February 6, 2023
Sunita Raje Pawar Devoted work in literature
Home » पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ताई
मुक्त संवाद विशेष संपादकीय

पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ताई

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज सुनिताराजे पवार यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.
मो. 9823627244

साहित्य विश्वात अल्पावधीत आपले स्थान निर्माण करणाऱ्या एक प्रतिथयश लेखक व संस्कृत प्रकाशन नावारूपास आणणाऱ्या प्रकाशक म्हणजे सुनिताराजे पवार. खटाव तालुक्यांतील पुसेगाव सारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या सुनिताराजेंनी एम.ए. मराठी करून एमपीएससीचा अभ्यास करून राज्यसेवेच्या परीक्षेत निवड होऊनही साहित्य क्षेत्रात रूची असल्याने पुण्यासारख्या प्रस्थापितांच्या दुनियेत प्रकाशनासारखं आव्हानात्मक क्षेत्र निवडलं. सुरूवातीच्या काळात त्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं. पण ताई चिकाटीने, जिद्दीने पुण्यात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या.

सन २००१ मधे प्रकाशन व्यवसायाची सुरूवात करून आजवर त्यांनी ४५० पुस्तके प्रकाशित केली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला कोषाध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. पुण्यातील आप्पा बळवंत चौक हा साहित्य पंढरी मानली जाते, अशा ठिकाणी स्वतःचे ग्रंथदालन निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही.

सन २००८ पासून संस्कृती दिवाळी अंक सुरू करून साहित्य विश्वात त्यालाही मानाचे स्थान प्राप्त करण्यात त्या यशस्वी झाल्या. अनेक प्रतिथयश लेखकांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून त्यांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ताई विविध सामाजिक व साहित्यिक कार्यक्रमांना हजेरी लावतात.

साहित्यसेवेबरोबरच त्यांनी सामाजिक बांधिलकी मानून वाचन चळवळ सक्षम करण्यासाठी खेडोपाड्यात ग्रंथप्रदर्शने, ग्रंथरथ, अनेक संस्था, विद्यार्थी यांना मोफत पुस्तके भेट, गेल्या २१ वर्षात सातारा ग्रंथ महोत्सवाच्या समन्वयक म्हणून महत्वपूर्ण सहभाग. इंद्रायणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आळंदीमधे अनाथ, गरीब मुलांसाठी आश्रम स्थापन करून ७० मुलांची निवास व भोजनाची सोय. संस्कृती प्रकाशनच्या वतीने त्यांचे वडील कै. आनंद बजाबा फडतरे-देशमुख यांच्या स्मरणार्थ संस्कृती वाड्.मयसेवा पुरस्कार व संस्कृती वाचन संस्कार पुरस्कार दरवर्षी दिले जातात. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या १ लाखाच्या देणगीतून मातोश्री कै. फुलाबाई फडतरे-देशमुख यांच्या स्मरणार्थ एका ग्रामीण साहित्यकृतीस प्रतिवर्षी पुरस्कार दिला जातो.

ताईंचे पती शासकीय सेवेत कार्यरत होते. दोन मुले अभियंता असून दोघेही संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच एक सून फॅशन डिझायनर व दुसरी गायिका आणि अभियंता आहे. ताईंच्या घरात सर्वजण आपापल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

आज ताई मराठी प्रकाशक परिषद कोषाध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळ सदस्य, बहिःशाल व्याख्यानमालेच्या व्याख्याता, चौंडेश्वरी शिक्षण संस्था संचालक रहिमतपूर, संस्कृती ग्रंथालय अध्यक्ष येरवडा, इंद्रायणी प्रतिष्ठान अध्यक्ष आळंदी, राजमाता जिजाऊ पतसंस्था पुणे अशा विविध संस्थांवर कार्यरत आहेत.

कांडा, मी कसा घडलो (आर.आर.पाटील), प्रतिभावंतांच गाव, कविता महाराष्ट्राची, बदलती ग्रामसंस्कृती, संगमरवरी स्वप्नांचा शिलेदार-ग्रेस, न पाठवलेलं पत्र, मराठी भाषा समृध्द करणाऱ्या साहित्यकृती अशी ग्रंथसंपदा प्रकाशित आहेत. त्यांच्या ‘कांडा’ या ग्रंथास यशवंतराव प्रतिष्ठानचा साने गुरूजी बालसाहित्य पुरस्कार, अश्वमेध ग्रंथालय साताराचा अक्षरगौरव स्मृती पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांच्या साहित्यिक योगदानामुळे त्यांना मंगळवेढा, सांगली, सातारा, पिंपरी-चिंचवड, रहिमतपूर अशा ठिकाणी विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे.

मधू कांबीकर, रामदास फुटाणे, मृणाल कुलकर्णी व उत्तम कांबळे या मान्यवरांच्या मुलाखती सुध्दा संवादक म्हणून घेतल्या आहेत. सूत्रसंचालक, निवेदक, संवादक, लेखक, व्याख्याता म्हणूनही त्या प्रसिध्द आहेत. साहित्यसेवेसाठी त्यांना शिवगौरव पुरस्कार, म.सा.प.चा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, अक्षरगौरव पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार, कर्तृत्व गौरव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, कृष्णामाई पुरस्कार अशा एकूण १८ पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

हे सारं करत असताना ताईंची शेतीची पार्श्वभूमी असल्याने आजही त्यांनी वर्धनगड या ठिकाणी आंबा, लिंबू, सीताफळ, पेरू यांची बाग विकसित करून तेथे किमान हजारच्या वर झाडे लावली आहेत. पुस्तकात रमणाऱ्या ताई निसर्गात तितक्याच रमतात. शहरी वातावरणात राहूनही मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे. अशा कर्तृत्ववान जिजाऊ-सावित्रीच्या साहित्यिक लेकीला मानाचा मुजरा..!!

Related posts

उजळता एक पणती…

World Environment Day : कोकणचा जैवविविधता संवर्धनातूनच विकास

सायकल वापरा चळवळ…

Leave a Comment