October 15, 2024
ratnagiri-zhadgaon-marine biological research station tourists spot
Home » Privacy Policy » अबब..५५ फुटी देवमाशाचा सांगाडा…अन् बरंच काही..
पर्यटन

अबब..५५ फुटी देवमाशाचा सांगाडा…अन् बरंच काही..

रत्नागिरी येथील मत्स्यालयाला व संग्रहालयास भेट दिल्यास आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. त्यासाठी आपले रत्नागिरीत निश्चितपणे स्वागत आहे.. एक पर्यटक..अभ्यासक..जिज्ञासू अन् विद्यार्थी म्हणून..!

प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

डायानासोरपेक्षा मोठा असणाऱ्या देवमाशाचा ५५ फुटी सांगाडा ‘इथे’ ठेवला आहे. आयुष्याची ५० हून अधिक वर्षे पार केलेले जिवंत कासव आजही शांतपणे पोहताना ‘इथे’ दिसते. काचेसारखा पारदर्शक ग्लास फिश अर्थात काचूक मासा तोही पोहताना ‘इथे’ दिसला. गोड्या पाण्यातील आणि सागरी पाण्यातील माशांच्या जवळपास ९० प्रजाती मत्स्यालयात, तर २५४ समुद्री जलचरांच्या प्रजाती रसायनामध्ये मत्स्यसंग्रहालयात जतन करुन ठेवल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या रत्नागिरी येथील झाडगाव मधील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राने सुरु केलेल्या मत्स्यालयात हे सर्व आपल्याला पाहायला मिळते.

हे मत्स्यालय अतिशय चित्ताकर्षक असून यामध्ये गोड्या पाण्यातील माशांचे अॕक्वेरियम, सिक्लीड माशांचे अॕक्वेरियम, टेडप्लांटेड (पाणवनस्पतींचे) अॕक्वेरियम तसेच मरीन अॕक्वेरियम बनविण्याकरिता आधुनिक फिल्टरेशन व प्रकाश योजनेचा उपयोग इथे केला आहे.

मत्स्यालयामध्ये प्रदर्नामध्ये माशांच्या ठेवलेल्या प्रजातींमध्ये अरोवाना मासा, हम्पी हेड फ्लॉवर हॉर्न फिश, डिस्कस मासे, ब्लॅक घोस्ट फिश, पाकु मासा असे विविध आकर्षक गोड्या पाण्यातील मासे, तर लायन फिश, बटर फ्लाय माशांच्या विविध प्रजाती, डॅमसेल माशांच्या विविध प्रजाती, पफर माशांच्या विविध प्रजाती असे चित्ताकर्षक मासे ठेवले आहेत. प्लांटेड अॕक्वारियमच्या विविध १५ प्रकारच्या पाण वनस्पतींनी सजविलेले हे अॕक्वेरियम पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

मत्स्यसंग्रहालयामध्ये विविध २५४ प्रजाती समुद्री जलचर रसायनामध्ये जतन करून ठेवल्या आहेत. तसेच शंख-शिंपल्यांच्या विविध प्रजाती प्रदर्शनामध्ये ठेवल्या आहेत. मत्स्यसंग्रहालयातील डॉल्फिन मासा, ५० वर्षाहून अधिक काळ जतन केलेले जिवंत कासव पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतात.

देवमास्याचा सांगाडा

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर १९८० मध्ये हा आढळला. त्यावेळी त्याचे वजन ५ टन म्हणजेच ५ हजार किलो होते. लांबी ५५ फूट, तोंड ७ फूट लांब तर २ फूट उंच होते. त्यावेळी तेथेच वाळूत त्याला पुरण्यात आले. दोन महिन्यानंतर त्याच्या हाडाचा सांगाडा रत्नागिरी येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्यालयात आणण्यात आले. डोक्याची कवटी, १९ बरगड्या व ४० मणक्यांनी हा सांगाडा बनला आहे.

काहीवेळेला मोठमोठी जहाजेदेखील तो सहजगत्या फोडू शकतो, इतका देवमासा शक्तीशाली आसतो. सर्व प्राणी सृष्टीत देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. सूक्ष्म जीव हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. त्यांना दात नसतात. उन्हाळ्यात एका दिवसात १ ते ४ टन खाद्य ते खातात. डायनासोरपेक्षाही मोठा असणारा देवमासा ताशी ४५ किमी तो पोहू शकतो.

मत्स्यालयाला भेट देण्याकरिता शालेय सहलीबरोबर येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना (इ. १० वी पर्यंत) १० रुपये प्रती विद्यार्थी (शाळेचे विनंती पत्र आवश्यक) तर ३ वर्षावरील सर्व पर्यटकांरिता प्रती व्यक्ती २० रुपये शुल्क आकारले जाते. पर्यटकांकरिता केंद्राच्या तलावामध्ये बोटिंगची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रती व्यक्ती २० रुपये शुल्क आकारले जाते. हे मत्या आलय सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत. (हंगाममध्ये संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत) सुरु असते.

मत्स्यालय आणि संग्रहालय सध्याचे चालू गुगल मॅप (लोकेशन): https://maps.app.goo.gl/Jb5XkRxXcqmoQkXW6
https://maps.app.goo.gl/bYpKQfaeVzA9eTih9
https://maps.app.goo.gl/UQW5uF5VkmZE3CyM8

सद्या असणाऱ्या मत्स्यालयाचे भविष्यातील पेठकिल्ला https://maps.app.goo.gl/RwKibm7K1VUWKBqA7
हे स्थान असणार आहे.

या मत्स्यालयाचा संपर्क पत्ता – वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, मुरुगवाडा कॉर्नर, पांढरा समुद्र जवळ, झाडगाव, रत्नागिरी ४१५६१२ असाआहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading