हसत हसत सिलेंडर म्हणाला
जा फिरून ये आता मस्त
तुझा प्रवास झाला स्वस्त
पण तरीही अस्वस्थ
सिलेंडरच्या किंमतीने
ती बिचारी वाकून गेली
महागाईच्या बाजारात
तिची स्वप्नं झाकून गेली
तिकीट अर्धी झाल्यापासून
मनात माहेर दाटलेलं
किती दिवस झालं
आई बाबांना भेटलेलं
तरीही ती किचनमध्ये दमलेली
स्वयंपाकात रमलेली
सगळ्या डाळी हसत होत्या
वाढलेल्या किंमती सांगत होत्या
मुलांची फी मानगुटीवर बसलेली
साखर कायम रुसलेली
तेलाने तर तिचा घाम काढला होता
शेवटचा पुडा आजच फोडला होता
पगाराच्या आकड्यासोबत
तिचा प्रवास सुरूच आहे
तिचं फिरणं स्वस्त झालं
म्हणून काय झालं..?
तिचं जगणं अजूनही महागच आहे.
पांढऱ्या बगळ्यांचं राजकारण
अजून तिला कळलं नाही
आणि समानतेचं तिकीट
तिला अजून मिळलं नाही
कवी – दंगलकार नितीन चंदनशिवे,
मु.पो.कवठेमहांकाळ, जि.सांगली
संपर्क 7020909521
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.