साधनेत सुद्धा सुरुवातील अनेक यातना होतात. पण त्या सहन करून मन साधनेत रमवण्याचा प्रयत्न करायचा असतो. यातून पुढे मिळणारे हे सुख हे मनाला प्रसन्न करते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
पहिल्या वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा ।
तरी ज्ञानामृते सोहळा । पाहे जेथें ।। ७८९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्यरुपी विष जें निघालें, त्याला धैर्यरुपी शंकराने आपला गळा पुढे केला ते प्राशन केले. मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरुपी अमृताचा आनंद प्रकट झाला.
रोग झाल्यावरच आपण औषधी घेतो. औषधी कडू असते. तोंडात घ्यायला सुद्धा नकोशी वाटते. पण आपणाला आजारातून बरे व्हायचे असेल तर ते कडू औषध घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण याचा परिणाम हा शेवटी गोड असतो. एखादे चांगले कर्म करत असताना सुरुवातीला अनेक अडचणी येतात. अनेक कष्ट पडतात. पण या कष्टाशिवाय ते कर्म हस्तगत होत नाही. या कामात धीर धरून, संयमाने कर्म करत यावर मात करावी लागते. त्यामुळेच त्या कष्टातून मिळणारे फळ हे अविट गोड असते. साधनेत सुद्धा सुरुवातील अनेक यातना होतात. पण त्या सहन करून मन साधनेत रमवण्याचा प्रयत्न करायचा असतो. यातून पुढे मिळणारे हे सुख हे मनाला प्रसन्न करते.
आत्मज्ञानाचे सुख प्राप्त करण्यासाठी वैराग्य हा कणा आहे. तसे पाहाता वैराग्य हा एक विचार आहे. या विचारातूनच एक ज्वालाग्रही द्रव्य ज्याला वैराग्यरुपी विष असे म्हटले गेले आहे ते प्रसरण पावते. हे ज्वालाग्रही द्रव्य धैर्याने शंकराने अर्थात साधनेने प्राशन करायचे. म्हणजे मनामध्ये उत्पन्न सर्व षडूर्मींना ते जाळून टाकते. सोने शुद्ध करताना ते तापवावे लागते. उष्णतेने या सोन्यातील हिनकस जळून जातो. अर्थात शुद्ध सोने आपणास मिळते. वैराग्याचा विचारही विषयातील विष अर्थात विकार जाळून टाकतो अन् विषयांना शुद्ध करतो. वैराग्यरुपी विष हे विषयांची शुद्धी करते यामुळेच देहाची शुद्धी होते. देहातील विकार अर्थात कफ-वात-पित्त व तज्यन्य व्याधी हे सर्व अमंगळ, घाण या प्रक्रियेत नाहीशी होते. जळून जाते. मुळात योगधारक पक्वदेह घडविणे हेच वैराग्याचे कार्य असते.
साधनेत धैर्याने हे सर्व विकार गिळून टाकायचे असतात. यामुळेच शुद्ध देहाची प्राप्ती होते. यातूनच वैराग्यच संयम राखण्यात मदतगार ठरतो. बाबा महाराज आर्वीकर यांच्या मते वैराग्यच पुढे संयमाग्नि बनते, संयमाग्नीच वर्ज्राग्नि होतो, पुढे तो कालाग्नि कुंडलिनी बनतो. अशा चढत्या क्रमाने वैराग्याचा बोध होतो. विषय नष्ट होत नाहीत तर विषयांची शुद्धी होते. विषय हे दिव्यतेचे अलंकार बनतात. वैराग्यात सर्वशुद्धिकर असेच कार्य घडते. वैराग्याद्वारेच इंद्रियप्रवृत्ती निवृत्त होते अन् निवृत्तीचा उदय हा ईश्वरनिष्ठ प्रवृत्तीचा बोधच असतो.
वैराग्य विचार यासाठीच महत्त्वाचा आहे. दीर्घ श्वसनानेही मनात वैराग्य संचार होतो यासाठीच साधना ही आवश्यक आहे. साधनेत मन रमू लागले की निश्चितच वैराग्य उत्पन्न होते. यातूनच ज्ञानरुपी अमृताचा आनंद प्राप्त होतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.