September 12, 2024
Need To Divert Mind towards Good Thoughts
Home » मनाला चांगल्या गोष्टीचे व्यसन लावण्याचा करा प्रयत्न
विश्वाचे आर्त

मनाला चांगल्या गोष्टीचे व्यसन लावण्याचा करा प्रयत्न

व्यसन कशामुळे लागते ? याचे प्रमुख कारण विचारात घेतले तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. व्यसनीपदार्थांची, वस्तूची सहज उपलब्धता हेच व्यसन जडण्यामागचे प्रमुख कारण आहे. यासाठी चांगल्या गोष्टींचे व्यसन लावण्याचा प्रयत्न व्हायला हवा. चांगल्या गोष्टींची सहज उपलब्धता करून द्यायला हवी. रोजच्या जीवनशैलीत तसे बदल करून पाहायला हवेत.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया ।
परी आत्मज्ञानें आपणपयां । मिळिजे येथ।।५८४।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें ही गीता जाणली असता, मोह नाहीसा होतो यात आश्चर्य काय आहे ? मोह जर जाईलच पण या गीतेच्या योगानें आत्मज्ञान होऊन आत्मस्वरुपीं मिळता येते.

मनाला गुंतवून ठेवणारी जगात अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. मनाचा स्वभाव हा अस्थिर आहे. पण वाईट गोष्टीत गुंतले तर त्यातून लवकर बाहेर पडत नाही. तसेच वाईट गोष्टीची सवय मनाला लगेच जडते. अशा गोष्टीत मन अधिक गुंतत गेल्यास त्यावर मात करणे कठीण होऊन जाते. यासाठी मनाला चांगल्या गोष्टीची सवय लावण्याचा प्रयत्न करायला हवा. मन अधिकाधिक चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. गीतेचे तत्त्वज्ञान हे यासाठी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. गीतेच्या जाणण्याने मनाला सुटलेला मोह आपोआपच निघून जातो. यासाठी मनाला गीता वाचणाची गोडी लावून घ्यायला हवी.

मोबाईलच्या युगात आपण त्यात किती गुंतून गेलो आहोत हे आता सांगता येणे कठीण झाले आहे. मोबाईलची रिंग वाचली नाही तर आपणाला अस्वस्थ व्हायला होते. मोबाईलवर कोणाचा मेसेज आला नाही तरीही अस्वस्थ व्हायला होते. इतकी ती सवय आपणास जडली आहे. आता तर मोबाईल शिवाय जगणेच अनिवार्य होऊन बसले आहे. सगळे व्यवहार एका मोबाईलमधून होऊ लागले आहेत. त्यामुळे तितका तो आपला मदतगारही आहे. पण मन त्यात इतके गुंतून ठेवणे हे सुद्धा धोक्याचे ठरू शकते.

जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा इतकेच गरजेचे आहे. पण आता आपले जगणे यापुढेही गेले आहे. आपल्या प्राथमिक गरजाच खूप वाढल्या आहेत. त्या मिळाल्या नाहीत तर जगणेच अस्वस्थ होते. चांगल्या सवयी लागायला हव्यात. पण नव्या पिढीला या चांगल्या सवयी सांगून त्या लागतीलच याची शाश्वती देता येणे कठीण आहे. पण ही पिढी याच्या आहारी जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यासाठी आता वेगळ्या प्रयत्नाची गरज आहे. या नव्या पिढीची मने योग्य गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करायला हवा. या चांगल्या गोष्टींची सवय लावूनही त्यांना लागत नसेल तर वेगळे प्रयोग करणे आता हिताचे ठरणार आहे. चंगळवादी संस्कृतीच्या मोह, मायेपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी योग्य उपायांची गरज आता निश्चितच भासणार नाही.

व्यसन कशामुळे लागते ? याचे प्रमुख कारण विचारात घेतले तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. व्यसनीपदार्थांची, वस्तूची सहज उपलब्धता हेच व्यसन जडण्यामागचे प्रमुख कारण आहे. यासाठी चांगल्या गोष्टींचे व्यसन लावण्याचा प्रयत्न व्हायला हवा. चांगल्या गोष्टींची सहज उपलब्धता करून द्यायला हवी. रोजच्या जीवनशैलीत तसे बदल करून पाहायला हवेत. घरातील वातावरण तसे बदलायला हवे. इतकेजरी आपण करू शकलो तरी नव्यापिढीला चांगल्या स वयी लागू शकतात. विरोध केला तर नवी पिढी अंगावर येणार यासाठी विरोधाला विरोधाने उत्तर न देता मार्ग बदलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. गीतेचे तत्त्वज्ञान आपण सांगायला लागतो तर ते त्यांना पटेलच असे नाही. या बाबत त्यांना सांगणेही कठीण आहे. यासाठी गीता ही वेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करायला हवा. चांगली सवय लावण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. नव्यापिढीला त्यांच्या मतांनुसार वागण्याची मुभा देऊन वेगवेगळ्या प्रयोगातून त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे प्रयत्न हे करायला हवेत.

आत्मसाक्षात्कार वाईट घटनेतूनच होतो. हे लक्षात घेऊन वाईट सवय जडली म्हणून घाबरून न जाता विश्वासाने यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला हवा. मोह जाण्यासाठी गीतेचा साक्षात्कार व्हावा लागतो. साक्षात्कारातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते यावर विश्वास हवा. सकारात्मक विचारानांची नकारात्मकतेवर मात करता येते हे सदैव लक्षात ठेवायला हवे. यासाठी मनाला सकारात्मक विचारांची सवय लावून घ्यायला हवी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

तुकोबांशी जोडून घेताना…

हॉटेलवर देहविक्री करण्यासाठी मारहाण

नीट इंडिया, थ्रू लिटरेचर !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading