महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता
मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यन्त ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी ( विजांच्या गडगडाटासह वारा, गारा ) पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात रविवार (दि.१२ मे) पासून त्यापुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे ) पर्यन्त मध्यम अवकाळी पावसासोबत विशेष गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
त्यातही या पाच दिवसात विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यतेची तीव्रता अधिक जाणवते.
मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र आठवडाभर म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यन्त तेथे सरासरी इतके म्हणजे ३५ व २५ अंश सेल्सिअस ग्रेड दरम्यानचे कमाल व किमान तापमाने राहणार असुन तेथे उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता, रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस या सारख्या कोणत्याही वातावरणाची शक्यता नसुन केवळ स्वच्छ उन्हाळी वातावरण जाणवेल, असे वाटते.
एकंदरीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान महाराष्ट्रात कोणतीही उष्णतेची लाट जाणवणार नाही. शिवाय ढगाळ वातावरण व काहींश्या वारा वहनातून २९ जिल्ह्यात दुपारी ३ चे कमाल तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअस दरम्यान म्हणजे सरासरी इतके किंवा क्वचितच एक ते दोन अंश सेल्सिअसने अधिक जाणवेल. त्यामुळे उन्हाचा विशेष चटका जाणवणार नाही. तसेच मतदारांनी विशेषतः सकाळ व दुपारच्या प्रहरात म्हणजे दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान उरकल्यास त्यांना अवकाळी वातावरणाचा कोणताही विशेष अडथळाही जाणवणार नाही, असे वाटते.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.