June 19, 2024
Monsoon Reach upto Nashik
Home » मान्सून नाशकात पोहोचला
काय चाललयं अवतीभवती

मान्सून नाशकात पोहोचला

१-मान्सून स्थिती –

मान्सूनची फक्त अरबी समुद्रीय शाखाच कोकण मध्य महाराष्ट्रातच पुढे सरकत आहे. बंगाल उपसागरीय शाखा अजुनही जाग्यावरच असल्यामुळे मान्सून संपूर्ण विदर्भ व उर्वरित मराठवाड्यात वेगाने झेपावण्यास काहीशी अडचण जाणवत आहे.

२-मान्सून आज कुठपर्यंत पोहोचला ?

मान्सून आज २४ तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात, मुंबई, ठाणे, नगर, बीडपासून डहाणू ,नाशिक छत्रपती संभाजीनगर पर्यन्त पोहोचला आहे.

३-कोकण, म. महाराष्ट्रातील पाऊस 👇

                 मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात १५ जूनपर्यन्त जोरदार ते अति जोरदार तर खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ,सोलापूर ह्या १० जिल्ह्यात गुरुवार दि.१३ जून पर्यन्त मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते. उद्या खान्देशात वळीव पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यताही नाकारता येत नाही.

 ४-विदर्भ मराठवाड्यातील पाऊस स्थिती-

               संपूर्ण विदर्भातील ११  जिल्ह्यात वळीव पूर्व मोसमी व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात बुधवार दि. १२ जून पर्यन्त मध्यम मोसमी पावसाची शक्यता जाणवते.

५-मान्सून साठी अनुकूल/ प्रतिकूल वातावरणीय स्थिती 👇       

(i) मराठवाडा परिसरातील ९०० मीटर उंचीपर्यंतची चक्रीय वाऱ्याची स्थिती मान्सून व त्याच्या प्रगतीसाठी पूरक जाणवते. तर खालील 👇  स्थिती मान्सून प्रगतीसाठी पूरक नसली तरी पोहचलेल्या ठिकाणी पाऊस पडण्यास पूरक ठरु शकते.
              (i) मान्सून २१ ते २३ डिग्री अक्षवृत्तापर्यन्त पोहोचला. पण अक्षवृत्त समांतर, मध्य तपांबंर पातळीतील (३.१ ते ५.८ किमी.)उभ्या लंबरेषा उंचीवरील पूर्व- पश्चिम वाऱ्यांचा शिअर झोन अठरा डिग्री अक्षवृत्तावरच आहे, व शिवाय त्याची जाडी कमी झाली आहे.
             म्हणजेच हा शिअर झोन मान्सून सीमा रेषेच्या दक्षिणेकडे म्हणजे निलंगा तुळजापूर, माढा , फलटण, वाई, श्रीवर्धन दरम्यान आहे. तर मान्सून डहाणू, नाशिक, छ. सं. नगर,  पूर्व- पश्चिम रेषे दरम्यान आहे. त्यामुळे बघू या, मान्सून पोहोचला तेथे किती पाऊस देतो, व खान्देश, विदर्भ व उर्वरित मराठवाड्यात केंव्हा पोहोचतो.

वाऱ्याचा शिअर झोन म्हणजे काय?

जमिनीपासून मध्य तपांबर (ट्रोपोस्फेअर ) पर्यन्त  ३ ते ६.५ किमी. दरम्यानच्या उंच अश्या साडे तीन किमी. क्षेत्र हवेच्या जाडीत, कमी दाब क्षेत्राचा, जर पूर्व पश्चिम आस तयार झाला व त्याच्या वरच्या पातळीत  पूर्वकडून -पश्चिमेकडे व त्याच्या खालच्या पातळीत पश्चिमेकडून -पूर्वेकडे  उंचावरील एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांच्या स्थितीला ‘ हॉरीझोन्टल शिअर झोन ‘ म्हणतात. हा अक्षवृत्त समांतर असतो.  अश्याच प्रकारचा व्हर्टीकल शिअर झोन असतो.
            
माणिकराव खुळे

Related posts

चुका जाणून त्या सुधारणे हा सुद्धा ज्ञानी होण्याचा मार्गच

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमय पुरस्कारांसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

समाजरंजन करणारी लोककला दंडार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406