🍋 कागदी लिंबाकरिता हस्तबहराचे नियोजन 🍋
फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारपेठेत कागदी लिंबाला चांगली मागणी असते. यासाठी योग्य पद्धतीने हस्त बहराचे नियोजन आवश्यक आहे. हस्त बहराची फुलधारणा ऑक्टोबर-नोव्हेंबर होऊन फळे मार्च-मे मध्ये काढणीस येतात. या फळांचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी फळबागेचे योग्य व्यवस्थापन महत्वाचे आहे.
डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे
लिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्याकरिता झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य (कर्ब, नत्र) वाढीकरिता खर्च न होता अन्नद्रव्याचा संचय होणे जरुरी आहे. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यामध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. लिंबूवर्गीय फळ झाडामध्ये साधारणतः आंबिया बहार ६० टक्के, मृगबहार ३० टक्के तर हस्त बहार फक्त १० टक्के येतो. हस्त बहारासाठी शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, मशागत, खत व्यवस्थापन, ओलित व्यवस्थापन आणि संजीवकांचा उपयोग करून हमखास बहराची फुले आणणे आणि उत्पादनात वाढ करणे शक्य आहे.
⏰ बहराचे वेळापत्रक ⏰
आंबिया बहर –
फुलधारणा जानेवारी ते फेब्रुवारी. फळांचे उत्पादन भरपूर, परंतु बाजारात फळांना दर कमी.
मृग बहर –
फुलधारणा जून-जुलै. फळांचे उत्पादन नोव्हेंबर-डिसेंबर या काळात मिळते. फळावर चकाकी, रस असतो, प्रत उत्तम मात्र अपेक्षित दर मिळत नाही.
हस्त बहर –
फूलधारणा ऑक्टोबर-नोव्हेंबर, फळे मार्च-मे मध्ये काढणीस येतात. फळांना मागणी आणि दरही चांगला असतो.
🍋 हस्त बहरासाठी उपाययोजना 🍋
हस्त बहर घेण्याकरिता लिंबू झाडावर मृग बहाराची फळे नसावीत. याकरिता लिंबू झाडाला मृग बहार न येण्याची सवय लावणे जरुरी आहे. त्यामुळे मृग बहाराची फळधारणा होणार नाही किंवा कमी प्रमाणात येईल. हस्त बहर नियमित येत राहील.
जिबरेलीक ॲसिडच्या वापरामुळे मृग बहार फुटण्यास प्रतिरोध होऊन मृग बहारात फुले धारणेऐवजी शाखीय वाढ होते. मृग बहराची फुले उशिरा म्हणजे जून-जुलै ऐवजी ऑक्टोबर-नोव्हेंबर म्हणजे हस्तबहारात फुटण्यास मदत होईल. याकरिता जून महिन्यात जिबरेलीक ॲसिड ५० मिलि ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अपेक्षित परिणाम साधण्याकरिता फुलधारणेच्या १५ ते २० दिवस अगोदर फवारणी करणे आवश्यक आहे.
ताणामुळे झाडाला विश्रांती मिळते. विश्रांती दिल्यास झाडे सुप्त अवस्थेत जगतात. या कालावधीत झाडामध्ये कर्ब, नत्र संचय होतो. याकाळात १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पाण्याचा ताण द्यावा.
ताणाच्या कालावधीत पाऊस येत असल्याने बऱ्याच वेळा ताण योग्य तऱ्हेने देता येत नाही. यासाठी झाडे ताणावर सोडताना क्लोरमेक्वाट क्लोराईट १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १५ दिवसांनी हीच फवारणी पुन्हा करावी. क्लोरमेक्वाट क्लोराईट हे संजीवक जिबरेलीक ॲसिडचे प्रमाण कमी करते. यामुळे झाडाची कायिक वाढ थांबते. आणि फुलोऱ्यात रूपांतर होण्यास मदत करते. कर्ब : नत्र गुणोत्तराचा योग्य प्रमाणात संचय होतो.
💈 अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन 💈
हस्तबहराचे नियोजन केल्यावर झाडावर हंगाम नसताना फळांची संख्या अधिक राहत असल्याने झाडाची होणारी झीज भरून काढणे, झाडामधील अन्नद्रव्याचे संतुलित प्रमाण राखण्याकरिता, योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये अन्नद्रव्यांचे नियोजन करावे. सहा वर्षे व त्यावरील झाडाकरिता ४० किलो शेणखत, ६०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश प्रति झाड द्यावे.
