विज्ञानाने सर्व गोष्टींचा उलघडा हा यासाठीच होणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या नजरेतून सर्व जग यासाठी पाहण्याची गरज आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन सर्व अंधश्रद्धा नष्ट करतो. अंधश्रद्धा नष्ट झाली तरच ज्ञानावर आपली श्रद्धा जडेल.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
आणि जयाचां प्रकाशीं । जग हारपें चंद्राकेंसीं ।
सचंद्र नक्षत्रे जैसी । दिनोदयीं ।। ३१४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – आणि ज्याप्रमाणें सूर्योदयी चंद्रासह नक्षत्रे लोपतात, त्याप्रमाणें ज्या आत्मवस्तूच्या प्रकाशांत चंद्रसूर्यासह सर्व जग लोपून जाते.
सूर्योदय झाल्यावर सर्व अंधार दूर होतो. सूर्याच्या प्रकाशाने, त्याच्या तेजाने डोळ्यांना सर्व वस्तू स्पष्टपणे दिसतात. पण अंधारात आकाशात स्पष्ट दिसणारी नक्षत्रे, तारे दिवसा दिसत नाहीत. चंद्र, तारे हे आकाशात असतात पण सूर्याच्या तेजासमोर ते लोप पावतात. त्यांचे अस्तित्व हे जाणवतही नाही. मुळात चंद्राला स्वतःचा असा प्रकाशच नाही. ताऱ्यांना सुद्धा स्वतःचा असा प्रकाश नाही. सूर्याचा प्रकाश जेव्हा त्यांच्यावर पडतो तेव्हा ते प्रकाशमान होतात. सूर्यामुळेच त्यांचे अस्तित्व आपणास जाणवते. यामागचे विज्ञान विचारात घेण्याची गरज आहे.
चंद्राचा, ताऱ्यांचा प्रकाश रात्रीच्यावेळी आपणास हवाहवासा वाटतो. या प्रकाशामुळे अंधकारमय रात्रीत दिलासा मिळतो. डोळ्यांना काही वस्तू दिसू शकतात. रात्रीच्यावेळी प्रवास करताना याची गरज निश्चितच आपण वाटते. चंद्राच्या प्रकाशात चालणे सोपे जाते. चाचपडत चालावे लागत नाही. अमावशेच्या रात्री यासाठीच पूर्वीच्याकाळी न जाण्याचा सल्ला दिला जायचा. कारण अंधारात चालणे, वाट शोधणे तितकेसे सोपे काम नव्हते. पूर्वीच्या रुढी, पंरपरा विचारात घेतल्यातर व तत्कालिन परिस्थितीचा विचार केल्यास त्या कशा योग्य होत्या याची जाणिव आपणास होऊ शकते. अंधश्रद्धांचा जन्मही यातूनच झाला आहे. अज्ञानातूनच अंधश्रद्धेला खतपाणी मिळत राहाते. अमावेशाला दुर्घटना ह्या अंधारामुळे होत होत्या पण अंधश्रद्धेमुळे किंवा तत्कालिन परिस्थितीत निर्माण करण्यात आलेल्या भीतीदायक वातावरणामुळे आपणास ते खोटे वाटायचे. कारण आपल्या मनावर त्या घटनांचा पगडाच तितका बिंबवला गेलेला होता.
पण वीजेच्या शोधाने चंद्र आणि ताऱ्यांचे महत्त्वच वाटेणासे झाले आहे. अमावशा, पौर्णिमा केव्हा असते हे सुद्धा आता पटकण लक्षात येत नाही. कारण रात्रीच्यावेळी वाटणारी चंद्राची गरजच आता भासत नाही. निसर्गातील प्रकाशाचा उत्तम स्त्रोत असणारा चंद्र आपणास आता कधी उगवतो अन् कधी मावळतो हे सुद्धा समजून येत नाही. अमावशेमागच्या अंधश्रद्धातर आता पूर्णतः नष्ट झाल्या आहेत. कारण वीजेच्या प्रकाशाने पडलेल्या ज्ञानाच्या उजेडात हे सर्व अज्ञान आता निघून गेले आहे.
विज्ञानाने सर्व गोष्टींचा उलघडा हा यासाठीच होणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या नजरेतून सर्व जग यासाठी पाहण्याची गरज आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन सर्व अंधश्रद्धा नष्ट करतो. अंधश्रद्धा नष्ट झाली तरच ज्ञानावर आपली श्रद्धा जडेल. दररोज नवनवे शोध लागत आहेत. नवनवे तंत्रज्ञान समोर येत आहे. नवनवे उलघडे होऊ लागले आहेत. यातून ज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहेत. या ज्ञानातूनच आता आत्मज्ञानाचा बोध घेण्याचा, अनुभव, अनुभुती घेण्याचा प्रयत्न करायला हवा. सूर्याच्या प्रकाशात चंद्र, ताऱ्यांचा प्रकाश लोप पावतो तसे या आत्मज्ञानाच्या प्रकाशात सूर्याचा प्रकाशही फिका पडतो. त्याच्या पलिकडेची ज्ञानाची कक्षा विस्तारते. ब्रह्मांडाचे ज्ञान यातूनच करून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पूर्वीच्या साधू, संतांनी या ज्ञानातूनच शोध लावले. यासाठी या आत्मज्ञानाचा वारसा, भारतीय संस्कृतीचा हा वारसा असा पुढे सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. युगानुयुगे या ज्ञानपरंपरेचा दिवा तेवत आहे तो अशाच पुढे तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.