आपल्या प्रार्थने द्वारा राष्ट्रसंतांनी खूप मोलाचा संदेश दिला आहे. आपण आपल्या गृहस्थाश्रमाची कर्तव्य पार पाडताना कोणत्या भूमिकेत असावं या त्यांच्या प्रार्थनेतून लक्षात येईल. ना हम रहे अपने लिये । हमको सभी से गर्ज है । स्वतः पुरते मर्यादित न राहता आम्हाला सर्वांची गरज आहे. फक्त प्रार्थना म्हणण्यासाठी नाही त्याचा अर्थ आपण आपल्या जीवनाशी जोडून पाहण्याची गरज आहे.
सौ. पुष्पा सुनीलराव वरखेडकर
माजी पर्यवेक्षिका, पी. डी. कन्या शाळा, वरुड
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या व आपल्या सुश्राव्य अर्थपूर्ण भजनाद्वारे अतिशय सखोल समाजाचं समीक्षण करून आपल्या काव्याद्वारे, भजनाद्वारे ग्रंथाच्या प्रबोधनाद्वारे शब्दांची योजना करून चिंतनशील विचार मांडले आहेत त्याकडे आपण डोळे झाक करतो. या त्यांच्या प्रार्थने द्वारा समाजाला अतिशय उच्चतम संदेश दिलाय. जीवन जगण्याचा संकुचित विचार सार्वत्रिक आहे, परंतु सामाजिक भान असणारे, सर्वाभूती ईश्वर म्हणणारे, अल्पशा आयुष्याचा वेळ सत्कारणी लावणारे संत महात्मे, समाज सुधारक यांनी जीवन प्रवासाचे सार्थक करून जीवन कृतार्थ केले. याउलट एक घटक असा आहे की फक्त आणि फक्त कुप मंडूक वृत्ती बाळगून आपल्या मर्यादित कुटुंबा करता स्वतःचे आयुष्य खर्ची घालून दुःख पदरात पाडून घेतात.
आपल्या प्रार्थने द्वारा राष्ट्रसंतांनी खूप मोलाचा संदेश दिला आहे. आपण आपल्या गृहस्थाश्रमाची कर्तव्य पार पाडताना कोणत्या भूमिकेत असावं या त्यांच्या प्रार्थनेतून लक्षात येईल. ना हम रहे अपने लिये । हमको सभी से गर्ज है । स्वतः पुरते मर्यादित न राहता आम्हाला सर्वांची गरज आहे. फक्त प्रार्थना म्हणण्यासाठी नाही त्याचा अर्थ आपण आपल्या जीवनाशी जोडून पाहण्याची गरज आहे. आम्ही फक्त स्वतः पुरते मर्यादित न राहता आमची सर्वांना गरज आहे आणि आपण असे जर सतत करण्याचा प्रयत्न केला तर आमचा व्यवहार संसार परमार्थ होईल.
स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी परस्पर पूरक आहेत तसेच त्यांचा उच्चांक गाठला तर परमार्थ आपल्याला इहलोकात कीर्ती, यश प्राप्त करून देतात व परलॊकात पुढील प्रवासाकरता स्वार्थ हा मर्यादित असावा. आपल्या मुलांचे संगोपन, शिक्षण, आजार, विवाह आपला जीवन चरित्र चालविण्याकरता स्वार्थ करावाच लागेल. परंतु समाजात काही वंचित घटक असेल, गरजू असेल, निराधार असेल अशा घटकाकरता आपले योगदान महत्त्वाचे राहील. हा आपला परमार्थमय व्यवहार होईल. लोभ व मोह याचा मर्यादित वापर केल्यास तो व्यवहार परमार्थ होईल.
कोणाची संपत्ती हस्तगत करणे , चोरी करणे, खोटे बोलणे , लाचलुचपत घेणे याला परमार्थ मय व्यवहार म्हणता येणार नाही. संतांची शिकवण अगदी योग्य आहे परंतु त्याच्या अर्थाशी खोल न जाता आपण बेल फुल वाहने, मंदिरात जाऊन आरती पूजा करणे, नेहमी देवाला साकडे घालने, माझंच बरं होऊ दे ही प्रार्थना अगदी चुकीची आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे । येणे वागयज्ञ तोषावे । ही विश्व प्रार्थना व आपली प्रार्थना यात फार तफावत आहे. सांगताना मोठी वचने बोलावी वागताना सामान्य पेक्षा अति कमी दर्जाची वागणूक आपली असावी. हे हे ज्याचे त्याने तपासून पहावे. परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतून सुद्धा आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. वृक्ष, नद्या डोंगर ,सागर हे सतत मानवी जीवनावर उपकार करण्याकरता सज्ज असतात . ऊन, पाऊस, थंडी याचा मारा सहन करत सतत सुख आनंद प्रदान करतात. प्राणी ,पक्षी यांचे सुद्धा मानव जातीवर अपरिमित असे उपकार आहेत. या निसर्गचक्राचा सुद्धा परमार्थ मय व्यवहार आहे. म्हणजे मानव जात ही स्वयंपूर्ण नाही . निसर्गाचे संतुलन बिघडलं तर आपलं जीवन असहाय होते. सृष्टीचे चक्र एकमेकावर अवलंबून आहे. प्रत्येक कार्य करीत असताना भगवंताचे अस्तित्व मानल तरी देखील तोही व्यवहार परमार्थ मय होईल.
संसार स्वर्गमय झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. हे प्रार्थना गुरुदेव से , यह स्वर्ग सम संसार हो । अशी गुरु देवांना प्रार्थना करतात. हा स्वर्ग मय संसार झाला म्हणजे मानव जातीचे जीवन उच्चतम दर्जाचे होऊन समाजातील सामाजिक जीवन सुखमय, आनंदमय दर्जेदार व्हावे ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विश्वप्रार्थना सर्व जीवन सुखमय होण्याकरता ना हम रहे अपने लिये हमको सभी से गर्ज आहे. स्वतःपुरते मर्यादित नाही आमची सर्वांना गरज आहे. म्हणजे आम्ही सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आमची समाजाप्रती जी जबाबदारी आहे, ती आपली समजून त्यात कर्तव्यनिष्ठा, कर्तव्य पालन, समर्पण, त्याग या गोष्टी पार पाडल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न पूर्ण होईल व आमचा व्यवहार परमार्थ होईल. ही राष्ट्रसंतांची प्रार्थना पूर्ण होईल, असे आपण प्रयत्न करूया.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.