उन्हात बर्फाच्या कांड्या विकून आणि घरी असलेला वडीलोपार्जीत डोंगराळ शेतीचा तुकडा पिकविणारा बाप. व्याजाचे पैसे परत करण्यासाठी पोथीतील सोन्याचे मणी विकणारी माय. अशा पालकांचा कवी मुलगा हबीब भंडारे (औरंगाबाद) यांनी आपल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांची व्यथा आपल्या ” मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं ” या चौथ्या काव्यसंग्रहात मोठ्या दमाने मांडली आहे.
अरूण ह. विघ्ने
मु. पो. रोहणाता, आर्वी, जि. वर्धा
अनादी काळापासून पिढ्या न् पिढ्या चालत आलेली एक शाश्वत बाब म्हणजे विषमता. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आदी बाबतीत समाजात उघडपणे दोन स्तर असलेले दिसतात. तशाच वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था, जातीव्यवस्थाही काही दिवस येथे सुखाने नांदल्या आहेत. यातूनच मोठ्या प्रमाणात विषमता समाजातील काही वंचीत लोकांच्या मानगुटीवर बसून नांदली आहे. देशातील लोकशाही व्यवस्थेत संविधानाच्या कलमाच्या अधीन राहून विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु ती आजही काही अंशी नांदतेच आहे.
एकिकडे पैसा कोठे ठेवावा व तो कुठे खर्च करावा ? हा प्रश्न भेडसावणारा श्रीमंत वर्ग आहे, तर दुसरीकडे दोन सांजेच्या सोयीसाठी पैसा कसा व कोठून उभारावा ? हा प्रश्न सतत डोक्यात थैमान घालणारा शेतकरी, कष्टकरी, मजुर, गरीब हा दुसरा वर्ग आहे. गरिबी आजतागायत कुणालाच हटविता आली नाही. कमी करण्याचे प्रयत्न चालले आहेत. पण तो मानवी आयुष्याला जडलेला व त्याच्या मृत्यूनंतरच संपणारा आजार म्हणावा लागेल. नव्हे कुणाला तर तो वारसा हक्कानेही प्राप्त होणार ठरतोय.
भारत कृषिप्रधान देश आहे. गावात शेतकरी, शेतमजुर ,कामगार, कष्टकरी, बेरोजगार युवक वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. हे लोक परिस्थितीशी झगडत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत असतात. पण त्याला योग्य संधी मिळत नाही. तो कष्टाळू, खंबीर व होतकरू आहे. पण आपल्या देशातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे त्यांना पाण्याच्या नैसर्गीक स्त्रोतावरच आजही अवलंबून राहावे लागते. त्यातही कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. शेतातील पिक घरी येईपर्यंत त्याचा जिवात जीव नसतो. एका पावसाने पिक करपून जातं तर एकाच पावसाने हातातोंडाशी आलेलं पिक मातीमोल होतं. पिक घरी येताच सावकार, बँका कर्जात सर्व घेऊन जातात. वर्षाच्या कष्टाचा हिशेब शून्यच राहतो. अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे.
शेतकऱ्यांना पिकलं तर शेतमजुरांना हंगामी रोजगार प्राप्त होतो. अन्यथा त्यालाही कामास मुकावे लागते. शेतीला पुरक असे जोडधंदेही जम बसवू शकले नाहीत. ही गावातल्या माणसाची उद्विग्नता, कवी हबीब भंडारे यांची कविता दमदारपणे मांडते.
उन्हात बर्फाच्या कांड्या विकून आणि घरी असलेला वडीलोपार्जीत डोंगराळ शेतीचा तुकडा पिकविणारा बाप. व्याजाचे पैसे परत करण्यासाठी पोथीतील सोन्याचे मणी विकणारी माय. अशा पालकांचा कवी मुलगा हबीब भंडारे (औरंगाबाद) यांनी आपल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांची व्यथा आपल्या ” मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं ” या चौथ्या काव्यसंग्रहात मोठ्या दमाने मांडली आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ व शीर्षक बघता पुस्तकाच्या अंतरंगाचा वाचकास अंदाज येतो.
यापुर्वी त्यांचे ” माळावरची पेरणी ” , ” ढेकळाचा गंध ” , “बांधावरच्या बाभळी आणि इतर कविता “, ” माझ्या शाळेतील कविता (बालकाव्यसंग्रह) ” इत्यादी चार काव्यसंग्रह प्रकाशीत आहेत. भंडारे यांच्या ” मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं ” या काव्यसंग्रहाची प्रस्तावना मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी लिहिलेली आहे. या काव्यसंग्रहात एकूण 80 रचना आहेत. हा काव्यसंग्रह गोदा प्रकाशन, औरंगाबाद यांनी प्रकाशीत केला असून पाठराखण डॉ. दादा गोरे यांनी केली आहे.
सरदार जाधव यांनी अतिशय बोलके मुखपृष्ठ रेखाटले आहे. एका गरीब मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या हबीब यांची नाळ गावाशी जोडलेली आहे. ते गावातच जन्मले, गावातच वाढले आणि गावातच जगले. त्यामुळे खेड्यातील जीवनशैली त्यांनी कवितेत मांडली आहे. त्याने जे भोगलं, त्याने अनुभवलं आहे ते गावातल्या माणसाचं जीनं त्याने सुक्ष्म निरीक्षणातून आई – वडीलांच्या व्यथातून मांडलं आहे. भंडारेंच्या इतर काव्यसंग्रहाचे शीर्षकही त्यांची नाळ मातीशी जुळली असल्याची ग्वाही देतात.
माणसाच्या व्यथा, वेदना, संकटं, दुःख यांना कोणतीही जात व धर्म नसतो. कोणत्याही जाती – धर्मातील माणसाला दुःखाची अनुभूती ही सारखीच असते. वेदनांची तीव्रता केवळ कमी अधिक असू शकेल. परंतु भूकेला भाकरच शमवू शकते, मग ती भूक कुणाचीही असो. म्हणून आपले म्हणणे अधोरेखीत करतांना कवी म्हणतो …!”
जाळ चुलीतला,
पेटती भूक विझवतो
जाळ स्मशानातला
खेटती रग बुजवतो !”
थोडक्यात हाताला काम असेल तर पैसा पदरी पडतो आणि पैसा चुल पेटवितो. दोन संजीचं पीठ डब्यात नसल्याने भूकेचा प्रश्न रोजच अधांतरीच असतो. येथे त्याची रग जिरते. ग्रामीण भागात कामाची व पैशाचीही मारामार असते. शेताचा एखादा तुकडा असलाच तर त्याचं भवितव्य वरच्या पावसावर निर्भर असते. पिकलं तर त्याच्या उरातील स्वप्न पुर्ण होण्याची आशा बळावते. नाही पिकलं तर सर्व स्वप्न ओल्या किंवा कोरड्या दुष्काळात गुडूप होतात. पण शेतकरी, कष्टकरी, शेतमजुर परिस्थितीसमोर कधीच हार मानीत नाहीत.
त्याची मुलं, पत्नी त्याला आधार देऊन उत्साह वाढवित असते, आला दिवस ढकलत असते. पण त्याला आत्महत्येस प्रवृत्त होऊ देत नाहीत. त्याच्यात लढण्याची जिद्द कायम पेरत असतात एखाद्या चिमणीप्रमाणे … !”
काही न शिकलेली चिमणी,
दररोज झाडावरून अंगणात यायची
एक एक हेकेखोर कचऱ्याची काडी
उचलून दूर रानात न्यायची ! ”
किंवा”
दिवस दिवस असतो अबोला घरात,
ताळमेळ नुकसानीचा आतल्या आत करत.
गोड लागत नाही तुकडा,
धडकी उरात भरते, ती वाढविते हिम्मत,
उभारी मनात तरते, मरणार ना फास घेऊन,
ना विष खाऊन उगाच, कष्टाने उगतील मोती
तुम्ही फक्त बघाच ! ”
या ओळी माणसाला खुपकाही शिकवितात. निसर्गातील सर्वच घटक माणसाला जीवन जगण्याची कला शिकवित असतात. परिस्थितीशी दोन हात करून झगडण्याची कला शिकवितात. हे सर्व शेतकऱ्यांचे सवंगडी आहेत. तसेच सुख – दुःखात साथ देणारी त्याची छोटी छोटी मुलं व पत्नी हे ही त्याला सदैव धीर देत असतात.
माणसाला उसवलेलं आयुष्य शिवता आलं पाहिजे. शिवता येत नसेल तर किमान टाचे तरी मारता आले पाहिजे. म्हणजे समाजातील तापत्या उन्हाचे चटकेही बसत नाही आणि जिवनाचे हसेही होत नाही. ही रीत गावातल्या गरीब माणसाला ज्ञात असते. म्हणूनच तो सर्व ऋतूत टिकतो. आमचा शेतकरी बाप जेव्हा कष्ट उपसून घरी येतो तेव्हा त्याची काय अवस्था होते ती फक्त तो आणि त्याचे कुटुंबीयच जाणतात. हे सांगतांना पुढील ओळीत कवी म्हणतो..!”
सायंकाळच्या काळ्या झाडीमध्ये
निपचित पडतं काळ्याशार पाण्याचं तळं,
तसाच बापही पडतो मुर्दाडासारखा,
ढोरासारखे कष्ट उपसल्यानंतर…
माती दाबते हातपाय,
आभाळ म्हणतं,
खाली मुंडकं वर पाय
गोऱ्या चांदण्या मुरडतु नाकं
गरिबीच्या स्वप्नाला कष्टाची चाकं !”
हबीब भंडारेची कविता ही गावाकडच्या माणसाला जगायला, लढायला, शिकविते. तिला शेतकरी हताश होऊन आत्महत्या करणे मुळीच पसंत नाही. असेल त्या परिस्थितीत दिवस काढायचे, खायला जे मिळालं, जेवढं मिळालं त्यात पाण्याच्या घोटावर समाधान माणून जगायला शिकविणारी कविता आहे. शेतकऱ्याला कितीही पिकलं तरी त्यातून काहीच उरत नाही. मग शेतकरी शेती उत्पादन खर्च भागविण्यासाठी, घरचे दागिने, शेत गहाण करून, सावकाराचे व्याजबट्याने नाहीतर बँकेचे कर्ज काढून भरपाई करीत असतो. पिकलेल्या पिकातून या सर्वांच्या कर्जाची परतफेड करून उरलं तर त्याचं नाहीतर ,”येरे माझ्या मागल्या “, अशी अवस्था असते . त्यातही शासनाचे हमी भाव तुटपुंजे, दलाल लुटुन खातात.
गावातला माणूस शिकला नसला तरी अनुभवाने हुशार झालेला असतो. प्रत्येक पाऊल जागा फुंकून टाकतो. त्याला नाडविणारे अनेक बगळे पावलापावलावर बसलेले असतात. हे ही तो जाणून असतो. अशा एकूणच परिस्थितीत गावातील माणसाला शिक्षणाचे महत्व मात्र कळले आहे. पोटाला चिमटा काढून तो आपल्या मुलांबाळांना शिकवित असतो. त्याने भोगलेलं आयुष्य आपल्या मुलांच्या वाट्याला येवू नये. हीच अपेक्षा त्याची असते.
कवीमध्ये शिक्षणाची जिद्द कशी निर्माण झाली ? याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या पुढील कवितेतून मांडलेला आहे …!
कधी वाटेत सापडलेला मळकट अक्षरांचा कागद
कधी चुलीत पडलेला जळकट अक्षरांचा कागद,
कधी मायनं भातुकलं दिलेला पिवळट कागद
असं काहीबाही वाचताना
डोळ्यांचा कॅमेरा एक एक शब्द
काळजात रुजवायचा !
एकूणच शेतीचं काही खरं नाही. हे ओळखून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे कळून आल्यावर मनात शिक्षणाची आवड निर्माण झाल्याने, कुठेही दिसलेला कागद वाचून काढण्याची ही आवड गरीबांच्या मुलांमध्ये शिक्षणाची जिद्द ओतप्रोत भरलेली असल्याचे दर्शविते. सुटीच्या दिवसात पडेल ते काम करून सोबतच शिक्षण घेऊन मोठी झालेली बरीच मुलं आपल्याला समाजात दिसतात. शिक्षणाविषयीची जाणिव मुलांमध्ये महात्मा फुले दाम्पत्य, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आली असावी असे म्हणावे लागेल.
राजकीय लोक मात्र आपली पोळी शेकण्यासाठी विविध जाती धर्मातील लोकांमध्ये तेढ निर्माण करून समता, बंधुता, एकोपा यास तडा देण्याचा नेहमी घाट घालत असताना दिसतात. पण ज्यांच्या पोटाला दोन वेळचे अन्न मिळत नाही, तो या फंदात न पडता जेथे भाकरीची सोय होईल त्या गोष्टीला प्राधान्य देत असतो. त्याला जाती – धर्माचं फारसं वावडं नसतं. म्हणून कवी आपल्या पुढील कवितेत म्हणतो…!
नमाज अदा केली गावानं
सुख बहरलं कर्माचं
कीर्तन ऐकून तल्लीन फकीर
दुःख ओसरलं भ्रमाचं
मावशी लुगड्यात, माय बुरख्यात
हातात हात घेऊन आल्या दर्ग्यात
एकीच्या पिशवीत भागवत पुराण
दुसरीच्या थैलीत पवित्र कुराण !
किंवा ”
मशीदीला पाठ टेकून
बसली होती एक म्हातारी
कपाळी भलं मोठं कुंकू लावून
रोमांचित मन मिनार पाहून
डोळे सुकलेले, तरी आस ओली
मौलानाच्या पुढ्यात कुराणाची बोली
येता-जाति पदरी पडे,
चिल्लर पैसे काही
माणसाच्या भुकेला जातपात नाही !
अशाप्रकारे भुकेला जात -धर्म नसतो, तिला फक्त भाकर हवी असते. भुकेपुढे कोणतेही तत्वज्ञान चालत नाही. हिच जगण्याची रीत आहे. हेच विदारक सत्य भंडारेची कविता मांडते. “भाकरीच्या शोधात अख्खी जिंदगी बरबाद झाली “. असं कवीवर्य नारायण सुर्वे म्हणतात. ते सत्य आहे. शेवटी माणूस वितभर पोटाच्या उदरभरणासाठीच सर्व धडपड करीत असतो. वरील ओळीतील माय – मावशीच्या पुजेवरून आणि मशीदीजवळ भूकेची सोय करण्याकरीता बसलेली मोठं कुंकू लावलेली म्हातारी या दोन्ही घटनातून गावातील धार्मीक एकात्मता, बंधुभाव, सलोखा दिसुन येतो.
आई-वडील पोटाला चिमटा घेऊन मुलं जगवितात, वाढवितात, शिकवितात, नोकरी, कामधंद्याला लावतात. पण तीच मुलं जेव्हा मोठे होऊन आई-वडीलांकडे एक वस्तू , वाटनीचा हिस्सा म्हणून बघतात. त्यांच्या भावनांची कदर न करता, आपलं कर्तव्य म्हणून त्यांच्याकडे न बघता पद्धतशीर दुर्लक्ष करताना आपणास समाजात दिसतात. ही काळीज चिरणारी बाब आहे. काही मुलं आपल्या जन्मदात्या मातापित्यांना एकतर वृद्धाश्रमात ठेवतात, नाहीतर गावातील घरीच ठेऊन मुलं शहरात ऐश आरामात जगतात. अन्यथा जास्त वारस असतील तर बोझं म्हणून आई-वडीलांची वाटणी तरी करतात. ही व्यथा मांडणारी पुढील कविता बोलकी वाटते ..!”
झाली भौ एकदाची वाटणी
शेताची, घराची, म्हातारा न् म्हातारीची,
एकजन चारचौघात कुजबुजत होता
घराची, शेताची ठीक आहे,
पण माय बापाची ..?
म्हातारा माझ्याकडं आणि म्हातारी लहान्याकडं !
कां ! अशी पाळी यावी म्हाताऱ्या आई – वडीलांवर, त्यांच्या भावनांशी खेळण्याची ? आयुष्यभर पोटाला पिळ देऊन संसाराचा गाडा त्यांनी दोघांनी मिळून ओढला आणि मुलं वृद्धकाळात त्यांच्या सुख-दुःखांची, भावनांची, जिव्हाळ्याची, प्रेमाची, आधाराची वाटणी करतात. हे शल्य कवीने आपल्या रचनेतून पोटतिडकीने मांडलं आहे. हे प्रकार आजही समाजात आपल्या निदर्शनास येतात काही अंशी. याविषयी कविने चांगल्या शब्दात कान उघाडनी केली दिसते. यासाठी कविचे कौतुकच आहे.
कवी हबीब भंडारे यांच्या सर्वच कविता ह्या मुक्तछंद प्रकारातील आहेत. त्यांची कविता सामाजिक जाणिवेतून आपल्या आजूबाजूचं विश्व सुक्ष्म निरीक्षण, अवलोकन, वाचन, चिंतन, मनन यातून हुबेहुब साकारते. सामाजिक भान जपलेला कवी मोठ्या ताकदीने शेतकरी, शेतमजुरांची वास्तव परिस्थिती, गावातल्या माणसाच्या रीती, भाती आपल्या शब्दातून मांडतांना दिसतो. माणुसकी, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, बंधुभाव या मानवी मूल्यांचेही योग्य शब्दात वर्णन करतो. शब्दयोजन पद्धती अतिशय मोजकी व अगदी चपखल अशीच आहे. ग्रामीण भाषेचा गोडवा, त्यांची लकब, लेखणातून दिसून येते.
असंख्य प्रतिमा, प्रतिकांचे उत्तम शैलीने उपयोजन करून कविता फुलविली आहे. लेखनात कुठेही फापटपसारा वा आक्रस्ताळेपणा दिसून येत नाही. जे वास्तव जीवन त्यांनी बघितलं ते तसंच्या तसं कवितेत उतरविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यांचा हा प्रयत्न बहुअंशी सफल झालेला दिसतोय. असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
कवी भंडारे यांची कविता भरभर वाचता येत नाही. एकदा वाचल्याने तिचे आकलन सहजासहजी होत नाही. कधी कधी वाचक बुचकाळ्यात पडतो. नेमकं कविला यातून काय सांगायचं आहे ? त्याकरीता कविता पुन्हा पुन्हा वाचावी लागते. अतिशय प्रतिभासंपन्न असलेला हा कवी गाव आणि शेतीमाती या विषयावर आपले चार काव्यसंग्रह लिहितो. ही बाब खरच कौतुकास्पद आहे. यात अतिशयोक्ती कुठेही दिसून येत नाही. एकूणच काव्यसंग्रहाची छपाई, मुखपृष्ठ, शीर्षक, पुस्तकाची बांधणी आणि कविता या सर्व बाबी वाचकास आकर्षीत करणाऱ्या आहेत. कविता दर्जेदार, खोल व बेधडक आहे. हा काव्यसंग्रह समाजास मार्गदर्शकच ठरेल. असे वाटते . यातून जर वाचकांना काही बोध घेता आला आणि समाजातील छोट्या छोट्या उणीवा दूर करता आल्या तर भंडारे यांची कविता जिंकली, असे म्हणावे लागेल .
काव्यसंग्रहाचे नाव : “मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं “
कवी : हबीब भंडारे (7507328383)
प्रकाशन : गोदा प्रकाशन, औरंगाबाद
स्वागतमूल्य : 200 ₹
2 comments
कविचे नाव : हबीब भंडारे (7507328383)
काव्यसंग्रह : “मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं “
याविषयी वाचन करायला मिळाले सुंदर काव्य जन्माला आले आहे.
डाँ. हबीब भंडारे सरांचा कवितासंग्रह वाचनीय आणि सामाजीक जाणिवा अधोरेखीत करणारा आहे . हादिक अभिनंदन