- अहिंसा विरुद्ध हिंसेच्या लढाईत लेखक, अहिंसावादींनी ठाम भूमिका घेण्याची गरज
- प्राचार्य राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादन जयसिंगपुरात पाच पुस्तकांचे शानदार प्रकाशन
जयसिंगपूर: कोणताही धर्म हिंसेचे समर्थन करीत नाही. अहिंसा ही प्रगतीवादी असते तर हिंसा ही अधोगतीचे लक्षण असते. आज अहिंसा विरूद्ध हिंसेची लढाई परमोच्च बिंदूला पोहोचलेली आहे. अहिंसेने हिंसेवर मात करणे ही आजच्या काळाची गरज आहे. आज अहिंसावादींच्या पुंजीवर हिंसावादी लढाया आणि बढाया करताहेत. हे समाजाच्या प्रगतीला अधिक घातक आहे. यासाठी अहिंसा विरुद्ध हिंसेच्या लढाईत लेखकांनी, बुद्धीवाद्यांनी आणि अहिंसावादींनी ठाम भूमिका घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी येथे केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जयसिंगपूर – शिरोळ शाखा, तीर्थंकर फौंडेशन, तीर्थंकर मासिक व जयसिंगपूर महाविद्यालयाने आयोजित पाच पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. तारा भावाळकर होत्या.
येथील जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमात पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले. यामध्ये संतांचा तो संग नव्हे भलतैसा- डॉ. महावीर अक्कोळे (तेजस प्रकाशन, कोल्हापूर), जैन कथेनंतरची कथा – सुनेत्रा नकाते (सुमेरु प्रकाशन, डोंबिवली), तीर्थंकर भ. महावीर वर्धमान- प्रा. डॉ. बाबा बोराडे (अनुराधा प्रकाशन, शेवगाव), आचार्यश्री आर्यनंदी जीवनगाथा- स्व. सुमेरचंद जैन (सुमेरु प्रकाशन, डोंबिवली), श्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे- महेंद्र पाटोळे (सिद्धांत पब्लिकेशन, कोल्हापूर) या पुस्तकांचा समावेश होता.
यावेळी प्राचार्य कुंभार पुढे म्हणाले, संत विचाराला हजारो वर्षांची परंपरा आहे. पण प्रत्येक संतांने प्रस्थापित्यांच्याविरोधात संघर्ष केला आहे. ते अनेकदा बंडखोर बनले आहेत. मात्र, त्यांनी कधीच हिंसेचे समर्थन केलेले नाही. या पाचही पुस्तकामध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे धर्म आणि अहिंसा यांची पाठराखण केल्याचे पाहावयास मिळते. अहिंसा विरुद्ध हिंसेची लढाई आता परमोच्च बिंदूला पोहोचलेली आहे. यामध्ये समाजाच्या प्रगतीसाठी लेखकांनी ठाम भूमिका घेण्याची गरज आहे. जैन, बौद्ध, लिंगायत आणि वारकरी यांनी हिंसेला कधीच मदत केली नाही. हिंसक झुंडीच्या विरोधात ठामपणे उभे राहून लढाई करणे गरजेचे आहे.
डॉ. तारा भवाळकर यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये साहित्यांच्या प्रयोजनाचा उहापोह केला.
प्रा. डॉ. गोमटेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सर्वश्री प्रा. अनिल पाटील, मेघा आलासे, निलम माणगावे, डॉ. नेमिनाथ शास्त्री, प्रा. कबीर कुंभार यांनी प्रकाशित पुस्तकांचा परिचय करून दिला. यावेळी लेखक डॉ. महावीर अक्कोळे, सुनेत्रा नकाते, प्रा. बोराडे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. सुनील चौगुले व प्रा. सौ. अंजना चावरे यांनी सूत्रसंचालन केले. साहित्य परिषदेचे सचिव संजय सुतार यांनी आभार मानले.
व्यासपीठावर डॉ. सुरेश एन. पाटील, राजन मुटाणे, रावसाहेब पुजारी, महेंद्र पाटोळे, राजाभाऊ अन्नदाते, प्राचार्य सुरज मांजरे उपस्थित होते. कार्यक्रमाला कोल्हापूर, सांगली परिसरामधून अनेक मान्यवर पुस्तक, साहित्य प्रेमी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.