July 27, 2024
patagonia-beautiful nature rich -in-south-america
Home » दक्षिण अमेरिकेतील निसर्गसंपन्न पॅटॅगोनिया…(व्हिडिओ)
पर्यटन

दक्षिण अमेरिकेतील निसर्गसंपन्न पॅटॅगोनिया…(व्हिडिओ)

दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना व चिली या दोन राष्ट्रातील पॅटॅगोनिया प्रदेश हा अॅडिज पर्वतरांजी, मोठे ग्लेसिअर्स, वाळवंट, विस्तिर्ण गवताळ प्रदेश अशा वैशिष्ठ्यांनी नटलेला आहे. भारतात तो पर्यटनासाठी फारसा परिचित नाही. पण आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी तेथे चार आठवड्यांची भटकंती केली. या त्यांच्या भटकंतीबद्दल पाहा या व्हिडिओमध्ये तसेच जाणून घ्या हा प्रदेश…

दक्षिण अमेरिकेतल्या अगदी दक्षिणेकडील टोकाचा भाग ‘पॅटॅगोनिया’ म्हणून ओळखला जातो. अर्जेंटिना आणि चिली या दोन देशांमध्ये तो विभागला गेला आहे. अँडिस पर्वतराजी, मोठे ग्लेशियर्स, वाळवंट, विस्तीर्ण गवताळ प्रदेश अशा विविध वैशिष्ट्यांनी तो नटला आहे. सुमारे चार लाख मैलांचा म्हणजे ब्रिटनपेक्षा जवळजवळ दीडपट मोठा असलेला पॅरॅगोनिया भव्य-दिव्य नॅशनल पार्क्‍सनी व्यापला असून, तिथली लोकवस्ती फारच विरळ म्हणावी लागेल. अर्जेंटिनातल्या उश्‍वाया, बाटिलोचे तर चिलीमधल्या लेक डिस्ट्रीक्टमध्ये असलेलं प्युर्टोव्हरास, प्युर्टो नटालेस, पुंटा ऐटेनास, तोरेस डेल पायने नॅशनल पार्क, चिलियन फिओडर्स आदी भाग त्यात मोडतात. दक्षिण अमेरिकेतला तो प्रदेश फिरण्यासाठी भारतात फारसा परिचित नाही; पण अप्रतिम निसर्गसौंदर्य, फिओडर्स, ग्लेशियर्सचं आकर्षण असलेल्या परदेशी पर्यटकांची इथं मोठी गर्दी असते. त्यामुळंच या दोन्ही देशांमधल्या केवळ पॅटॅगोनिया क्षेत्रात चांगली चार आठवड्यांची भटकंती करण्याची योजना पत्नीनं आखली.

आम्ही आमच्या पॅटॅगोनिया प्रदेशाच्या भटकंतीची सुरवात अर्जेंटिनापासून केली. राजधानी ब्युनोसआयर्राहून उश्‍वायामार्गे ‘इल्‌-कलाफते’ या अगदी छोट्या गावात आलो. आम्हाला सुरवातीला पॅटॅगोनियाचे एक मुख्य आकर्षण मानल्या जाणाऱ्या ‘तोरेस डेल पायने’ (Torres del Paine) पार्कला जायचं होतं. वस्तुतः हा पार्क चिली देशात येतो; पण तिथं इल्‌ कलाफतेहून जाणं अधिक सोईस्कर असल्याचं सांगण्यात आलं. त्यासाठी अर्जेंटिनाची सीमा ओलांडून चिलीत प्रवेश करावा लागला. अर्थात त्याला तशी अडचण आली नाही. चिलीतला हा भाग म्हणजे अक्षरशः ओसाड प्रदेश म्हणावा लागेल.

‘तोरेस डेल पायने’ या १८१० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या पार्कची स्थापना सन १९५९ मध्ये झाली आणि युनेस्कोचं ‘Biosphere Reserve’ म्हणून १९७८ मध्ये त्याची घोषणा झाली. त्याच्या शिखरांच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ २४२.२४२ हेक्‍टर असून, हा संपूर्ण भाग ग्लेशियर्स, तलाव, अप्रतिम निसर्गसौंदर्यानं व्यापला आहे. इथल्या प्रत्येक शिखरावरून हे सौंदर्य डोळे भरभरून पाहता येतं. या पार्कचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, बर्फाच्छादित दोन शिंगांची शिखरं. ‘डेल पायने’ याचा अर्थ ‘शिंगं.’ शेजारी, शेजारी एकाच उंचीवरची ही शिखरं, कमालीची सुंदर दिसतात. लेक सारमेंटो लगुना अमरगा आणि लेक पेहो नॉरडेंक जोल्हा या दोन ठिकाणांहून तर त्यांचं सौंदर्य खऱ्याखुऱ्या अर्थानं आजमावता येतं. विविध अँगल्सनी त्यांची छायाचित्रं घेता येतात. तसंच इथं हिरव्या, लालसर, निळ्या रंगांचे अतिशय स्वच्छ पाण्याचे अनेक तलाव आहेत. आयर्नमुळे पाणी लालसर दिसतं, तर मॅग्नेशियम क्षार मिसळलं गेल्यानं काही तलावांतलं पाणी निळेभोर आहे. या रंगीबेरंगी तलावांत दोन शिंगांच्या बर्फाच्छादित शिखरांची प्रतिबिंबं मोहक न वाटली तरच नवल! निसर्गाचं हे आगळंवेगळं रूप पाहून आपण थक्क होतो.

‘तोरेस डेल पायने’ पार्क

इल्‌ कलाफतेमधल्या आमच्या हॉटेलमध्ये उतरलेला एक तरुण तुर्की पर्यटक, दोन दिवसांपूर्वीच ‘तोरेस डेल पायने’ पार्कला जाऊन आला होता. आम्ही तिथं जाण्याच्या आदल्या दिवशी, तो नाश्‍त्याच्या टेबलावर भेटला. पार्कचा विषय निघाला. तो म्हणाला : ‘‘तिथं वाऱ्यापासून सावध राहा आणि मोकळ्या ठिकाणी एकट्यानं लांबवर जाऊ नका.’’ आम्हाला थोडं आश्‍चर्य वाटलं. या साऱ्या भागांतच वारे बरेच जोरात वाहत असतात, याचा अनुभव आत्तापर्यंत घेतला होता. त्यात आमचं वय वगैरे पाहून त्यानं हा सल्ला दिला असावा, अशी आमची भावना झाली.

‘पाप्याचा पितर आहेस, वाऱ्यानंही उडशील,’

तोरेस डेल पायने पार्कमध्ये प्रवेश केल्यानंतर, निरनिराळ्या ठिकाणी बसमधून भटकंती करण्यास सुरवात केली. तापमान ८ ते १० अंश सेल्सिअस. टूर गाईडनं सांगितलं, की इथं वारे फार जोरानं वाहतात. त्यामुळं काळजी घ्या… निळ्या पाण्याच्या एका तलावाजवळ बस थांबली. त्या तलावात दोन शिंगांच्या बर्फाच्छादित शिखरांची मस्त प्रतिबिंब पडली होती. ते छायाचित्र घेण्याचा मोह कोणालाच आवरता येणारा नव्हता. मी, पत्नी आणि अन्य तीन-चार पर्यटक खाली उतरलो. (आम्ही दोघं सोडलो, तर या सहलीला आलेले बहुतेक जण तरुण, उत्तम ट्रेकर्स होते.) दुपारी बाराची वेळ. खूप थंडी वाटत नव्हती; पण वारे मात्र वेगानं वाहत होते. बसपासून सुमारे १००-१५० मीटर्स चालत तलावाच्या दिशेनं गेलो. वाऱ्याचा जोर एकाएकी प्रचंड प्रमाणात वाढला. परत येताना चालणं अशक्‍य होत होतं… आणि क्षणात मी अक्षरशः हवेत उडालो… पाय जमिनीवर नव्हते आणि सारं शरीर जमिनीवरून उडत होतं.. त्याच क्षणी ‘सांभाळ’ असं ओरडत असलेली पत्नीही वर हवेत उडाली.

काहीच समजेनासं झालं. भीतीनं गाळण उडाली. शरीर कापत होतं. बसमधला गाईड ओरडत होता : ‘‘कशाला तरी घट्ट पकडा.’’ मी निदान १००-१२५ मीटर्स अंतर हवेत तरंगतच गेलो… काहीही आधार नाही… इतक्‍यात समोर बस दिसली… तिला घट्ट पकडलं. पत्नीची अवस्था आणखी गंभीर होती. ती माझ्या डाव्या बाजूनं पुढं-पुढं अक्षरशः तरंगत, खेचली जात होती. थोडं पुढं, एक लोखंडाचा उंच खांब दिसत होता. त्याच्यावर वेगानं आपटली तर?… कल्पनाही करवत नव्हती! इतक्‍यात बाजूलाच उभ्या असलेल्या एका मोटारीचा बाहेरच्या आरसा तिच्या हाती लागला. याच वेळेस सुदैवानं वाऱ्याचा जोर थोडा कमी झाला. ‘पाप्याचा पितर आहेस, वाऱ्यानंही उडशील,’ ही खास मराठी म्हण आत्तापर्यंत ऐकली होती. मी आणि पत्नी दोघंही ‘बारीक’ या व्याख्येत बसणारे निश्‍चितच नाहीत. माझं वजन ७०, तर पत्नीचं ५५ किलोच्या घरात. साध्या वाऱ्यानं उडणारे आम्ही नक्कीच नाहीत; पण माणूस वाऱ्यानं उडतो म्हणजे काय, याचा अक्षरशः चित्तथरारक अनुभव ‘तोरेस डेल पायने’ पार्कमध्ये घेतला!

