घरगुती औषध म्हणून कडुनिंबाची जेवढी तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. हे याचे पंचांग म्हणजेच पाने फळ फूल मूळ आणि खोड म्हणजे अंगातील गाभा या सर्वांचा उपयोग औषधात होतो. मुख्य उपयोग ज्वर यावर होतो.
डॉ. मोहन शांताराम वाघमारे
श्री विश्व तुळजाई आयुर्वेद चिकित्सालय
तिडके नगर राठी मारबलच्या मागे, मुर्तीजापुर जिल्हा – अकोला
आयुर्वेदात रक्त शुद्धीसाठी कडुनिंबाचा वापर वर्णिला आहे, युवान पिटीका, खरूज, नायटा, सोरायसीस, ईसब यासारखे त्वचा विकारांत निंबाच्या काढ्याने धावन करावे, किंवा स्नान करताना गरम पाण्यात याची पाने घालावीत.
अनेक डॉक्टर जुनाट त्वचा विकारांत ‘पंचनिंब चूर्ण’ सारख्या औषधाचा यशस्वी उपयोग करतात. याच्या बियांचे तेल लावले असतानाही युवान पिटीका, खरूज, नायटा, सोरायसीस, ईसब आदी आजारात उपयोग होतो. पायाच्या किंवा हाताच्या बोटांत होणाऱ्या चिखल्या आजारांत याच्या तेलाचा उपयोग होतो. सतत होणाऱ्या अम्लपित्त सारख्या आजारांत याच्या कोवळ्या काड्या, धने आणि सुंठ याचा काढा करून खडीसाखर घालून प्यावा, आजार मुळापासून बरा व्हायला सुरुवात होते.
पित्ताची उलटी होण्यासाठी निंबाचा काढा वापरतात, शीतपित्त म्हणजे त्वचेवर उठणाऱ्या पित्ताच्या त्रासांत याचा उत्तम उपयोग होतो. निंब आणि आवळा याचे चूर्ण समान मात्रेत मधासह घेतल्यावरही शीतपित्त बरे व्हायला मदत होते.
निंबाच्या फळांना ‘निंबोण्या’ असे म्हणतात, आणि याचा मूळव्याध सारख्या आजारांत रक्तस्त्राव थांबविण्यास उपयोग होतो. निंबाच्या खोडातून क्वचित काही वेळा दुधासारखा सफेद रस पाझरतो, यास निंबमद्य (कडुनिंबाची ताडी) म्हणतात. क्षयरोग(टी. बी) सारख्या आजारांत बल वाढविण्यास याचा उपयोग होतो. प्रसूतीनंतर कडुनिंबाच्या पानांचा रस काही दिवस जेवणा पूर्वी घेतल्याने रक्त शुद्धी होते. गर्भाशय आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांतील अवयवांची सूज उतरते, भूक लागते, पोट साफ होते, ताप येत नाही आणि आलाच तरी त्याचा जोर चढत नाही, असे आयुर्वेद सांगतो.
बाळंत स्त्रियाना देतात म्हणूनच यास ‘बाळंतनिंब’ असाही बोलण्याचा प्रघात आहे. कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास हिरडया मजबूत होतात, तोंडाचं आरोग्य सुरक्षित राहते, दातातील कीड नष्ट होते, पायोरिया होत नाही. कडुनिंबाच्या पानांची चव जरी कडू असली तरीही याद्वारे आरोग्यास सर्वाधिक फायदे मिळतात.
डायबिटीस अर्थात मधुमेह रोखण्यासाठी आणि साखर नियंत्रणात आणण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचा खूप उपयोग होतो हे अभ्यासातूनही सिद्ध झालं आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रोज कडूलिंबाची पानं रिकाम्या पोटी खाल्ली तर खुप फायदा होतो. एवढेच काय मधुमेहा वर औषध असणारी गुळवेल देखील कडुनिंबाच्या झाडावर वाढलेली विशेष गुणकारी असते. विषाणुजन्य आजार व मलेरियावरील उपचार विषाणुजन्य आजारांवर कडुनिंबचा वापर औषध म्हणून केला जाऊ शकतो.
कडूलिंबाच्या पानांमध्ये गेडुनिन (Gedunin) तत्व आढळतं. मलेरियाच्या उपचारासाठी याचा फायदा झाल्याचे आढळले आहे. कडूलिंबामध्ये असलेल्या अँटिफंगल तत्वामुळे फंगल इन्फेक्शन ठीक होतं. आयुर्वेदानुसार हे उत्तम रक्तदोषनाशक आहे. त्वचाविकारांमध्ये याच्या पानांचा लेप लावावा. कडुनिंबाच्या बियांपासून तेल काढतात ते कडुनिंबाचे तेल बाजारात मिळते हे तेल कोणत्याही कारणाने अंगावर उठलेला खरका ओली कोरडी खरूज नायटे गजकर्ण इत्यादी चोळून लावल्याने हे त्वचा रोग बरे होतात. रक्त दूषित झाल्याने शरीरावर पडलेले डागही याने बरे होतात.
तसेच अर्श म्हणजेच मूळव्याध यालाही हे तेल लावल्याने बरे होते. कडुनिंबाची राखही मोठी औषध आहे. कडुनिंबाची पाने जाळून राख तयार करावी व ती सून बहिरी वाल्या रोग्यांनी ज्या जागेवर स्पर्श होत नाही तेथे लावावी ही राख लावल्याने स्पर्श लागत नसलेल्या जागी स्पर्श लागू शकतो सून बहिरी झालेली जागा निंबाच्या पानाच्या पोटीसाने शेकून कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ करावे व मग वर राख चोळावी याने अप्रतिम फायदा होतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.