July 3, 2022
Book Review of Manohar Bhosale Haraki Novel
Home » बदलत्या गावकुसाचे अस्वस्थ वर्तमान सांगणारी कादंबरी – हराकी
मुक्त संवाद

बदलत्या गावकुसाचे अस्वस्थ वर्तमान सांगणारी कादंबरी – हराकी

काळ बदलला तसा या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतींमध्ये लोकं सोईनुसार बदल करू लागले. थोर पुरूषांच्या जयंत्यांच्या मिरवणूकांमध्ये डिजेच्या तालावर नाचणारी तरूणाई बघितली की याची प्रचिती येते. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांमागची कारणं समजून न घेतल्याने यामागचा मूळ उद्देश बाजूला पडून चंगळवाद फोफावत चालल्याची जाणीव ही कादंबरी करून देते.

✍ गुलाब बिसेन

मोबाईल नंबर 9404235191

संवेदनशिल लेखक म्हणून ओळख असणारे मनोहर भोसले यांची ‘हराकी’ ही कांदबरी प्रकाशित झाली आहे. या ग्रामिण कादंबरीच्या नावातच कादंबरीचा विषय दडलेला आहे. ‘हराकी’ हा अंत्यसंस्काराच्या वेळी केला जाणारा एक विधी आहे. मृतात्म्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केल्या जाणार्‍या ‘हराकी’ या अंत्यसंस्काराच्या विधीला सामाजिकदृष्ट्या महत्व आहे. या विधिशिवाय कुठल्याही मयताचा अंत्यविधी पूर्ण होत नाही. असे असले तरी हराकी हा विधी पूर्ण करणारा, हराकी म्हणणारा या कादंबरीचा नायक मात्र उपेक्षित जिवणाचा कर्णधार म्हणून जगताना आपल्याला या कादंबरीतून वाचायला मिळतो.

गावातील प्रत्येक मयताला ‘हराकी’ म्हणणारा या कादंबरीचा नायक ‘यमणाप्पा’ मयताच्या प्रेतावर ओतायसाठी आणलेल्या राॅकेलमधून उरलेले राॅकेल आपल्या घरच्या गरीबीमुळे घरी घेऊन जातो. त्यावर कित्येक दिवस त्याचा मुलगा अभ्यास करतो. मुलाने अभ्यास करताना राॅकेल संपवू नये म्हणून मुलाचा अभ्यास होईपर्यंत रात्र जागणारा यमणाप्पा, घरात अठराविश्व दारीद्र्य असूनही दुसर्‍याच्या शेतातील मालाला हात लावायचा नाही अशी बायकोला ताकीद देणारा कादंबरीचा नायक कादंबरी वाचताना प्रामाणिक, स्वकष्टाने कुणाच्या उपकाराचे ओझे न वाहता, साध्या सरळ मार्गाने जाणारा यमणाप्पा मनाला भावतो. वंश परंपरेने चालत आलेला ‘हराकी’ हा विधी तो पूर्ण श्रद्धेने करत असतो. हे काम करताना तो मयताच्या कुटुंबाकडून कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा करत नाही. तरीही लोकांकडून त्याची होणारी उपेक्षा, त्याची केली जाणारी चेष्टा, समाजात त्याला दिली जाणारी दुय्यम वागणूक वेदनादायी आहे.

गावकुसात अनेक चालीरीती पूर्वापार चालत आलेल्या आहेत. या चालीरीती सुरू करण्यामागे किंवा या चालीरीती पाळण्यामागे पूर्वीच्या लोकांचा दृष्टिकोण हा गावगाडा नीट चालण्याच्या दृष्टिने समाज एक कुटुंबासारखं राहावं, त्यांच्यात सलोखा राहावा, सुख, समाधान, शांती मिळावी हा होता. परंतू काळ बदलला तसा या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतींमध्ये लोकं सोईनुसार बदल करू लागले. थोर पुरूषांच्या जयंत्यांच्या मिरवणूकांमध्ये डिजेच्या तालावर नाचणारी तरूणाई बघितली की याची प्रचिती येते. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांमागची कारणं समजून न घेतल्याने यामागचा मूळ उद्देश बाजूला पडून चंगळवाद फोफावत चालल्याची जाणीव ही कादंबरी करून देते. यमणाप्पाच्या गावात सतीप्रथे विरोधात एल्गार पुकारणार्‍या दोन धाडसी बायांच्या समाध्या आहेत. त्याला घुमट असे संबोधले जाते. या समाधीला लग्न जुळलेल्या मुली नैवद्य दाखवतात. परंतु आजकालच्या मुली या प्रथेला अंधश्रद्धा समजून साधं पायाही पडत नसल्याची खंत यमणाप्पा उपसरपंचाच्या बायको आणि पोरीला बोलून दाखवतो.

यमणाप्पा हा माणूस प्रत्येकाच्या मदतीला धाऊन जातो, गावात मयत झाल्यास मयताची बातमी पाहुण्यांना देतो, गावातील लग्नकार्यात सर्वप्रकारची कामे तो करतो, नवर्‍यामुलासोबत मुलगी बघायला जातो, गावात साजर्‍या होणार्‍या प्रत्येक सण उत्सवात तो सर्वात पुढे असतो. अशा यमणाप्पाला जेव्हा गावातील काही लोकं, ‘तू दुसर्‍याच्या जिवावर जगतूईस.’ असं बोल लावतात तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. गावभरची हलकी कामे करत असल्याने त्याला लाचार म्हणणे हे गावाच्या बदलत्या मानसिकतेचे आणि बदलत्या वातावरणाचे लक्षण असल्याचे त्याला वाटते. माणसाचा माणसाबद्दल वाढत चाललेला द्वेश तो याची देही याची डोळा अनुभवतो.

काळ बदलत चाललाय तसा गावगाडा बदलत चाललाय. पोरं आईबाबाला घराबाहेर काढतायत, भाऊ भावाचा वैरी झालाय. गावात चांगल्या माणसांची संख्या रोजचेरोज कमी होत चालली आहे. यमणाप्पा अडाणी असला तरी बर्‍या वाईटाची त्याला चांगलीच जाण आहे. गावातील लोकांचे स्वार्थी वागणे त्याला रूचत नाही. ओठात एक आणि पोटात एक असल्या प्रवृत्तीची माणसं तो ओळखून आहे. गाव नको त्या वाटेनं चाललाय याची जाणीव त्याला पावलोपावली होत असते. गावाचं गावपण हरवून जावू नये असं यमणाप्पाला सारखं वाटत असतं. परंतू जिथे प्रतिष्ठित पंचांना किंमत नाही तिथं बिचार्‍या यमणाप्पाला कोण दाद देणार?

श्रीयाळ षष्टीच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, धक्काबुक्की यमणाप्पाच्या मनाला वेदना देते. कुठलीही प्रथा मानली तर चांगली नाहीतर अंधश्रद्धा म्हणून बंद पडतात. सार्‍या गावाची खबर राखणार्‍या यमणाप्पाचे उतारवयात कर्करोगाने ग्रासल्याने गावात फिरणे बंद होते. लग्न समारंभात अतृप्त आत्म्याला तृप्त करण्यासाठी केल्या जाणार्‍या “वीर” विधीची जेव्हा आजारी यमणाप्पाला खबर लागते तेव्हा तो तिकडे जातो. दारूड्या विराला बघून यमणाप्पाचा राग अनावर होतो. याच रागात तो दारूड्या वीराच्या हातातून काठी हिसकावत स्वत:च्या हातात घेतो. वेसन तुटलेल्या बैलासारखा तो हिसडा मारत तो वार झेलणार्‍यांवर तुटून पडतो. गावातील दारू विकणार्‍या, सावकारी करून गरीबांना लुबाडणार्‍या, आईला घराबाहेर काढणार्‍यांना, लोकांना लुबाडणार्‍यांना लढण्याचे आव्हान देतो. यातून गावातील वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन गाव गुण्यागोविंदाने नांदावं अशी तळमळ असलेला यमणाप्पा वाचकाच्या मनात आपले घर करून जातो.

एके दिवशी आजारपणात यमणाप्पाची जिवनयात्रा संपते. तेव्हा नुसता तो एकटा संपत नाही. तर त्याच्या रूपाने दोन पिढ्यांतील दुवा संपतो. सांगावा देण्याची पद्धत यमणाप्पाच्या जाण्याने बंद होते. चिता रचण्याची मक्तेदारी संपते. मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून म्हटली जाणारी हराकी महार म्हणत होता. तो मेल्याने कुणीही हराकी म्हणायला येणार नव्हता. यमणाप्पाच्या जाण्याने गावातील अनेक प्रथांचा त्याच्यासोबतच अंत झाला. लेखक मनोहर भोसले यांनी दलित व्यक्तिकडून केला जाणारा हराकी हा विधी कादंबरीचा विषय करत वाचकाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून गावगाड्याकडे बघण्याचा दृष्टिकोण देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामिण कादंबर्‍यांच्या नेहमीच्या विषयांपेक्षा ‘हराकी’ कादंबरीचा विषय वेगळा आणि सामाजिक जाणिवेच्या दृष्टिने महत्वाचाही आहे.
कादंबरीचे देखणे मुखपृष्ठ चित्रकार किशोर माणकापुरे यांनी साकारले आहे.

पुस्तकाचे नाव – हराकी (कादंबरी)
पुस्तकाचे लेखक – मनोहर भोसले
प्रकाशक – तेजश्री प्रकाशन, कबनूर (कोल्हापूर)
पृष्ठ संख्या – १८८
मूल्य – ३०० ₹

Related posts

व्रतस्थ संशोधक : गुरुवर्य डॉ. कल्याण काळे

हृषीकेश: द सेलिब्रिटी

मुलं गेली अवकाशात’ : गोष्टींचा गुच्छ!

Leave a Comment