March 25, 2023
Dnyneshwari the book of Experience article by Rajendra Ghorpade
Home » ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ

अध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच प्रगती होत राहते. सर्व सद्गुरूच घडवत असल्याने चिंतेचे कारण नाही. जे घडते ते सर्व तेच घडवतात. बिघडले तरी तेच त्यात सुधारणा करतात. सुचविणारे तेच असल्यावर व्याख्यान हे त्यांना अभिप्रेत असेच होणार ना.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तरि तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे ।
म्हणूनि मतांगे । बोलों ठेला ।।३३३।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – तरी तुम्ही जे रसिक, त्या तुम्हांयोग्य व्याख्यान योजावे लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली.

समोरचे श्रोते कसे आहेत त्यानुसार व्याख्यात्याला व्याख्यान करावे लागते. ऐकणाऱ्याला रुचेल, पटेल अशीच मते मांडावी लागतात. ऐकणाऱ्याचा प्रतिसाद मिळत नसेल तर सांगणाऱ्यालाही स्फुरण चढत नाही. श्रोत्यांनी दाद दिली तरच वक्त्यालाही सांगण्यास उत्साह येतो. संत ज्ञानेश्वर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान देत आहेत. गुरूंना जे अभिप्रेत आहे तेच ते येथे सांगत आहेत. येथे वक्ते ज्ञानेश्वर महाराज आहेत तर श्रोते हे निवृत्तिनाथ आहेत. शिष्य गुरूंना सांगत आहे.

अध्यात्म ही शिक्षणाची एक वेगळीच पद्धत आहे. इतर शैक्षणिक पद्धतीत शिष्यांना गुरू व्याख्यान देतात. सध्याच्या युगात तर शिकण्यासाठी खासगी शिकविण्याही लावाव्या लागतात. पण येथे शिष्य गुरूंना व्याख्यान देत आहे. अध्यात्मामध्ये स्वतःच स्वतःचा अभ्यास करायचा असतो. पण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो करावयाचा असतो. स्वतःच स्वतःची प्रगती साधायची असते. अनुभवातून येथे शिकायचे असते.

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अनुभवातूनच उदयास आला आहे. अनुभवातून प्रकट झालेले ते बोल आहेत. यासाठी ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. सद्गुरूंनी शिष्याकडून करवून घेतलेली ती साधना आहे. ग्रंथामध्ये मी केले, मी सांगितले असा अहंभाव कोठेही नाही. हे सर्व सद्गुरूंनी करवून घेतले आहे असे सांगितले आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. कर्ता-करविता सर्व सद्गुरूच आहेत. यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही. अध्यात्मावर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत. पण अनुभूतीतून लिहिलेली पुस्तके फारच थोडी आहेत. जे अनुभवले तेच सांगितले.

सद्गुरूच सर्व शिष्याकडून करवून घेत असतात. यासाठी असे सर्व ग्रंथ हे सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले जातात. ही विद्या सद्गुरूंच्याकडूनच प्राप्त झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगत असले तरी सांगण्यासाठी जी स्फुर्ती त्यांना मिळालेली आहे ती संत निवृत्तीनाथांकडून मिळालेली आहे. अनुभूतीतून शिष्याची प्रगती सद्गुरू साधत असतात. अनुभवातून अनुभूती येते. अनुभूतीतूनच मग आत्मज्ञान प्रकट होते. आत्मज्ञानाचा बोध होतो. आत्मज्ञान प्राप्ती होते.

अध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच प्रगती होत राहते. सर्व सद्गुरूच घडवत असल्याने चिंतेचे कारण नाही. जे घडते ते सर्व तेच घडवतात. बिघडले तरी तेच त्यात सुधारणा करतात. सुचविणारे तेच असल्यावर व्याख्यान हे त्यांना अभिप्रेत असेच होणार ना. हा अध्यात्मातील भाव जाणून घ्यायला हवा. तरच आपण आध्यात्मिक प्रगती साधू शकू.

Related posts

सृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ

पाठांतर नको, तर मन लावून पठण हवे

पल्लवीचे महत्त्व जाणा…

Leave a Comment