साधनेच्या कालावधीत मनात उत्पन्न होणारे काम, क्रोध, लोभ हे असेच सौजन्याने घालवायला हवेत. त्यांची अनुभुती घ्यायला हवी. यातून त्यांच्यात उत्पन्न होणारा आनंद आपण उपभोगायचा असतो. जो आपणास आत्मज्ञानाकडे प्रवृत्त करतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
ते वेळीं आत्मानंदे आघवे । जें सदा वसतें बरवें ।
तें तैसेचि पाटण पावे । गुरुकृपेचे ।। ४४२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा
ओवीचा अर्थ – त्यावेळी ज्या गांवामध्ये संपूर्ण आत्मानंद नेहमी राहात असतो, असेंच तें गुरुकृपारुपी सुंदर नगर त्यास प्राप्त होते.
काम, क्रोध, लोभ याचा त्याग केल्यानंतर शरीराच्या गावात नेहमीच आत्मानंद नांदतो. यातून शरीराला अन् मनाला एक शांती, समाधान प्राप्त होते. सदैव यातच राहावे अशी आपली इच्छा असते पण तसे होत नाही. आपण प्रयत्न करूनही मनातील राग, मनातील काम वासना आपण रोखू शकत नाही. एखादी काही घटना घडते अन् आपल्यातील हे विकार डोकेवर काढतात. यासाठी आपण चांगल्या विचारांची, चांगल्या गोष्टी करण्याची सवय लावून घ्यायला हवी. चांगल्या सवयीमुळे सकारात्मक विचार वृद्धींगत होतात. चांगल्या विचारात मन गुरफटल्याने विकारातून मन बाहेर पडते. या विकारांचा त्रास मनाला होत नाही. यासाठी चांगल्या सवयी आपल्यावर जडायला हव्यात.
अनेक ठिकाणी यासाठी वेगवेगळे प्रयोगही केले जातात. काही जण सौजन्य सप्ताह साजरा करतात, तर काही जण सात दिवस मौन पाळतात. सात दिवसांच्या या कालावधीत सौजन्याने व्यवहार करण्याचा जे संकल्प करतात. ते या कालावधीत सर्वांशी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करतात. कोणावरही रागावयाचे नाही किंवा कोणाशीही तुच्छतेने वागायचे नाही. सात दिवसांच्या या कालावधीत सर्व व्यवहार गोडी गुलाबीने करायचे. कोणी ओरडत असेल, कोणी रागावत असेल तर त्याच्याशी व्यवहार करताना आपला व्यवहार हा सौजन्याचाच असायला हवा.
आपल्या गोड वाणीने त्याच्या मनातील राग दूर व्हावा इतकी मृदुता आपल्यात उत्पन्न व्हायला हवी. गोडी गुलाबीने त्याची चुक त्याला पटवून द्यायची. प्रेमाच्या या व्यवहाराने त्यालाही झालेली चूक समजून येईल अन् त्याच्या मनात आलेला राग निवळेल. प्रेमाने समजावूनही तो ऐकत नसेल तर आपण आपला प्रेमाचा व्यवहार सोडायचा नाही. त्याची प्रतिक्रिया कितीही तीव्र असली तरीही आपल्यातील प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर करतच राहायचे. वारंवार प्रेमाच्या व्यवहाराने तो सुद्धा मनातील राग विसरून सौम्य भाषेत व्यवहार करू लागेल. त्याच्याही मनातील राग जाईल. त्याच्यात हा बदल करण्याचे सामर्थ्य आपल्या प्रेमाच्या, सौजन्याच्या व्यवहारात असायलाच हवे. इतके सामर्थ्य आपल्या वागण्यात यायला हवे.
हा बदल आपल्यामध्ये पटकण होऊ शकणार नाही. पण याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. वारंवार प्रयत्नाने हा बदल आणणे आपणाला सहज शक्य आहे. असे प्रयोग करून पाहायला काहीच हरकत नाही. या वागण्याचा प्रयत्न आपल्या शरीरावर, आरोग्यावर निश्चितच झालेला दिसून येतो. कारण अशा व्यवहाराने आपल्यातील कफ, पित्तादी विकार नाहीसे होतात. ते नियंत्रणात येतात. शरीरातील पित्त बाहेर पडल्यानंतर आपणास जसे शांत वाटते. तसे पित्तादी विकार नियंत्रणात आल्याने तसेच साधनेने ते नष्ट केल्याने, जाळल्याने त्याची कांती आपल्या शरीरावर दिसून येते. यातूनच आपले आरोग्य सुधारते. यासाठीच सौजन्याने वागण्याचा प्रयत्न नित्य करायला हवा. कोणावरही रागावयाचे नाही अशा संकल्प केल्यास आपल्यापासून कोणीच तुटणार नाही. उलट अनेक लोक आपल्याशी जोडले जातील. आपल्या व्यवहारात झालेला बदल निश्चितच इतरांमध्येही सकारात्मकता उत्पन्न करू शकते. एकप्रकारे त्यांच्यावर गुरुकृपाच होते.
साधनेच्या कालावधीत मनात उत्पन्न होणारे काम, क्रोध, लोभ हे असेच सौजन्याने घालवायला हवेत. त्यांची अनुभुती घ्यायला हवी. यातून त्यांच्यात उत्पन्न होणारा आनंद आपण उपभोगायचा असतो. जो आपणास आत्मज्ञानाकडे प्रवृत्त करतो. यातूनच मग या गुरुंची कृपा होऊन या देहास आत्मज्ञानाचा लाभ होतो. गुरुकृपा प्राप्त या देहाच्या सुंदर नगरात आत्मानंद नित्य नांदतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.