November 21, 2024
pallavi-acharya-katekar-article-on-gajara
Home » गजरा..
मुक्त संवाद

गजरा..

केसात गजरा माळला कि केसांना जणू अत्तरच लावलं कि काय असं वाटायचं. केस धुतले तरी वास जात नाही. गजरा सुकून गेला तरीही सुगंध येतोच. हल्ली मिळणारा प्लास्टिक आणि कापडी गजरा स्त्रीच्या केसांना बेगडी सौंदर्य तात्पुरते देऊ शकेल, पण तिच्या अबोल भावनांना हसऱ्या सुगंधाने दरवळत ठेवणारा मोगऱ्याचा खराखुरा गजराच हवा !

सौ. पल्लवी आचार्य- काटेकर

दारावर एक माणूस जोराने ओरडत होता…गजरे घ्या गजरे…वाह ! गजरा म्हटल कि माझी कळी खुलतेच. मी पटकन हातातलं काम सोडून त्या गजरेवाल्याकडे धाव घेतली. पण फुलांचा वास काही येईना. मी म्हणाले,”अहो दादा, फुलांचा वास येईना कि हो?” तो माणूस म्हणाला “अहो ताई, वास कसा येईल? कापडी फुलांचे गजरे आहेत, बोला किती देऊ?” मी हिरमुसले आणि गजरे घेतले नाहीत.

गजरा…नावातच किती झुबकेदारपणा आहे पहा ! गजरा म्हटलं डोळ्यासमोर येतो मस्त टपोऱ्या पांढऱ्या शुभ्र मोगऱ्याचा झुबकेदारपणा, कुंदाच्या इटुकल्या फुलांचा लडिवाळपणा आणि आसमंत मोहरून टाकणारा फुलांचा दरवळ. गजरा माळायच्या पद्धतीही किती बहारदार. मानेवर घट्ट बांधलेला काळ्याभोर केसांचा अंबाडा आणि त्याच्यावर गोलाकार माळलेला पांढराशुभ्र गजरा. कधी लांबसडक सैलसर वेणीत सरळ रुळणारा गजरा. तर कधी नववधूच्या केशसाम्भारातून तिच्या मनाच्या भावनांना गंधित करणारा गजरा.

गजरा हा खरे तर खऱ्याखुऱ्या फुलांचाच आवडतो मला. हल्ली प्लास्टिक आणि कापडी गजरे आलेत बाजारात पण बिनवासाचा तो गजरा कसला? काळ बदलला तसा गजराही बदलला. हल्ली रेडीमेड अंबाडा मिळतो आणि त्याला चिटकवलेला गजराही. मला वाटतं कि गजरा केवळ फुलांची एक माळ नसून ती शान आहे स्त्रीत्वाची. स्त्रीचा स्वाभिमान आणि सौंदर्य वृद्धिंगत करणारा सोबती म्हणा हवा तर. गजरा माळलेली स्त्री पहा, त्याच्या सुगंधी फुलांनी कशी टवटवीत दिसते. शारीरिक उत्साह आणि मानसिक चैतन्य जागवणारा हा गजरा म्हणूनच स्त्रीत्वाला मिळालेलं एक वरदान आहे.

कोणताही सण असो, हळदी-कुंकू समारंभ असो गजरा केसात हवाच आणि तोही मोगऱ्याच्या फुलांचा. बायकांना खुश करायचं असेल तर नवरे हमखास आणतात तो गजराच! अहो, कितीही महागाताली पैठणी नेसुदेत केसात एक नुसता मोगऱ्याचा टपोरा गजरा माळला कि बाई कशी शुक्राची चांदणी दिसते. दाक्षिणात्य भागातील स्त्रियांच्या केसात कायम मोगऱ्याचा गजरा असतोच. ती तिथली संस्कृती आहे. गायिका उषा उत्थूप, इन्फोसिसच्या संस्थापक सुधा मूर्ती, अभिनेत्री रेखा अशा कितीतरी नामांकित स्त्रिया नेहमी केसात गजरा माळलेल्या पहायला मिळतात. दोऱ्याच्या साथीनं एक – एक फुलाची गुंफण करून तयार होतो गजरा. जणू काही तो सुचवत असतो, कि बाईने प्रपंच करताना गजऱ्यातील दोऱ्यासारखा लवचिकपणा नात्त्यांत ठेवावा आणि फुलासारखं प्रत्येक नातं जापावं. एखादं फुल लहान असलं किंवा थोडं सुकलं असलं तरी पूर्ण गजरा आपण टाकून देत नाही. तसाच प्रपंच सुगंधी करावा, हि त्यामागची धारणा असावी असं मला वाटतं.

केसात गजरा माळला कि केसांना जणू अत्तरच लावलं कि काय असं वाटायचं. केस धुतले तरी वास जात नाही. गजरा सुकून गेला तरीही सुगंध येतोच. हल्ली मिळणारा प्लास्टिक आणि कापडी गजरा स्त्रीच्या केसांना बेगडी सौंदर्य तात्पुरते देऊ शकेल, पण तिच्या अबोल भावनांना हसऱ्या सुगंधाने दरवळत ठेवणारा मोगऱ्याचा खराखुरा गजराच हवा !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading