बाबाराव मडावी हे आदिवासी साहित्यातील स्वतंत्र नाममुद्रा उमटवणारे लेखक आहेत. आदिवासी चळवळीतील मडावी एक कृतीशील कार्यकर्ते असून फुले-आंबेडकरी विचारातून आपल्या जाणिवा व्यक्त करणारे साहित्यिक आहेत. मडावी यांचा ‘पाखरं’ हा काव्यसंग्रह २००८ मध्ये प्रकाशित झाला. आदिवासी सर्वहार समाजाच्या वेदनेचे भावविश्व टिपणारी ही कविता असून शोषण आणि विषमता याविरूद्ध तुटून पडणारी आहे. गुलामीच्या, लाचारीच्या शृंखला तोडून उंच आकाशात भरारी घेण्यासाठी पंखात बळ भरणारी कविता आहे.
डॉ रामचंद्र मोरेश्वर वासेकर
मराठी विभाग प्रमुख,
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय
सावली जि. चंद्रपुर
आदिवासी एकेकाळची राज्यकर्ती जमात परंतु आज दऱ्या-खोऱ्यात रानगर्भात ही माणसं बंदिस्त झाली असून भूक, दारिद्र्यामुळे ही माणसे तडफडत आहे म्हणून कवी म्हणतो-
“इथे तू घेरला आहेस
प्रस्थापितांच्या वेढ्यात
हा सोन्याचा पिंजरा
तुझा कैदखाना
पाखरा तू भरारी
घेवून उडून जा…!
(पाखरा – पृ.क्र. १८)
आदिवासी प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन त्याने आपले जीवन उन्नत करावे ही कवीची आशा आहे त्यामुळे कवी विद्रोह पुकारण्याचे आवाहन करतो.
“आता समतेसाठी युद्ध करावेच लागणार आणि प्रत्येक सुरूंगा सोबत उध्वस्त व्हावे लागणार …!
(सुरंग – पृ.क्र. १९)
कवी विषमतामुलक विचारांना नाकारून समतेचा पुरस्कार करतो. माणसा माणसात भेद करणाऱ्या शोषणाऱ्या व्यवस्थेच्या विरूद्धात युद्ध करण्याचा दृढनिश्चय करतो समतेसाठी, न्यायासाठी विद्राहोचा उद्घोष करतो.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली परंतु इथे लोकशाही रूजली नाही. श्रमकरी, कष्टकरी, दलित आदिवासी सर्वहार समाज आजही आपल्या न्याय्य हक्कापासून वंचित आहे म्हणून कवी म्हणतो.
“काबाडकष्ट करणाऱ्यांच्या छात्याच्या भात्यात लोकशाहीचे श्वास
कां भरल्या जात नाहीत”
(सुरंग – पृ.क्र.१९)
लोकशाहीत सर्वाना समान संधी अधिकार असतात पण श्रमकरी, कष्टकरी माणसाला लोकशाहीत स्थान मिळत नाही. शोषण, अन्याय, अत्याचाराचे चक्र काही थांबत नाही. विषमतेचे रूप अधिक गडद गहिरे होत आहे. त्यामुळे संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ‘संघर्ष या कवितेत कवी म्हणतो –
“आता आम्ही
लाचारी पत्करून
काही सांगणार नाही
शोषण करणाऱ्याचे
मुडदे पाडल्याशिवाय
थांबणार नाही”
(संघर्ष – पृ.क्र.३२)
कवी विद्रोहाचे निशाण फडकवत निघाला असून कवीला शोषणकारी व्यवस्थेचे भान आहे त्यामुळे लढा दिल्याशिवाय समतेचे युग निर्माण होणर नाही हे कवीला उमजले आहे म्हणून कवी आदिवासीना क्रांती करण्याचे आवाहन करतो.
“असं आदिवासींनी
कुठवर मरावं
मरता मरता त्यांनी
आता क्रांतीसाठी
सज्ज व्हावं..!”
(चित्कार – पृ.क्र.३४)
क्रांतीसाठी सज्ज व्हावं हे कवीचे आवाहन नव्या परिवर्तनशील युगाची नांदी आहे आता आदिवासी जागा झाला असून तो अन्याय अत्याचार सहन करणार नाही हे कवीला सांगायचे आहे.
बाबाराव मडावी यांची कविता वंचितांच्या मोठ्या जगाला कवेत घेते. आदिवासी दलित सर्वहार समाजाच्या दुःख दैन्य दारिद्र्याची मांडणी करून संघर्षाचे आवाहन करते. दुःखाला कवटाळून न बसता व्यवरथा परिवर्तनासाठी सिद्ध होते. फुले शाहू आंबेडकराच्या विज्ञाननिष्ठ तत्वज्ञानाची कास धरून समतेचा ध्वज उंचावते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.