बसमध्ये आल्यानंतर टूर गाईडनं दिलेली माहिती फारच भयंकर होती. त्या दिवशी वारे ११०-१२० किलोमीटरच्या वेगानं वाहत होते. (हायवेवर तासाला ११० किलोमीटरच्या सुसाट वेगानं धावणारी मोटार क्षणात आठवली.) नशिबानं आम्ही तलावावरून परत येत होतो. ही जर उलटी दिशा असती तर…! एखाद्या डोंगरकड्यावर उभे असतो तर!… किंवा जयंती त्या वेगानं समोरच्या लोखंडी खांबावर आदळली असती तर! कशाची कल्पनाही करवत नव्हती. गाईड म्हणाला : ‘‘कधी, कधी वाऱ्याचा जोर एकदम वाढतो. अशा वेळी मोठा अपघात होऊ शकतो. पर्यटक तोंडावर आपटून चेहेरा रक्तबंबाळ होण्याच्या बऱ्याच घटना घडतात. काही वेळेस तर वाऱ्याचा जोर १५०-१५५ किलोमीटरपर्यंत जातो. अशा वेळी सराईत गिर्यारोहकांनाही उतरण्याची परवानगी आम्ही देत नाही.’’

त्या क्षणापासून वाऱ्याची अशी काही धास्ती बसली, की पुढं कुठं उतरायलाही भीती वाटू लागली. ‘Saltogrande walerfalls’ हा चांगला स्पॉट होता. तेव्हा वाऱ्याचा जोरही थोडा कमी झाला होता. चार-पाच पर्यटकांना घेऊन गाईड स्पॉट दाखवण्यासाठी गेला. येताना आम्ही बघितलं, की एका जपानी आणि जर्मन मुलींना चार-पाच धट्टे-कट्टे पुरुष अक्षरशः आपल्या कवेत पकडून घेऊन येत होते. बसमध्ये आल्या, तेव्हा त्या दोघी जणी थरथरत होत्या. सर्वांनी पकडलं म्हणून… नाही तर त्या दोघीही जणी धबधब्याच्या दिशेनंच उडाल्या होत्या. सारंच भयंकर! एका ठिकाणी आमच्या शेजारीच साठ सीटर मोठी बस उभी होती. वाऱ्यामुळं ती एवढी मोठी, पूर्ण भरलेली बसही अक्षरशः गदागदा हालत होती. वाऱ्याचा एकदम अंदाज येत नाही. त्याचा वेग क्षणात वाढतो. निसर्गाचं रौद्र रूप काय भयंकर असतं, ते इथं पाहायला आणि प्रत्यक्ष अनुभवावयाला मिळालं.

दुपारच्या जेवणाच्या वेळेस पार्कच्या अधिकाऱ्यांनी आणखी माहिती दिली. हा दक्षिण अमेरिकेतला एक अत्यंत उत्कृष्ट पार्क समजला जातो. त्याची मोठी काळजी घेतली जाते आणि पर्यटकांकडूनही तशीच अपेक्षा असते. सन २००५ मध्ये एका गिर्यारोहकानं सोसाट्याचा वारा वाहत असतानाही छोटा स्टेव्ह पेटवला आणि त्यात १० टक्के पार्क जळून खाक झाला. सन २०११ मध्ये काही पर्यटक बेकायदा पद्धतीनं गिर्यारोहण करत होते. ते जेवण बनवत असताना गवतानं पेट घेतला. आग वणव्यासारखी पसरली आणि १६,२०० हेक्‍टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. इथं वाऱ्याचा जोर फार असतो, त्यामुळं आग आटोक्‍यात येणं मोठं मुश्कील. ‘दरवर्षी १,२०,००० पर्यटक या पार्कला भेट देतात. त्यापैकी तुम्ही एक आहात आणि तुम्हाला परत या पार्कमध्ये यायचं आहे, याचं भान ठेवून वागा,’ असं आवाहन पार्क रेंजर्सकडून करण्यात येतं.

