May 30, 2024
Narayan Kharade is a color artist with an inner sense
Home » नारायण खराडे आतल्या जाणिवेचा रंगकर्मी
मनोरंजन

नारायण खराडे आतल्या जाणिवेचा रंगकर्मी

वर्तमानाला भिडणारे नाट्य दिग्दर्शक नारायण खराडे यांचे नाटक पाहणे म्हणजे स्वतःचीच उलट तपासणी असते. या गुणी नाटककाराच्या नाट्यविचारांची ओळख करून देणारा हा लेखन प्रपंच.

अजय कांडर

आपल्या नाटकातील कलाकार निवडताना त्या नाटकातील विचाराशी ते सहमत आहेत का? हा मुद्दा महत्वाचा मानणारे तरुण गोमंतकीय नाट्य दिग्दर्शक म्हणजे नारायण खराडे! प्रेक्षकांना पकवणाऱ्या कलाकृती चळवळीचेही नुकसान करू शकतात याचे भान बांधिलकी जपणाऱ्या कलाकारांनाही राखावे लागते. नाटकातील वैचारिक हस्तक्षेप महत्वाचा असून अशा नाट्यकृतीही मनोरंजन करत असतात. अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम म्हणून नाटकावरचा माझा विश्वास पक्का होत आहे; अशी नाटकाशी बांधिलकी जपणारा हा गुणी रंगकर्मी महाराष्ट्राला फारसा माहीत नसेलही पण महाराष्ट्राच्या नाट्य रसिकांनी नारायण यांची नाट्य वाटचाल आवर्जून समजून घ्यायला हवी.

मराठीत बहुसंख्य कविता लिहिणाऱ्यांना आपण कविता का लिहितो हेच कळत नाही. तसं शहरापासून खेडोपाडी मोठ्या प्रमाणात नाटक हा कलाप्रकार केला जातो पण बहुसंख्य नाटक करणाऱ्यांना आपण नाटक का करतो हेच कळत नाही. अपवाद वगळता कविता लिहितात त्यांना कवितेची परंपरा माहीत नसते. तसेच अपवाद वगळता नाटक करणाऱ्यांचीही तीच स्थिती असते. अशावेळी नाटक आपण का करत आहोत या संदर्भातली आतली जाणीव जपणारा नारायण खराडे सारख्या रंगकर्मीचे नाटक आपण जेव्हा बघतो तेव्हा वाटतं ही नाटकातील भाषा तर आपल्या जगण्याशीच निगडित आहे. हे तर आपल्या मनातलंच खदखदणारे समाज विद्रुपतेच विष आहे.

कोणत्याही माध्यमाची विशिष्ट बलस्थाने आणि मर्यादा असतात. जिवंत मानवी पैलू हा नाटकाचा प्लस पाँइंट आहे. दुसरीकडे, आजच्या परिस्थितीत व्हिडिओ माध्यमाची पसरवण्याची क्षमता लक्षात घेतली तर त्या बाबतीत नाटकाच्या मर्यादा स्पष्ट होतात. सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे नाटकाचा प्रेक्षक कमी झाला आहे. मात्र एका जिवंत माणसाला दुसराच कुणीतरी झालेला प्रत्यक्ष पाहताना प्रेक्षकांना मिळणारा आनंद हे नाटकाचे एक मोठे बलस्थान आहे.असे नारायण यांना वाटते. श्याम रंगीला नावाचे कोमेडियनसुद्धा यावेळी वाराणसीमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर नारायण यांना अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम म्हणून नाटक महत्त्वाचे वाटत आहे.

नाटक मी व्यवस्थेतील हस्तक्षेपासाठी करतो असे मानणारे नारायण यासंदर्भात सांगतात, काही जणांनी एकत्र येऊन काही लोकांसमोर एखादे नाटक सादर करणे या कृतीतच एक हस्तक्षेप दडलेला असतो. विधिनाट्ये ही निसर्गामध्ये हस्तक्षेप कऱण्याच्या उद्देशाने निर्माण झाली. कोणतीही कलाकृती कोणाची ना कोणाची बाजू मांडत असते. कळत वा नकळत, उघडपणे वा लपून. त्यादृष्टीने प्रचार हादेखील कोणत्याही नाटकाचा कमी जास्त प्रमाणात भाग असतोच.

नाटकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केलेच पाहिजे. वैचारिक हस्तक्षेपाच्या उद्देशाने केलेल्या नाटकालाही मनोरंजनाची जबाबदारी घ्यावीच लागते. नाटकाने वास्तवाला आकार देणाऱ्या हातोड्याची भूमिका बजावली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणाऱ्या बर्टोल्ट ब्रेख्तने ठासून सांगितले आहे की, नाटकाचा खेळ रंगला पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांची लोकनाट्ये त्यांच्यातील बहुआयामी रंजकतेशिवाय इतका प्रभावी हस्तक्षेप करू शकली नसती.

महात्मा फुलेंचे ‘तृतीयरत्न’ हे मराठीतले पहिले खऱ्या अर्थाने आधुनिक नाटक आहे असे ते मानतात. या अनुषंगाने ते बोलताना सांगतात की, या नाटकाची रचना आणि अंतर्वस्तू यादृष्टीने ते आधुनिकतेने समृद्ध आहे. प्रबोधन आणि मनोरंजनाचा विलक्षण संयोग हेदेखील त्याचे एक वैशिष्ट्य आहे. अगदी १९५० पर्यंत मराठीतील बहुतांश अभिजन नाट्यकर्मी देखील कला केवळ मनोरंजनासाठी किंवा कला फक्त कलेसाठी असे मानीत नव्हते. अनेक यशस्वी अभिजन नाटककार हे वर्तमानपत्रांचे संपादक होते. व्यावसायिक रंगभूमीवर राष्ट्रवादी नाटके सादर झाली किंबहुना, मनोरंजन हे प्रबोधनाच्या विरोधी आहे; असे अभिजन वर्गानेही गृहीत धरलेले नव्हते.१९ व्या शतकाच्या मध्यावर तिकीट लावून नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाल्यापासून आतापर्यंत नाटक जसे बदलत गेले त्याचप्रमाणे नाटकाविषयीच्या, त्याच्या हेतूविषयीच्या कल्पनादेखील समाजातील बदलांबरोबर बदलल्या. नाटक निव्वळ मनोरंजनासाठी असे म्हणताना कधी कधी मनोरंजन करणे म्हणजे हसवणे असे गृहीत धरलेले असते. हा समज अगदीच उथळ आहे. प्रत्यक्षात दुःखदायक वा भीतीदायक ठरणाऱ्या गोष्टींची मंचावरची अनुकृती प्रेक्षकांना आनंद देते. नाहीतर ट्रॅजेडी कशा निर्माण झाल्या असत्या.

तृतीयरत्न पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा https://amzn.to/4bsnIx5

कधी कधी नाटक निव्वळ मनोरंजनासाठी असे म्हणताना मनोरंजनाच्या प्रांतात विचारप्रवृत्त होण्याला वाव असता कामा नये असे गृहीत धरलेले असते. भांडवली व्यवस्थेत नाटकाच्या आस्वादाला विकाऊ वस्तूचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे येणारे प्रेक्षक जपण्याचे व्यावसायिक दडपण हे यामागचे एक कारण असू शकते. त्याचप्रमाणे, ज्या समाजात बहुसंख्य लोकांना दिवसाला आठ ते दहा तास मनाविरुद्ध काम करावे लागते तिथे व्यक्तीचे फक्त स्वतःच्या श्रमाबरोबरचेच नाते विस्कटते असे नव्हे तर कलास्वादाची त्याची जाणीव देखील प्रभावित होते. पगारी गुलामीच्या श्रमानंतरची आवश्यक गुंगी असे स्वरूप कलेला बाजारकेंद्री व्यवस्थेत प्राप्त झाले तर नवल नाही. काही का असेना, नाटक निव्वळ मनोरंजनासाठी हा विचार अभिजनांसाठी त्यांच्या सामाजिक स्थानाच्या दृष्टीने निश्चितच सोयीचा ठरतो. दुसरीकडे,बहुजन समाजाला त्याच्या जगण्यातूनच व्यवस्थेला प्रश्न विचारण्याच्या प्रेऱणा मिळत असतात. प्रस्थापित दृष्टीकोनातून वेगळ्या दृष्टीकोनातून तयार झालेली नाटके आंतरिक गरजेतून वेगळे प्रयोग करतात. त्यातून नाटक बदलते. त्या अर्थाने नाटक हे बहुजन वर्गाचे आहे.

नारायण यांचे नाटकाबद्दलचे वरील विचार समजून घेतले की, असं लक्षात येतं की, त्यांनी नाटकाबदल इत्यंभूत चिंतन केलेले आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने ते आजचे नाटक सादर करत आले आहेत.

अजय कांडर
लेखक, विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत
9404395155

Related posts

शरीराच्या गावात आत्मानंद नित्य नांदण्यासाठी….

शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या !

डॉ.भाऊसाहेब मिस्तरी यांच्या रंधा कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406