April 25, 2024
Natural beauty of Zhadipatti
Home » निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी
पर्यटन

निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी

नैसर्गिक वनसंपदाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर हे चार जिल्हे म्हणजेच आमची झाडीपट्टी होय. या चार जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणजे वैनगंगा.या नदीच्या पवित्र पाण्याने आणि काठावरील विविध तीर्थक्षेत्रांच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेली माती, निसर्ग संपन्न वनस्पती, वन्यजीव, ऐतिहासिक स्थळे, गावतलाव आणि हिरवेगार भाताची पिके पर्यटकांना आकर्षित करतात.

अरूण झगडकर, गोंडपिपरी जि.चंद्रपूर

सम्राट अशोकांचे वास्तव्य असल्याची साक्ष देणारे अनेक प्राचीन वास्तू जमिनीच्या भूगर्भात गडप झाले असल्याचे दिसून येते जसे मुलचेरा येथील बौद्ध स्तूप, सातवाहन काळातील विविध प्रकारची प्राचीन अवशेष, वाकाटकालीन वास्तू, परमार काळातील जीर्ण झालेली मंदिरे, झाडीपट्टीच्या प्राचीन वैभवाच्या खुणा दर्शवितात. प्राचीन काळी गोंडवाना प्रदेश म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या या प्रदेशाला आता झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते.

झाडीपट्टी हा भाग प्रामुख्याने भारताच्या मध्यभाग होय. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तिन्ही राज्याच्या सीमा भागात झाडीपट्टीची संस्कृती प्रामुख्याने आढळून येते. या भागातील भाषा सण उत्सव उत्सव रूढी परंपरा जवळपास दोन-दोन संस्कृतीची मिळत्यात जुळत्या आहेत. या भागात बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबतच इतर धर्मियांच्या सण,उत्सवाचा प्रभाव येथील लोकजीवन झाल्याचा दिसून येतो. त्यामुळे झाडीपट्टी वैभव्यांनी समृद्ध आहे.

अतिशय विलोभनीय आणि मनाला भरणारे निसर्गसौंदर्य मध्य भारतातील नंदनवन असल्याची ग्वाही देतात. घनदाट वनश्रीचा गालिचा पांघरलेला झाडीपट्टीचा प्रदेश विविध रोगावरील रामबाण वनौषधींची खजिना आहे. वैनगंगेसह वर्धा, प्राणहिता, इंद्रायणी, गाढवी, खोब्रागडी, पोटफोळी व अन्य नद्यांच्या सततच्या खळखळनाऱ्या प्रवाहांनी निसर्गात नादमृदुंगाचे सूर उमटतात. गावागावातील जलाशयाची शितल शांतता व सुबकता झाडीपट्टीचा समृद्धीची साक्ष देतात.

एटापल्ली तालुक्यात सुरजागड डोंगर आहे. सूरजागडच्या डोंगररांगा २७ किलोमीटर पसरलेल्या आहेत. तो सूरजागड पहाडी म्हणून ओळखला जातो. या जंगलामध्ये वनस्पती आणि प्राणी यांच्या विविध प्रजाती आहेत. या प्रदेशातील घनदाट जंगल आणि हिरवळ या भागातील पर्यकटकांना आकर्षित करते. झाडीपट्टीच्यापरिसरातील दगडांमध्ये भरपूर लोहखनिज आहे. हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या डोंगराळ भागातील फुलपाखरांच्या प्रजातीही अभ्यासक आणि पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात, छोटे धबधबे आणि पूर आलेल्या नद्या या प्रदेशात विलक्षण दृश्य निर्माण करतात. पावसाळ्याच्या दिवसात झाडीपट्टीतील निसर्ग बहरून सृष्टीला नवा साज चढवतो. असा हा झाडीपट्टीचा भाग म्हणजे निसर्गाची मुक्तहस्त उधळण होय. जणू झाडीपट्टी म्हणजे महाराष्ट्राचे काश्मीर असल्याचा भास होतो.

Related posts

रुतला बाई काटा…

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरील मराठी कादंबरी – विश्वास पाटील.

झाडीबोली भाषेत माय माऊलींच्या संस्काराचा खजिना- बंडोपंत बोढेकर

Leave a Comment