पॅटॅगोनियाच्या भटकंतीत, पुढंही या सुसाट वाऱ्याचा महाभयानक अनुभव वेळोवेळी घ्यावा लागला. अर्जेंटिनामधल्या बाटिलोचेजवळच सेरो कॅटेड्रल स्क्री जंप ही गिर्यारोहकांसाठी अत्यंत लोकप्रिय जागा. तसंच तिथून अँडियन पर्वतराजी, बाटिलोचे शहर आणि न्यूएल हुपी लेक यांचं अत्यंत विहंगम दृश्य दिसतं. म्हणून तिथं जायचं ठरवलं. तो स्पॉट २१०० मीटर्स (सुमारे साडेसहा हजार फूट) उंचीवर असून, तिथं जाण्यासाठी चेअरलिफ्टची सोय होती. आम्हाला वाटलं, ती बंद असेल म्हणून तिचं तिकीट काढलं; पण बेस सेंटरवर गेलो आणि पाहिलं, तर ती लिफ्ट चक्क उघडी होती आणि त्याची रचनाही मोठी विचित्र वाटली. सीटच्या समोर हात पकडण्यासाठी, खाली पाय ठेवण्याकरिता आणि मागं टेकण्यासाठी केवळ एक एक दांडा आणि बाकी सर्व उघडी अशी ती लिफ्ट.

विशेष म्हणजे त्यात बसल्यानंतर, कमरेला बांधण्यासाठी बेल्टचीही व्यवस्था नव्हती. या भागातही तुफान वेगानं वारे वाहतात आणि फक्त हातानं पकडायचा दांडा… बाकी काहीही आधार नाही! चौकशी करता असं सांगण्यात आलं, की इथं येणाऱ्या बहुसंख्य पर्यटकांना, गिर्यारोहकांना अशाच धाडसी पद्धतीनं उंचावर जायची इच्छा असते. आमच्यापुढं पर्यायच नव्हता. वर जाताना फार त्रास झाला नाही; पण सहा-साडेसहा हजार फुटांवरून परतताना मात्र चांगलीच पाचावर धारण बसली. लिफ्टच्या लांबलचक चेनमध्ये आम्ही दोघं जणच होतो. वारे ५०-६० किलोमीटर वेगानं वाहत असल्याचा फलकच लावला होता. लिफ्ट सुरू झाली. खाली बघवत नव्हतं… त्यातच भुरभुर हिमवृष्टी सुरू झाली. उघड्या लिफ्टची कल्पना नसल्यानं हातमोजे आम्ही घातले नव्हते. समोरच्या दांड्याला पकडणं मुश्कील झालं. सुदैवानं अंगात गरम कपडे होते; पण वारा, बर्फाचा मारा यांनी चांगलंच हैराण केलं. त्यात लिफ्टची माळ गदागदा हलायची आणि मधूनमधून थांबायची. चढताना पंधरा मिनिटं लागली; पण उतरायला अर्धा तासापेक्षा अधिक. कदाचित ती तीस मिनिटं, सराईत गिर्यारोहकांनी खूप ‘एन्जॉय’ही केली असती; पण मला आणि पत्नीला कधी एकदा बेस येतो, असं झालं होतं. बेस सेंटरवर लिफ्ट थांबली आणि अक्षरशः सुटकेचा निश्‍वास सोडला!

खाली ओलो आणि तिथल्या कॅफेटेरियात एक तरुण स्वीस जोडपं भेटलं. ते उणे १२- १३ तापमान, १०० किलोमीटर वेगाचे वारे आणि हिमवृष्टी या वातावरणात इथंच २३०० मीटर्स उंचीवर तंबूत चार दिवस राहून परतलं होतं. तिथंच एक तिशीतली महिला भेटली. ताहिती बेटावर राहणारी ही महिला, तीन-चार वर्षांच्या आपल्या मुलीला घेऊन गेले सहा महिने दक्षिण अमेरिकेत फिरत होती. तिचा विक्रम म्हणजे, या मुलीला पाठीवर घेऊन ती २१०० मीटर्सपैकी अर्धं अंतर पायी चढून गेली… त्या सर्वांना सलामच करायला हवा…!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पर्यटन मंत्रालयाकडून बहुभाषी पर्यटक माहिती हेल्पलाइनची स्थापना

गावाकडचे रस्ते सुधारले, पण…

जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश : तिलारी (व्हिडिओ)

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading