पाटगावच्या वेदगंगेच्या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पाण्याचा तळ दिसायचा इतके या नदीचे पाणी स्वच्छ होते. पण यंदा वेदगंगेच्या पाण्याने प्रदुषणाची पातळी गाठली आहे. नदीतील वाढती अस्वच्छता आरोग्यास धोकादायक आहे याचा विचार या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी करायला हवा. अन्यथा विकासाबरोबरच आरोग्याचे नवनवे प्रश्नही येथे वाढू शकतात. स्वच्छ हवेचा हा परिसर अस्वच्छ कधी झाला हे समजणेही कठीण आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
परवाच पाटगावला ( ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) जाण्याचा योग आला. कोरोनामुळे गेल्या चार वर्षात दिपावली पाडव्याला तिकडे झाले नव्हते. गेल्या चार वर्षात या पश्चिम घाटमाथ्यावर खूपच बदल झाला आहे. गारगोटीच्या पुढे सुमारे ३० किलोमीटर अंतरावर पाटगाव आहे. पूर्वी हा मार्ग तसा छोटाच होता. दोन्ही बाजूला झाडी, झुडपांतून वाट काढत एसटी बस, गाड्या धावत असत. दोन मोठ्या गाड्या समोरासमोर आल्या की जायलाही येत नसे. इतका अरुंद रस्ता होता. पण आता हा रस्ता दुपरी झाला आहे. रस्त्यावर कोठेही खड्डे नाहीत. अन् काही ठिकाणी तर या रस्त्याचे सिमेंटीकरणही केले आहे. गेल्या चार वर्षात इतका मोठा बदल झाला आहे. तशी वाहनांची वर्दळही वाढली आहे अन् प्रवाशांची संख्याही वाढली आहे. चार वर्षापूर्वी क्वचितच भरगच्च भरणारी एसटी आता मात्र खचाखच भरून जाते. शाळा, महाविद्यालयाला जाणारी मुले, बाजाराला जाणारी मंडळी, मुंबईहून दिपावलीसाठी आलेले चाकरमणी यांनी गाड्या खचाखच भरून जात आहेत.
गावांच्या विकासासाठी रस्ते सुधारणे, दळणवळण सुधारणे गरजेचे आहे. पण या विकासाबरोबरच इतरही गोष्टीत सुधारणा होणे तितकेच गरजेचे आहे. हा विकास करताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. एकतर रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडी नष्ट झाली. या वाटावर असणाऱ्या झाडीतील पक्ष्यांची घरटी, विविध प्रजातीही नष्ट झाली. जैवविविधतेचे झालेले हे नुकसान कधीही भरून येणारे नाही. कारण हा विचार रस्ता विकास करतानाच करायला हवा होता. तो इथे कोठेही झालेला दिसत नाही. रस्त्यांचा विकास करताना तेथील जैवविविधतेला धोका पोहोचतो हा विचार करूनच रस्त्ये विकासात तशी तरतूद करायला हवी. पण कोणत्याही रस्ते विकासात हा विचार कधीच केला जात नाही. पश्चिम घाटमाथ्यावर झाडीच झाडी आहे. रस्त्याकडेची चार झाडे तोडली तर कोठे नुकसान होते असा विचार सहजच येतो. पण यात जैवविविधतेला झालेला धोका दुर्लक्षित होतो आहे. हे लक्षात घ्यायला हवे.
रस्त्यांनी गावाकडे विकासाचे वारे घुमु लागले आहे. पाटगाव तर मधाचे गाव म्हणून विकसित होऊ पाहात आहे. खरंतर पाटगाव हे मधाचे गाव पूर्वीपासूनच आहे. महाबळेश्वर पाठोपाठ येथील मधाची अन् औषधी वनस्पतींची ओळख पूर्वीपासूनच आहे. शासनाने येथील स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुन्हा या व्यवसायाला उभारी दिली आहे. ही एकादृष्टीने चांगलीच गोष्ट आहे. शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचत आहेत हे एकादृष्टीने चांगलेच आहे. पण या योजना आखताना तेथील जैवविविधतेचे, पर्यावरणाचाही विचार करायला हवा. पाटगावच्या पर्यटनात या अशा विकासाने वाढ झाली आहे. पण पर्यावरणाकडे दुर्लक्ष होता कामा नये अन्यथा पुन्हा मधाचे अन् वनौषधींचे उत्पादन घटण्याचा धोका आहे हे विचारात घ्यायला हवे.
