस्था ,सिनेमा ,राज्य साहित्य पुरस्कार ,साहित्य अकादमी पुरस्कार ,पुस्तक समीक्षा ,लेखक –त्यांचे प्रकार ,इतिहास ,धर्म ,भारत –चीन –पाकिस्तान संबंध ,राजकारण ,श्रद्धा-अंधश्रद्धा .बोगस डिग्री प्रकरणे ,बेकारी ,पौराणिक कथा ,विश्वनिर्मिती ,पृथ्वीचा इतिहास ,खाऊ संस्कृती ,अ .भा .मराठी साहित्य संमेलन ,शिक्षक भ्रष्टाचार ,तमाशा,आरक्षण ,मातंग संघटना ,दिल्लीचे शेतकरी आंदोलन ,कृषिकायदे ,शेती प्रश्न इत्यादि .
कादंबरीच्या शेवटी आगंतुक व्यक्तिरेखेचं गाणं संपल्याचं सांगितलं जाते .स्वप्नात घोडा यायचा बंद झाला आहे .त्याची जागा बुद्ध-फ़ुले-आंबेडकर यांनी घेतली आहे .शेवटी ‘ मी’ ची आई त्याला एका परोपकारी राक्षसाची कथा सांगते . इतर राक्षसांची वाटते तशी या राक्षसाची ‘ मी’ ला भीती वाटली नाही . हा राक्षस म्हणतो, भूतंबितं काही नसतात .माणसच भूतं असतात. जगात कोणतीही लोककथा अंतिम नसते. तिची विवेकाच्या आधारावर नव्याने सुरूवात होते .एवढेच . शेवटी ‘ मी’ ची आई त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फ़िरवते. आणि इथे ही शेवटची लाओग्राफ़िया संपते .
“पिपिलिका मुक्तिधाम”प्रमानेच या कादंबरीची संहिता प्रयोगिक व वास्तव आहे . पिपिलिका मुक्तिधाममध्ये त्या चार मुंग्या विविध क्षेत्रांत संचार करून तेथील अव्यवस्थेचे ओझरते दर्शन घडवितात . इथे आगंतुक व्यक्तिरेखेच्या सांगण्यातून यातील नव्या काळातील ‘मी’आणि इतर पात्रे अनेकानेक सामाजिक क्षेत्रांतील विविध समस्या -प्रश्नांवर बोट ठेवतात . या सगळ्या क्षेत्रांतील समस्यांची तोंडओळख करून देण्यासाठीच ‘ मी ‘ आणि विद्यापीठातील होस्टेलच्या मुलांकडून दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी हॉरर कथांचे संमेलन भरविले जाते . आणि प्रत्येकजण मग आपापल्या लोककथेतून एकूण व्यवस्थेची चिरफ़ाड करत राहतात . या दोन्ही कादंबर्या विविध ज्वलंत विषयांना नुसता स्पर्श करतात . अवतालभोवतालचे असंख्य गंभीर ,अस्वस्थ करणारे विषय ज्यांचे निखंदन करून त्यावर एकेक स्वतंत्र कादंबरी लिहूनही ते दशांगुळे पुरूनच उरतील अशी त्यांची स्थिती पाहिल्यावर लेखकाच्या अशा नुसत्या टिकल्या ( की टिचक्या ?) मारण्याने ह्या विषयांतील दाहकता कशी संपेल तेच कळत नाही . नेमकी हीच गोष्ट मी “पिपिलिका मुक्तिधाम” या त्यांच्या पहिल्या कादंबरीवर जे परीक्षण लिहिले त्यात नमूद केली होती . आता मला अशी उत्सुकता आहे की लेखक याच पद्धतीची तिसरी कादंबरी जेव्हा लिहितील तेव्हा तिच्यात आधीच्या या दोन्ही कादंबर्यांतून स्पर्शिल्या गेलेल्या विषयांशिवाय आणखी कोणते आणि किती विषय लेखकाच्या हाती लागतील? इतर प्रचलित कादंबऱ्याप्रमाणे एकाच विषयाचं खोलवर जाऊन उत्खनन करुन त्या विषयावर स्वतंत्र कादंबरी लिहिण्याची लेखक प्रेरणा घेतील की आणखी नव्याने अशीच कलाकृती निर्माण करतील ? याचे उत्तर अर्थात काळच देईल . अवताल भोवतालचं प्रचंड गुंतागुंतीचं वास्तव आणि ते मांडण्याची अफ़लातून मनोविश्लेषणात्मक अशी कादबरी लेखनाची आधुनिक प्रयोगशीलता मनाला चक्रावून टाकल्याशिवाय राहत नाही .ही भन्नाट कादंबरी आहे हे नक्की.या कादंबरी लेखन प्रकारातील तिचे मोठेपण “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीलाही मागे सारेल असे आहे .ही अधिक जमून आली आहे असं म्हणता येईल.
शेवटची लाओग्राफ़िया (कादंबरी)
लेखक-बाळासाहेब लबडे
प्रकाशक-अथर्व पब्लिकेशन्स,धुळे
मुखपृष्ठ :सरदार जाधव
पृष्ठे-196 मूल्य -395 /-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.