June 20, 2024
Ashwamegha Granthalaya Award Satara
Home » अश्वमेध ग्रंथालय पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

अश्वमेध ग्रंथालय पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

  • जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षातील प्रकाशित दोन उत्कृष्ट साहित्यकृतींना ‘अक्षरगौरव पुरस्कार २०२२’
  • पुरस्काराचे स्वरूप २,५००/- रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ
  • सातारा जिल्ह्यातील दोन लेखकांना अक्षर गौरव विशेष साहित्य पुरस्कार
  • साहित्यकृतीच्या दोन प्रती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाकडे पाठवण्याचे आवाहन

सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय हे गेली चौदा-पंधरा वर्षे वाचकांच्या सेवेसाठी अखंड कार्यरत असून, या ग्रंथालयाच्या वतीने वाचन संस्कृती समाजात रुजावी व वाढीस लागावी म्हणून वेगवेगळे साहित्यिक उपक्रम, व्याख्याने, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.  यातीलच एक भाग म्हणून ग्रंथालयाकडून लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने उत्कृष्ट साहित्यकृतींना राज्यस्तरीय कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ ‘अक्षरगौरव पुरस्कार’ देण्यात येतो.

यापूर्वी कवी संदीप खरे, व. बा. बोधे, कृष्णात खोत, परशुराम देशपांडे, वामन काळे, श्रीकांत घोंगडे, मंजूश्री गोखले, सुधीर गाडगीळ, विश्वास वसेकर, पोलिस महानिरीक्षक विश्वाास नांगरे- पाटील, श्रीनिवास भणगे, उमा वि. कुलकर्णी, नवनाथ गोरे, संतोष वाटपाडे, सुप्रिया जाधव, सुनिता राजे पवार, महेंद्र कदम यांना ‘अक्षर गौरव साहित्य पुरस्कार’ तर सातारा जिल्ह्यातील प्राचार्य यशवंत पाटणे, प्रा. सुहासकुमार बोबडे, आनंदा ननावरे, बाळासाहेब शिंदे, सौ. कांता भोसले, रवींद्र बेडकीहाळ, सौ. कादंबरी देशमुख, डॉ. विकास खिलारे, प्रदीप कांबळे, प्रा. अजीत पाटील, डॉ. मानसी वि. लाटकर, प्राचार्य मा. के. यादव, डॉ संदीप श्रोत्री, वर्षा देशपांडे, डॉ शंतनू अभ्यंकर या लेखकांना ‘अक्षर गौरव विशेष पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

याच बरोबर कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर, संस्कृती प्रकाशनाच्या सुनिताराजे पवार, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर तर अक्षरधारा वितरणाचे रमेश राठिवडेकर या मान्यवरांना प्रकाशन व वितरण क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांचे वितरण डॉ. अरुणा ढेरे, वैजनाथ महाजन, दत्तप्रसाद दाभोळकर, नागनाथ कोत्तापल्ले, गझलकार प्रदीप निफाडकर, प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानुगडे- पाटील, नाटककार अभिराम भडकमकर या मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे.

या वर्षी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षातील प्रकाशित दोन उत्कृष्ट साहित्यकृतींना ‘अक्षरगौरव पुरस्कार २०२२’ हा पुरस्कार देण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप २,५००/- रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. साहित्य क्षेत्रातील जाणकार निवड समितीकडून या साहित्यकृतींची निवड केली जाईल. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील दोन लेखकांना अक्षर गौरव विशेष साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, २५२, सोमवार पेठ, स्नेहल अपार्टमेंट, दत्तमंदिर चौक, सातारा या पत्त्यावर ३१ जुलै, २०२२ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र झुटिंग (नगरसेवक) व कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.

या पुरस्काराबाबतचे सर्व अधिकार निवड समितीला राहतील. या पुरस्काराचे वितरण तारीख नंतर कळविली जाईल.  या पुरस्कारासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश घेता येईल. तसेच या पुरस्काराचे वितरण साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष शशिभूषण जाधव व खजिनदार विनोद कुलकर्णी यांनी दिली. अधिक माहितीसाठी साहित्यिक डॉ. राजेंद्र माने (९४२२६०००३५) यांच्याशी संपर्क साधावा.

Related posts

मखाना खाण्याचे फायदे…

भक्ताच्या भक्तीपोटीच व्यक्त होतात गुरू

तुळशीची काळजी कशी घ्यायची ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406