November 30, 2023
Need to develop ideal lifestyle to save Earth
Home » वसुंधरा वाचवण्यासाठी आदर्श जीवनशैली विकसित करण्याची गरज
विश्वाचे आर्त

वसुंधरा वाचवण्यासाठी आदर्श जीवनशैली विकसित करण्याची गरज

जागतिक तापमान वाढ, आरोग्याच्या गंभीर समस्या या सर्वाला कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे न करण्याचा विचार कारणीभूत आहे हे सुद्धा आपण मान्य करायला तयार नाही. विकास करताना पर्यावरणाच्या प्रश्नांचा विचारच केला गेला नाही. अशाने पृथ्वीचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जैसा गांवीचिया करमळा । उकरडा होय येकवळां ।
कां स्मशानी अमंगळा । आघवयांचि ।। ६५० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणें गावांतील कचरा वैगरे सर्व घाणीला एकत्र होण्याला उकिरडा ही जागा असते, अथवा स्मशानांत जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात.

ज्ञानेश्वरीतील ओव्यातून तत्कालिन जीवनमान कसे होते याचे चित्र स्पष्ट होते. पूर्वीची गावेही समृद्ध अन् दुरदृष्टी ठेऊन नियोजन करणारी अशी होती असे पाहायला मिळते. पूर्वी गावागावतही स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले जात होते. स्वच्छता, आरोग्य या गोष्टी विचारात घेऊन अनेक गावात नियम केले जात असत. गावात रोगराई येऊ नये यासाठी ही सर्व काळजी घेतली जात होती. पाळक किंवा गावपळण हे यातूनच आले आहे. पण नंतरच्या काळात त्याला धार्मिक रुप दिले गेल्याने त्यामध्ये अंधश्रद्धा वाढली. गावातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी सामुहिक प्रयत्न केले जात होते. यातून गावातील एकोपा, एकमेकांविषयी असणारी आपुलकी वाढीस लागत असे. सामुहिक प्रयत्नातून विशेष नियोजनही त्या काळात केले जात होते. त्यात दुरदृष्टीचा विचार होता. सर्वांच्या भल्यासाठी हे निर्णय घेतले जात असत. आता झपाट्याने बदल चाललेले ग्रामजीवन यामुळे या गोष्टी मागे पडल्या आहेत, हे ही तितकेच खरे आहे.

पूर्वीचे ग्रामस्थ दुरदृष्टी ठेवून कृती करत असत. कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते हे लक्षात घेऊन गावाबाहेर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष जागेचे नियोजन केले जात होते. या जागेला उकिरडा असे म्हणत. नव्या युगात मात्र हा दुरदृष्टीचा विचार दिसून येत नाही. कारण तसे असते तर कचऱ्याची भेडसावणारी समस्या जाणवली नसती. ई कचरा तर इतका झाला आहे की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. विकासाचा विचार करताना कचऱ्याचा विचार न करताच नियोजन केल्याने ही गंभीर समस्या उभी राहीली आहे. जग कुठे चालेले आहे आणि आपण कोठे आहोत असे म्हणत पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करत आपण विकास करत राहीलो, अन् आपली दुरदृष्टीने विचार करण्याची संस्कृती, पद्धती विसरून गेलो. अशाने काय झाले आहे हे आपण आता पाहातोच आहोत.

जागतिक तापमान वाढ, आरोग्याच्या गंभीर समस्या या सर्वाला कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे न करण्याचा विचार कारणीभूत आहे हे सुद्धा आपण मान्य करायला तयार नाही. विकास करताना पर्यावरणाच्या प्रश्नांचा विचारच केला गेला नाही. अशाने पृथ्वीचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. आता यावर तोडगा काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. तरच मानव जात टिकू शकेल. याचा गांभिर्याने विचार करायला हवा. वसुंधरेचा विचार करून सर्वांनीच मिळून प्रयत्न करायला हवेत. तशी जीवनशैली आता विकसित करण्याचीही गरज आहे. यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. भारताने यात पुढाकार घेऊन जगाला आदर्श जीवनशैलीचा पाठ द्यायला हवा.

ग्रामीण जीवन किती आदर्श होते, हे यातून दिसून येते. कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात होती. उघड्यावर शौच्यास बसल्याने दुर्गंधी पसरते. डास, माशा यातून रोगराई येते हे विचारात घेऊन ही घाण त्वरीत राखेने झाकली जात होती. शोषखड्डेही तयार करून घाण होणार नाही याची काळजी घेतली जात होती. देशी गायीच्या शेणापासून शिणकुटे तयार करून त्याचा वापर जेवणासाठी केला जात असे. यातून निर्माण होणारी राख रोगराईचे रक्षण करते हे लक्षात आल्यानंतर त्याचा वापर केला जाऊ लागला. या राखेतच बियाण्यांचे संवर्धनही केले जात असे. आरोग्याचे, पर्यावरणाचे प्रश्न विचारात घेऊन ही आदर्श जीवनशैली त्याकाळी उभी राहीली होती.

सध्या वाट्टेल तसा होत असलेला घातक रसायनांचा वापर पाहाता आरोग्याचा व पर्यावरणाचा विचार कोठेच झालेला नाही असे स्पष्ट होते. पण भावी पिढीला, समस्त मानवजातीला वाचवायचे असेल तर या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. एक आदर्श जीवनशैली पुन्हा विकसित करण्याची गरज आहे.

Related posts

पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव

ओव्हरस्पीडींग प्राणघातकच …

शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांच्या निर्यातीत ३१ टक्क्यांनी वाढ

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More