November 21, 2024
Marina City World Record Building article by Prakash Medhekar
Home » जागतिक विक्रम घडवणारी – मरीना सिटी
संशोधन आणि तंत्रज्ञान

जागतिक विक्रम घडवणारी – मरीना सिटी

प्रकाश मेढेकर

स्थापत्य सल्लागार , वास्तू मूल्यकर्ता, इराक, ओमान, मलेशिया आणि भारतातील बांधकाम प्रकल्पाअंतर्गत 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, व्यवस्थापन विषयांसाठी अभ्यागत व्याख्याता, मानव अधिकार आणि आदर्श स्थापत्य शास्त्रज्ञ पुरस्कार विजेते 2014, लेखक – दिशा बांधकाम नवनिर्मितीची (सकाळ प्रकाशन, पुणे )

ई -मेल – prakash.5956@gmail.com
मोबाईल – 9146133793

कमीतकमी जागेत भरभक्कम पायावर ५० वर्ष निसर्गाला सामना करणारे काँक्रीटचे उत्तुंग टॉवर्स म्हणजे शिकागोतील –  मरीना सिटी  

तीन एकर जागेवर टाऊनशिप

१९६०च्या  दशकात अमेरिकेतील शिकागो शहरात एक मिनी टाऊनशिप फक्त तीन एकर जमिनीवर निर्माण झाली. हे आजच्या काळात कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. परंतु हे सत्य म्हणजेच  मरीना सिटी आणि त्याचा किमयागार होता अमेरिकन वास्तुरचनाकार बर्टरॅन्ड गोल्डबर्ग. मरीना सिटीची वेगळी ओळख आहे  विंडी सिटी किंवा सिटी विदीन सिटी. प्रत्येक  माणसाच्या आयुष्यात असणारे काम , घर आणि विरंगुळा या तीन गोष्टींचा एकत्रित संगम आपल्या वास्तु रचनेत गोल्डबर्ग यांनी केला आहे.

अशी होती उत्तुंग टॉवरची योजना

सन १९५९ मध्ये शिकागो नदी किनारी अंदाजे  ९०० स्थानिक नागरिकांसाठी दोन उत्तुंग टॉवर बांधण्याची योजना त्यांनी आखली. तीन एकर जागेत ६५ मजले आणि  ५८७  फूट उंची असणारे  दोन  गोलाकार टॉवर उभारायचे होते.  इमारतीची रचना गोलाकार असेल तर  उंची वरील वाऱ्याचा दाब अंदाजे  ३० टक्के कमी होतो. या गृहप्रकल्पासाठी  ३६ मिलीयन अमेरिकन डॉलर खर्च अपेक्षित होता . प्रत्येक टॉवरचे वजन  १० मिलीयन पौंड म्हणजे अंदाजे  ४५०० टन  वजन भरत  होते.  टॉवरची रचना आणि संरचना करण्यासाठी २५० हून अधिक टीम मेम्बर्सनी अक्षरशः शेकडो रचना बनवल्या. त्यात  वास्तुरचनाकार, अभियंते ,सल्लागार, विकसनकार,  सप्लायर्स आदी संबंधीत व्यक्तींचा सहभाग होता. अंतिम रचना म्हणजे एक गोलाकार फुलाची पाकळी होती. मध्यभागी सेन्ट्रल कोअर, त्याभोवती फिरणारे  १६ बीम  कॉलम आणि बाह्यभागात गोलाकार बाल्कनी आहे.

असे करण्यात आले बांधकाम

बांधकाम प्रकल्पाचा मुहूर्त २२ नोव्हेंबर १९६० रोजी  झाला. भूगर्भातील नमुन्यात  प्रथमतः माती, दगडगोटे आणि ११० फूट खोलवर सुस्थितीतील लाईम स्टोन आढळला. शेजारीच नदी असल्याने खोदकाम करताना पाण्याची पातळीवरपर्यंत होती. पाया बनवण्यासाठी तीन अजस्त्र पाईल ड्रिलिंग मशीन आणण्यात आली. प्रत्येक टॉवरसाठी दीड मीटर व्यासाच्या ४० पाईल्स तीन वर्तुळांमधे समाविष्ट करण्यात  आल्या. पाण्यामुळे अनेकदा २४ तास पाईल ड्रिलिंग आणि ट्रीमी काँक्रीट करावे लागत होते. काँक्रीटची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यावेळी अल्ट्रा सोनीक टेस्ट घेण्यात आल्या. पाईलच्या वरील भागात लोखंडी बेस प्लेट वेल्डींग करून राफ्ट फाउंडेशन करण्यात आले. त्यानंतर जमिनीवरील कॉलम , बीम स्लॅब या कामाची सुरवात झाली. प्रत्येक स्लॅबचे क्षेत्रफळ अंदाजे १२ हजार स्वेअर फूट भरत होते. फॉर्मवर्कसाठी हलक्या वजनाचे फायबर ग्लास मटेरियल वापरण्यात आले. मध्यभागी असणाऱ्या आरसीसी शाफ्टचे तीन मजले पूर्ण झाल्यानंतर पहिल्या स्लॅबची सुरवात झाली. पुढे शाफ्ट आणि त्यानंतर मजल्यांची  स्लॅब या क्रमाने आरसीसी पूर्ण झाले.

टॉवर क्रेनचा प्रथमच वापर

आश्चर्य म्हणजे आजच्या काळातील जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा टॉवरसाठी हाच क्रम होता. प्रत्येक मजल्याचे आरसीसी काम पाच दिवसात पूर्ण होत असे. स्लॅबसाठी प्रथम फॉर्मवर्क त्यानंतर स्टील, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, शिट मेटल आणि काँक्रीट असा क्रम होता. काँक्रीटसाठी ग्रेड ५० चा वापर त्यावेळी  केल्याने पृष्ठभागाचे फॉर्म फिनिश आजही लक्षवेधी आणि अबाधित आहे. बांधकामात टॉवर क्रेन , स्कॅफोल्डींग ,लिफ्ट , सरकते पट्टे , व्हायब्रेटर , मिक्सर , फ्लोटर आदी मशिनरींचा  वापर करण्यात आला. फायबर ग्लास फॉर्मवर्कचा ६७ वेळा पुनर्वापर करण्यात आला. आजचे अल्युमिनियम फॉर्मवर्क लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याचाही असाच पुनर्वापर करता येतो. फॉर्मवर्क आणि काँक्रीट दर्जेदार असल्याने  बाह्यभागात कोठेही प्लॅस्टर करावे लागले नाही. चार वर्षाच्या कालावधीत सन १९६४  साली दोन्ही टॉवर पूर्ण झाले. काँक्रीटचा वापर केलेली त्या काळातील जगातील सर्वात उंच रहिवासी इमारत म्हणून मरीना सिटीची गणना झाली. उंच इमारतीसाठी टॉवर क्रेनचा वापर जगात पहिल्यांदा होण्याची ही सुरवात होती.  

अशी आहे मजल्यांची रचना

 मरीना सिटीत  दोन्ही  टॉवर मिळून ९००  अपार्टमेंटचा समावेश आहे. तळ मजल्यावर ७०० बोटींसाठी मरीना, पहिल्या मजल्यावर  दुकाने , रेस्टॉरंट अॅन्ड बार , टिव्ही स्टुडीओ , स्केटिंग रिंक, प्लाझा गार्डन, अॅम्पीथीएटर, स्वीमींग पूल , ऑडिटोरीयम, कॉन्सर्ट हॉल, शिकागो बॅंक, ऑफिस आदी गोष्टींसाठी जागा आहेत. दुसऱ्या मजल्यापासून १९ व्या मजल्यापर्यंत चक्राकार रॅम्प द्वारे चारचाकी गाड्यांसाठी ८९६ पार्किंग आहेत. त्याला वॅले पार्किंगची सुविधा आहे. २० वा मजला फक्त लाँड्री साठी राखीव आहे. २१ ते ६० मजल्यापर्यंत रहिवासी अपार्टमेंट आहेत. ६१ व्या मजल्यावरील टेरेस आणि  प्रत्येक अपार्टमेंटच्या बाल्कनीतून दिसणारे  शिकागो शहराचे विहंगम दृश्य वेगवेगळे असते.

संपूर्णतः विजेवर चालणारी जगातील पहिली इमारत

लॉबीमधून प्रत्येक अपार्टमेंटला स्वतंत्र प्रवेश दिला आहे. अपार्टमेंटमध्ये गॅस वापरला जात नाही. इमारतीला सेन्ट्रल यंत्रणा न ठेवण्याचा निर्णय विकसनकाराने घेतला होता. त्यामुळे प्रत्येक अपार्टमेंटमध्ये गरम पाणी, हीटर, वातानुकूलित, विद्युतीकरण सुविधा स्वतंत्रपणे पुरविल्या जातात.  संपूर्णतः  विजेवर चालणारी जगातील पहिली इमारत म्हणून मरीना सिटी गणली गेली. इमारतीतील शक्तिशाली लिफ्टने ६५ व्या मजल्यापर्यंत फक्त ३५ सेकंदात जाता येते.

मरिना सिटीची गोल्डन ज्युबिली

आज  शिकागो अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि लॉस एंजलीस  नंतर तृतीय स्थानावरील  महत्त्वाचे शहर म्हणून गणले जाते. या शहरातील उंच इमारती आणि त्यांची वास्तुरचना आलेल्या  सर्व पर्यटकांचे विशेष आकर्षण असते. पर्यटकांसाठी तेथे बोटीतून आर्किटेक्चर टूर आयोजित केली जाते. त्यावेळी सिअर्स, ट्रॅम्प , वॉटर, फाईन आर्ट, मरीना , प्रुडेंशियल प्लाझा,  नॉर्थ मिशिगन , जॉन हॅन कॉक, फ्रान्कलीन ई अनेक प्रसिद्ध टॉवर्सचे एकत्रित दर्शन घडते. त्यावेळी काचेच्या गगनचुंबी इमारतींच्या गराड्यातील  छाया आणि प्रकाश यांचा लपंडाव खेळणारी  काँक्रीटची मरीना सिटी सर्वांचे लक्ष वेधते . या शहराची व्यापार , उद्योग, आर्थिक , दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान, शिक्षण, दूरसंचार, पर्यटन , पायाभूत सुवीधा आदी अनेक क्षेत्रातील आजची प्रगती थक्क करणारी आहे. या व्यतिरिक्त संस्कृती, कला, नाट्य, सिनेमा, संगीत अशा  गोष्टींचा पारंपरिक वारसा  शहराला लाभला आहे. सन २०१४ च्या सर्वेक्षणानुसार शिकागोमध्ये अंदाजे ३ मिलीयन रहिवासी, १० मिलीयन व्यावसायीक असून ५० मिलीयन पर्यटकांनी भेट दिली आणि  मरीना सिटीने आपली गोल्डन ज्युबिली पूर्ण केली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading