दीडशेवर्षे जुने हस्तलिखित ‘गकारदि गणपति सहस्त्रनाम’ – प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत यांची माहिती
श्रीगणरायांची ‘ग’काराने सुरवात असलेली एक हजार नावे गुंफलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशस्तोत्राचे सुमारे सव्वाशे ते दीडशे वर्षांपूर्वीचे हस्तलिखित शिरूर येथील चां. ता. बोरा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळकृष्ण लळीत यांना सापडले आहे.
श्रीगणेशांची सहस्रनामे असलेली अनेक स्तोत्रे आहेत; पण प्रत्येक नावाची सुरवात ‘ग’काराने असलेले सहस्रनाम स्तोत्र याला वेगळेच महत्त्व आहे. त्यात रचनाकाराचे कौशल्यही दिसते.’गकारादि गणपती सहस्रनाम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणेशस्तोत्राच्या हस्तलिखितात रचनाकार किंवा लेखक या दोहोंचाही उल्लेख नाही.
कोकणातील कुंभवडे ( ता. राजापूर, जि. रत्नागिरी ) येथील कै. धोंडदेव बाळकृष्ण लळीत यांच्याकडे हे हस्तलिखित परंपरेने आलेले होते. साधारण एकवीस सेंटिमीटर लांब व दहा सेंटिमीटर रुंद असे हे हस्तलिखित आहे. २९ पानांच्या या हस्तलिखितात १८० श्लोक आहेत.
ग्रंथकार गणपतीचे गुणगौरव करणारे असे हे स्तोत्र आहे.
‘ग्रंथकारोग्रंथकरमान्योग्रंथप्रसारकः | ग्रंथश्रमज्ञोग्रंथांगो ग्रंथश्रमनिवाकरः । ग्रंथप्रवणसर्वागोग्रंथप्रणयतत्परः । गीतंगीतगुणोगीतकीर्तीगीत विशारदः।’
असा श्रीगणेश गुणगौरव या स्तोत्रात करण्यात आला आहे.
डॉ. लळीत यांच्या संग्रहात ‘मंत्रचंद्रिका’ व ‘पंचमपंचिका’ ही सतराव्या व अठराव्या शतकातील हस्तलिखिते आहेत. योगनिद्रेचे स्तवन मानले जाणारे बाळा मुद्गललिखित ‘श्रीशक्तीविजयमहालसा’ हा ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात संग्रहात आहे. तसेच गेल्या दोन शतकातील ‘त्र्यंबकी अशौच निर्णय’, ‘वेदांगछंद’ यासारखी आणखीही काही महत्त्वाची हस्तलिखिते त्यांच्या वैयक्तिक संग्रहात आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.