जुलै महिन्यात प्रति झाड ४० किलो शेणखत द्यावे. जुलै महिन्यातील पावसामुळे शेणखत जमिनीत चांगले कुजते. सूक्ष्मअन्नद्रव्ये उपलब्ध होतात. रासायनिक खतांचे नियोजन करताना प्रति झाड ३०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश पाण्याचा ताण तोडताना (१५ ऑक्टोबर) आणि राहिलेले ३०० ग्रॅम नत्र बहर आल्यापासून साधारणतः एक महिन्याने द्यावे. हा फळांचा वाढीचा काळ असल्याने झाडाची नत्राची गरज वाढते. परंतु स्फुरद व पालाशची अतिरिक्त गरज पालाश अगोदर देऊनही मातीद्वारे उशिरा उपलब्ध होत असल्याने या कालावधीत आवश्यकतेप्रमाणे पूर्ण होते.
ताण दिल्यानंतर बहर येण्याकरिता व फूल गळ रोखण्याकरिता अन्नद्रव्यांची त्वरित उपलब्धता होणे आवश्यक असते. मातीद्वारे केलेल्या अन्नद्रव्यांचे नियोजनाने अन्नद्रव्य त्वरित उपलब्ध होत नाही. याकरिता ऑक्टोबर महिन्यात पाण्याचा ताण तोडताना पोटॅशियम नायट्रेट (१३ः०ः४५) १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे नत्र व पालाशची आवश्यकता त्वरित पूर्ण करता येते.
फूल धारणेच्या काळात झाडाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्यत झिंक व बोरॉन यांचे उपलब्धता योग्य प्रमाणात असल्यास फुलधारणेवर अपेक्षित तसेच फुल गळतीवर नियंत्रण दिसून येते. याकरिता झिंक ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बोरॉन एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ताण तोडताना चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.
💧 ओलीत व्यवस्थापन 💧
👉🏻 ठिबक सिंचन पद्धतीत पाण्याची ३० टक्के बचत होऊन फळाची प्रत उत्तम आणि झाडावर साल सुद्धा कमी आढळली.
👉🏻 दुहेरी आळे पद्धतीत पाण्याच्या खोडाला संपर्क न आल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळला नाही.
👉🏻 सरी पद्धतीत सुद्धा पाण्याची बचत आढळून आली.
👉🏻 फवारा सिंचन पद्धतीत फळधारणा अधिक प्रमाणात झाल्याचे आढळून आले.
👉🏻 बागेतील ओलावा ४० टक्के झाल्यावर ओलीत केल्यास फळांची प्रत उत्तम राहून उत्पादनात वाढ झाली.
👉🏻 ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना बाष्पोउत्सर्जनाच्या ९० टक्के पाणी व शिफारसीत खताच्या मात्रेच्या ८० टक्के खते (४८० ग्रॅम नत्र, २४० ग्रॅम स्फुरद, २४० ग्रॅम पालाश प्रति झाड) दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होऊन फळे मोठ्या आकाराची व दर्जेदार मिळतात.
‘हस्तबहाराकरिता अन्नद्रव्ये व पाण्याचे नियोजन (दहा वर्षांखालिल झाडांकरिता)’ सोबत जोडलेल्या चिञामध्ये पहावे…
🌳 बागेचे व्यवस्थापन 🌳
👉🏻 वाफ्यातील ओलावा टिकवण्याकरिता ५ सें.मी. जाडीचा वाळलेला गवताचा थर द्यावा. त्यामुळे जमिनीचे तापमान संतुलीत राहून प्रत्येक महिन्याला एका पाण्याच्या पाळीची बचत होते. जमिनीतील उपयुक्त जिवाणू सक्रिय होऊन मुळांचे अन्नद्रव्य घेण्याचे कार्य वाढते. फळांची गळ कमी होऊन वाढ चांगली होते.
👉🏻 पावसाळ्यापूर्वी झाडाच्या बुंध्याला तीन फुटांपर्यंत बोर्डो मलम (१ः१ः१०) लावावे.
👉🏻 खैऱ्या रोग नियंत्रण : कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* एक ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून जून-सप्टेंबर या कालावधीत ३० दिवसांचे अंतराने फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास ही फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
📲 अधिक माहीतीकरिता संपर्क –
डॉ. दिनेश पैठणकर,
९८८१०२१२२२
(अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
(सौजन्य – कृषिसमर्पण)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.