चंद्रपूर : लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांची कादंबरी ‘दास्तान’ला जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळ नागपूर यांचा प्रा. केशव मेश्राम राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 30 मार्च 2025ला नागपूर येथे होणार आहे.
दास्तान कादंबरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रकाशित झालेली, हिंदू-मुस्लिम संघर्ष आणि ऐक्य यावरील प्रातिनिधिक कादंबरी आहे. प्रा. केशव मेश्राम यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल प्रतिमा इंगोले यांना आपल्या लेखनीचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे. कारण कै. केशव मेश्राम यांनी पुण्यात, त्यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व. श्या. कु. ढाकरे उर्फ बापूसाहेब ढाकरे यांच्या कवितेमुळे मी घडलो. त्यामुळे मी कवितेचा चाहता झालो आणि कविता लेखनाकडे वळलो, असे उद्गार काढले होते. त्यांचे गुरुजी स्व. श्यामराव कुकाजी ढाकरे उर्फ बापूसाहेब ढाकरे यांच्या कवितेचे चाहते होते. ते त्यांना नेहमी शाळेत बोलावून कविता गायन करायला लावीत. आज त्यामुळे त्यांच्या नावाचा हा पुरस्कार प्रतिमा इंगोले यांना खूप मौलिक वाटतो आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. इंगोले यांचे मराठी बोली साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, बंडोपंत बोढेकर यांनी अभिनंदन केले आहे.
कादंबरी दास्तानबद्दल…
ही कथा एका गावाची कहाणी असली तरी ती प्रातिनिधिक आहे. किंबहुना या देशाचीही प्रातिनिधिक कहाणी आहे. कधीतरी या देशात मुसलमान आले आणि हिंदू-मुसलमान असा संघर्ष सुरू झाला. तो कमी जास्त प्रमाणात सुरूच असतो. तसेच गावागावांचेही आहे. गावगाड्यात तर एकमेकांशी काम पडूनही सलोखा उत्पन्न होत नाही. कारण राजकारणी मंडळींना हा सलोखा नको असतो. म्हणूनच या दास्तान मध्ये असा राजकारणी शंकर आहे जो स्वतःचा सार्थ न पाहता गावाचे भले पाहतो आहे. खऱ्या दृष्टीने नेत्याने जसे वागायला हवे तसे वागतो आहे.
मास्तर देशप्रेमाने भारलेला, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला म्हणूनच या देशात जे जे राहतात त्या सर्वांवर प्रेम करणारा असा आहे. त्यामुळे या देशातील मुसलमान त्याला खुपत नाहीत. उलट तो त्यांचाही या देशाचे नागरिक म्हणून आदर करतो आणि हिंदू-मुस्लिम भाई-भाई समजून त्यांनी एकोप्याने राहावे अशी कामना करतो. मास्तरच नाही तर स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या प्रत्येक सज्जनाला आणि देशावर प्रेम करणाऱ्याला ह्या दोन धर्माच्या नागरिकांनी संषर्घ न करता आपआपसात भाईचारा निर्माण करावा असे वाटते. हे फार महत्त्वाचे आहे. दास्तान म्हणजे कहाणी पण ही कहाणी रुखरुख निर्माण करणारी आहे. काटा रुतल्यावर तो काढला तरी सल उरतोच तशीच आहे. एकदा ऐकली वा वाचली की विसरताच न येणारी, विसरू म्हटले तरी त्या विक्रमादित्याच्या भुतासारखी मानगुटीवर बसणारी! क्षणोक्षणी अकल्पित वळणं घेणारी व ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला चकित करणारी. त्याचवेळी तळमळत ठेवणारी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.