September 9, 2024
Deepkandi Bloom in Sravan in Sadavali Dist Ratnagiri
Home » श्रावणात फुलतो साडवलीच्या माळावर दीपकाडीचा शुभ्र सडा !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

श्रावणात फुलतो साडवलीच्या माळावर दीपकाडीचा शुभ्र सडा !

संगमेश्वर देवरुख मार्गावर साडवली येथे माळरानावर सध्या सर्वत्र दीपकाडीच्या पांढऱ्या फुलांची दुलई पसरल्याचे मनमोहक दृश्य पहायला मिळत आहे. दीपकाडीचा समावेश संकटग्रस्त प्रजातीमध्ये करण्यात आला आहे. दीपकाडीला, गुलछडी असेही म्हटले जाते.

जे. डी. पराडकर

पवित्र श्रावण महिन्यात निसर्ग देखील आसुसलेला असतो. माळरानावर फुलणारी विविध रंगी फुले वाऱ्याच्या मंद झुळकांवर डोलू लागली, की श्रावण महिना सुरू झाल्याची चाहूल लागते. व्रतवैकल्याच्या श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि आकाशात अनेकदा सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळते. हिरव्या माळरानांवर फुलणारी विविध रंगी फुले म्हणजे जणू धरणी मातेचे इंद्रधनुष्य असते. संगमेश्वर देवरुख मार्गावर साडवली येथे माळरानावर सध्या सर्वत्र दीपकाडीच्या पांढऱ्या फुलांची दुलई पसरल्याचे मनमोहक दृश्य पहायला मिळत आहे. दीपकाडीचा समावेश संकटग्रस्त प्रजातीमध्ये करण्यात आला आहे. दीपकाडीला, गुलछडी असेही म्हटले जाते.

साडवलीच्या माळारानावरील हा अनोखा नजारा पाहण्यासाठी केवळ स्थानिक ग्रामस्थच येतात असे नव्हे, तर संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची पावलं देखील हा सुंदर नजारा पाहून जागीच थबकतात. दीपकाडीचा हा सुंदर नजारा छायाबद्ध करण्यासाठी मोबाईल आणि कॅमेरे घेऊन निसर्गप्रेमी साडवलीच्या माळरानावर फिरताना दिसून येतात. दीपकाडी ही वनस्पती अत्यंत नाजूक असल्याने पर्यटकांनी ती पायदळी तुडवू नये तसेच छायाचित्रे घेताना देखील या वनस्पतीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सृष्टी ज्ञान संस्थेने केले आहे.

दीपकाडी म्हणजेच गुलछडीची कथा उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी सुरु होते. कातळाच्या गर्भातून प्रकटलेल्या हिरव्या गार पाती वाढत जाऊन एका दांडीच्या रुपात मोठ्या होतात. आषाढाच्या दिवसभर पडणाऱ्या पावसात त्यांना अलगद कळ्या येतात. दांडीच्या टोकाला पांढरे शुभ्र गायमुखी फुलं आले, की नंतरच या वनस्पतीचे महत्व अधोरेखित होते. हिरवागार शालू नेसलेला काळा कातळ सडा वर्षभर दुर्लक्षित असला, तरी या पांढऱ्या फुलांनी तो अचानक नजरेत भरू लागतो. एक दोन अशी शेकडो फुलं एकच वेळी फुलू लागतात. मधमाश्या, फुलपाखरं पतंग येऊ लागले की त्यांच्या वावराने सडा जिवंत होतो. चरणारी गुरं , फुलांवर लपून बसलेले कोळी आणि इतर कीटक, अलगद फिरणारे पीपिट आणि चंडोल, पाय पडला की अचानक उड्या मारणारी बेडूक असे सर्वच जीव या फुलोऱ्याच्या आश्रयाला येतात अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी दिली .

श्रावण महिना सुरू होताच दीपकाडीची सर्व फुलं एकाच वेळी बहरून श्रावणाचे स्वागत तर करतातच, शिवाय निसर्गात आपला एक अनोखा अविष्कार सादर करुन स्वतःच्या नाजूकपणा बरोबर आपलं वेगळेपणही दाखवून देतात. साडवली येथील १६ एकर परिसरात सध्या दीपकाडीची फुलं दाटीवाटीने फुलून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. निसर्गाचा हा अद्भुत अविष्कार पाहण्यासाठी निसर्ग प्रेमींच्या हातात केवळ १५ ते २० दिवसांचाच अवधी आहे. कारण दीप काडीची फुले फुलल्यानंतर त्याचा बहर केवळ वीस दिवसच असतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

स्त्री जाणिवेचा अस्वस्थ पदर

चैतन्याचा झरा… साळुंखे सर !

नैसर्गिक प्रेमातूनच शाश्वत ज्ञानानुभव

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading