साधनेने पित्त शांत होते. पित्ताचा सामू समपातळीत ठेवण्यात मदत होते. साधनेत पित्त जळते. त्यातील अनावश्यक घटक जळतात. साधनेतून शरीरात उत्तम द्रव्ये उत्पन्न होतात. याचा परिणाम कातडीवर होतो. कातडी उजळते. चेहऱ्यावरील तेज वाढते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
परि हरूनि कफवात । जैं देहीं आटोपे पित्त।
तैं करी संतप्त । देह जेवीं ।। १९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा
ओवीचा अर्थ – परंतु, कफ व वात यांस मागें सारून जेंव्हा पित्त देहांत व्यापते, तेंव्हा ते पित्त देहाला जसें संतप्त करते.
शरीर हे विविध रसायनांनी तयार झाले आहे. शरीरात घडणाऱ्या रासायनिक क्रियेतून अनेक द्रव्ये तयार होतात. आहार आणि मानसिक स्थिती यानुसार पित्ताशयात ही द्रव्ये उत्पन्न होतात. यासाठी आहार कोणता घ्यावा याला महत्त्व प्राप्त होते. एखादा रोग झाला तर तो रोग बरा करण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात येते. रोगावर योग्य ते औषध घ्यावे लागते. पोटात दुखत असेल तर गुडघे दुखीवरील औषध घेऊन चालत नाही. डोके दुखत असेल तर पाठदुखीवरील औषध घेऊन चालत नाही. प्रत्येक औषधाचा गुणधर्म हा ठरलेला आहे.
शरीरात रोग प्रतिकारक रस उत्पन्न करण्याचे प्रयत्न ही औषधे करतात. जसे प्रत्येक औषधाचा गुण वेगळा आहे. तसा आपण जे पदार्थ खातो त्याचेही गुण वेगळे आहेत. भातातून मिळणारे घटक वेगळे आहेत. भाकरी, चपातीतून मिळणारे घटक वेगळे आहेत. त्या त्या पदार्थांपासून उत्पन्न होणारे रसही वेगळे आहेत. अंडी, मटणातून मिळणारे घटकही वेगळे आहेत. आहारात आढळणाऱ्या घटकातूनच, त्याच्या जडत्वावरूनच कोणता आहार सात्त्विक आणि कोणता आहार तामस आहे हे ठरविले जाते. आहार शरीरात विविध द्रव्ये उत्पन्न करतो.
सात्त्विक आहार सात्त्विक द्रव्ये उत्पन्न करतो. तामस आहार शरीरात तामस द्रव्ये उत्पन्न करतो. ही सर्व रसायने पित्ताशयात उत्पन्न होतात. पित्त खवळते म्हणजे पित्तात तामस द्रव्यांचे प्रमाण अधिक वाढते. हे द्रव्य तयार होण्यासाठी मानसिकताही कारणीभूत असते. मनाची स्थिती कशी आहे यावर पाचक शक्ती अवलंबून असते. त्यानुसार पित्त तयार होते. पित्त हे रासायनिक द्रव्य आहे. त्याचा सामू हा समपातळीत राहायला हवा. रागीट व्यक्तींचा सामू अॅसिडिक असतो. पित्त जास्त अॅसिडिक असूनही चालत नाही. पाचकशक्तीवर याचा परिणाम होतो. त्याने डोके दुखते, छातीत दुखते, उलट्या होतात. यावर उपाय म्हणजे पित्त शांत करावे लागते. पित्त देहात व्यापू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ते देहात व्यापले तर मन संतप्त होते. म्हणजेच मन अशांत होते.
साधनेने मात्र पित्त शांत होते. पित्ताचा सामू समपातळीत ठेवण्यात मदत होते. साधनेत पित्त जळते. त्यातील अनावश्यक घटक जळतात. साधनेतून शरीरात उत्तम द्रव्ये उत्पन्न होतात. याचा परिणाम कातडीवर होतो. कातडी उजळते. चेहऱ्यावरील तेज वाढते. पाचकशक्ती सुधारते. मनात शांती उत्पन्न होते. मन उत्साही राहते. एका साधनेने हे साध्य होते. भक्तीने हे साध्य होते. हळूहळू शरीरात सात्त्विक वृत्तीचे पित्त पसरते. सात्त्विक भाव उत्पन्न होतात. मनात शांती उत्पन्न होते. मन स्थिर होते. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आवश्यक स्थिती उत्पन्न होते. गुरूकृपने मग आत्मज्ञान होते.