पर्यटनवाढीमुळे येथे प्लास्टिकच कचरा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. पूर्वी सुंदर दिसणारे नदी, नाले, ओढे आता गढूळ वाटू लागले आहेत. पाटगावच्या वेदगंगेच्या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पाण्याचा तळ दिसायचा इतके या नदीचे पाणी स्वच्छ होते. पण यंदा वेदगंगेच्या पाण्याने प्रदुषणाची पातळी गाठली आहे. नदीतील वाढती अस्वच्छता आरोग्यास धोकादायक आहे याचा विचार या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी करायला हवा. अन्यथा विकासाबरोबरच आरोग्याचे नवनवे प्रश्नही येथे वाढू शकतात. स्वच्छ हवेचा हा परिसर अस्वच्छ कधी झाला हे समजणेही कठीण आहे. नदीचे पाणी इतके काळे कसे झाले, गढूळ कसे झाले, यामध्ये गाळ कोठून आला अन् यामध्ये विविध शैवाले कोठून आली. इतकी घाण कोठून आली. गेल्या चारवर्षात झालेल्या या बदलाचा तर परिणाम नाही ना ? याचा विचार करायला हवा. तरच खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास झाला असे म्हणता येईल. गारगोटी- पाटगाव मार्गावरील या सर्व गावांनी पाण्याचे वाढते प्रदुषण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वाढत्या उद्योगधंद्यामुळे प्रदुषण वाढत आहे. पण गावाचे सौंदर्यही, अन् शुद्धीही दुषित केली आहे. हे टिकवणे आता केवळ आणि केवळ ग्रामस्थांच्याच हातात आहे. यासाठी योग्य त्या उपाययोजना गावकऱ्यांनीच करायला हव्यात. आरोग्याचे प्रश्न, रोगराई कमी करायची असेल तर यावर आत्ताच योग्य उपाय योजायला हवा. आपण तेवढे स्वच्छ राहावे तसे इतरांनाही स्वच्छ राहायला शिकवावे. कोकणची ही पद्धत आता लुप्त होता कामा नये.
पूर्वी या भागात पाहूण्यांना घरामध्ये घेताना पाय धुवूनच आतमध्ये प्रवेश दिला जात असे. चपलाही घरापासून दूर काढण्यास सांगितल्या जात असत. इतकेच नव्हे तर संध्याकाळच्या वेळी पाहूणा घरी राहायला आला तर त्याला प्रथम आंघोळीला पाणी देऊन आंघोळ करूनच आत घरात प्रवेश दिला जात असे. इतकी स्वच्छता राखली जात होती. पण आता ही परंपरा बंद पडली आहे. कोकणात काही भागात अद्यापही ही जपली जाते. पण या मागचा उद्देश लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. स्वच्छता ही या परिसराची पहीली ओळख होती. ती ओळख पुसली जाता कामा नये, असे आम्हास वाटते. यावरून ग्रामगीतेमधील ग्रामशुद्धी या प्रकरणातील संत तुकडोजी महाराज यांच्या काही ओव्या आठवल्या…संत तुकडोजी महाराज म्हणतात…
आपण तेवढे स्वच्छ राहावे । भोवती गलिच्छ वातावरणचि पाहावे ।
याने सुमंगलता कधी न पावे । तन, मन, होई दूषित ।।
म्हणोनि स्वच्छ ठेवावे दुकान, घर । नाल्या, मोऱ्या, सडका चौफेर ।
मग रामधूनची फेरी सुंदर । काढावी आबालवृद्धांनी ।।
गावाकडचे रस्ते सुधारले पण याबरोबर गावाकडे आलेली अस्वच्छता मात्र दूर ठेवायला हवी तरच खऱ्या अर्थाने गावांचा, पश्चिम घाटमाथ्याचा विकास साधला असे म्हणता येईल. भावी काळात पाण्यासाठी वनवन फिरावे लागणार आहे. यासाठी आत्तापासूनच पाण्याची शुद्धता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशिल राहायला हवे. पाणी हेच आपले जीवन आहे. आपले जीवन पाण्यानेच सुंदर होऊ शकते. यासाठीच पाण्याचे सौंदर्य अन् शुद्धता ही कायम जोपासायला हवी. यासाठी स्वच्छतेचा आग्रह कायम धरायला हवा.
शासनानेही याकडे गांभिर्याने पाहायला हवे. वर्षा पर्यटनास मंजूरी देताना धबधब्यांचे सौंदर्य, तेथील जलप्रदुषण रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने होणारे पाण्याचे प्रदुषण ग्रामस्थांनीच विचारात घ्यायला हवे. पाणी प्रदुषण ही एक मोठी गंभीर समस्या आहे. याचा विचार करायला हवा.